निसर्गाने प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी आवश्यक साधने व त्या साधनांचा वापर करण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या प्रेरणा दिल्या आहेत. निसर्गाने प्रेरणा व साधने दिली असली तरी ही साधने व प्रेरणा कशा वापरायच्या याचे कोणतेही "प्रशिक्षण वर्ग" निसर्ग घेत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर जेवणाचे घेऊया. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अत्यंत मूलभूत गरज कशाची असेल तर ती अन्नाची. हे अन्न निसर्गाने उपलब्ध करून दिले आहे. ते तोंडावाटे पोटापर्यंत कसे पोहोचवायचे यासाठी लागणारी साधने जसे की हात, दात, आतडे, अन्ननलिका सुद्धा दिली आहे. त्याचबरोबर "भूक लागणे" ही प्रेरणा सुद्धा दिली आहे. त्यामुळे "जेवायचे कसे" हे मुद्दामून शिकवावे लागत नाही, भूक लागली की त्याच्या आजूबाजूला उपलब्ध असलेले व त्याच्याकडे असलेल्या साधनांच्या जोरावर प्रत्येक सजीव मिळवतोच. त्याच प्रमाणे श्वास घेणे, तहान लागणे, राग येणे, माया वाटणे, भीती वाटणे या सगळ्या नैसर्गिक प्रेरणा प्रत्येक सजीव कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता लीलया वापरताना आपण बघतो. या सगळया प्रेरणा व साधने असूनही काही...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.