महाराष्ट्र सरकारने मुक्त शिक्षणासाठी २०१८ - १९ पासून नवीन बोर्ड सुरु करायचा निर्णय घेतल्यानंतर होमस्कुलिंग करत असलेल्या तसेच होमस्कुलिंग न करणाऱ्या पण त्याविषयी उत्सुकता असलेल्या अनेक पालकांच्या मनातील कुतूहल जागे झाले , काहींच्या उत्साहाला उधाण आले तर काही जणांनी मुक्त शिक्षणाच्या क्षेत्रात आता प्रचंड क्रांती वगैरे घडेल असे समजून मनातल्या मनात उत्सव साजरा केला . त्याचबरोबर काही पालकांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी हा निर्णय कसा चुकीचा ठरू शकतो हे सांगून त्यातील धोके स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला . मुळात असे कोणतेही बोर्ड महाराष्ट्रात प्रत्यक्षात सुरु झालेले नसून ते जून २०१८ मध्ये सुरु होईल असे सरकार म्हणते . आम्ही लोकपाल आणू व संसदेत महिलांना आरक्षण देऊ असे सुद्धा सरकार म्हणत असल्याचे आपल्याला स्मरत असेलच . त्यामुळे जे अन्न अजून ताटात वाढलेलेच नाही , ते तिखट आहे , गोड आहे की आंबट आहे , याविषयी आत्ताच फारशी चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही . ...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.