निसर्गाने प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी आवश्यक साधने व त्या साधनांचा वापर करण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या प्रेरणा दिल्या आहेत.
निसर्गाने प्रेरणा व साधने दिली असली तरी ही साधने व प्रेरणा कशा वापरायच्या याचे कोणतेही "प्रशिक्षण वर्ग" निसर्ग घेत नाही.
उदाहरणच द्यायचे झाले तर जेवणाचे घेऊया. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अत्यंत मूलभूत गरज कशाची असेल तर ती अन्नाची. हे अन्न निसर्गाने उपलब्ध करून दिले आहे. ते तोंडावाटे पोटापर्यंत कसे पोहोचवायचे यासाठी लागणारी साधने जसे की हात, दात, आतडे, अन्ननलिका सुद्धा दिली आहे. त्याचबरोबर "भूक लागणे" ही प्रेरणा सुद्धा दिली आहे.
त्यामुळे "जेवायचे कसे" हे मुद्दामून शिकवावे लागत नाही, भूक लागली की त्याच्या आजूबाजूला उपलब्ध असलेले व त्याच्याकडे असलेल्या साधनांच्या जोरावर प्रत्येक सजीव मिळवतोच.
त्याच प्रमाणे श्वास घेणे, तहान लागणे, राग येणे, माया वाटणे, भीती वाटणे या सगळ्या नैसर्गिक प्रेरणा प्रत्येक सजीव कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता लीलया वापरताना आपण बघतो.
या सगळया प्रेरणा व साधने असूनही काही सजीव यशस्वी होताना दिसतात तर काही अयशस्वी. याचे कारण म्हणजे दोघांच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणातील फरक.
हा फरक म्हणजे एकाला चांगले शिकवणारे मिळाले आणि दुसऱ्याला नाही, असा नसून, निसर्गाने दिलेली साधने व प्रेरणा वापरण्यासाठी, त्यांचा सराव करण्यासाठी एकाला संधी वातावरण मिळाले आणि दुसऱ्याला नाही, हे आहे.
श्वास घेणे, भूक लागणे, भीती वाटणे यासारखीच "स्वतःहून शिकणे" ही सुद्धा एक नैसर्गिक प्रेरणा आहे. जी चार गोष्टींनी मिळून तयार झालेली आहे. त्या चार गोष्टी म्हणजे, कुतूहल, खेळकर वृत्ती (playfulness) नियोजन करण्याची वृत्ती (Planfullness) व समाजभान.
या चार गोष्टींचा पुरेपूर "सराव" करण्यासाठी लागणारे वातावरण व संधी ज्यांना मिळते, ते शिकण्याच्या प्रक्रियेत निष्णात होतात. एकदा स्वतःहून शिकण्याची प्रक्रिया आत्मसात झाली की शिकण्याची साधने व सामुग्री कितीही बदलली तरी आयुष्यात कधीही शिकण्यामध्ये अडथळा येत नाही.
जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे या चार गोष्टींविषयी सविस्तर लिहीन..
©चेतन एरंडे.

Comments
Post a Comment