होमस्कूलिंग हा शब्द ऐकला, ही एक परदेशातून मुठभर श्रीमंत लोकांनी आयात केलेली ; प्रचलित शिक्षणव्यवस्थेला मारक अशी काहीतरी संकल्पना आहे असा बहुतेक लोकांचा समज होतो. पण खरंच तसे आहे का?
होमस्कूलिंग ह्या संकल्पनेचा प्रसार भारतापेक्षा परदेशात आणि प्रामुख्याने पश्चिमेकडील देशात मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे किंवा ह्या पर्यायी शिक्षणव्यवस्थेसाठी भारतात “होमस्कूलिंग” हा शब्द सरसकट वापरला जात असल्यामुळे बरेच गैरसमज निर्माण होतात.
होमस्कूलिंगचा खरा अर्थ आहे “स्व”अध्ययन किंवा “स्व”शिक्षण. केवळ पुस्तकांत कोंबलेली माहिती ठराविक काळात आणि ठराविक काळासाठी मुलांच्या डोक्यात कोंबणे आणि वर्षातून एक दिवस निवडून वर्षभर कोंबलेली माहिती त्यांच्या डोक्यात कितपत शिल्लक आहे हे तपासणे व त्यानुसार गुणवत्ता ठरवणे म्हणजे शिक्षण आहे का ?
नक्कीच नाही, कारण शिक्षण हा जन्माला आलेल्या क्षणापासून सुरु होऊन, शेवटचा श्वास घेईपर्यंत अविरत सुरु राहणारा प्रवास आहे.
स्नेह म्हणजे आमचा दहा वर्षाचा मुलगा ,दुसरीपर्यंत शाळेत जात असताना आम्ही शिक्षण म्हणजे नक्की काय, मुल नक्की कसे शिकते, केवळ पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष जीवनात लागणारी कौशल्ये आत्मसात करायची संधी देणारे शिक्षण कसे देता येईल, ह्याविषयी अभ्यास सुरु केला होता. त्यासाठी आम्ही अनेक पुस्तके वाचली. शिक्षण आणि बाल मानसशास्त्राशी संबंधित अनेक तज्ञांना भेटलो.
त्याची शाळेची आणि आमची दैनदिन जीवनाची लढाई सुरु असताना हळूहळू आमच्या लक्षात आले की आपल्याला रोज जगताना, आधी प्रश्न पडतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे, त्यासाठी माहिती , साधने शोधणे, असा प्रवास सुरु होते. मात्र आपल्या मुलाचा शैक्षणिक प्रवास तर अगदी उलट म्हणजे आधी उत्तर घोकणे आणि मग घोकलेल्या उत्तरांवर आधारित प्रश्न सोडवून परीक्षा देणे असा सुरु आहे ! हे आम्हाला मुळातच कुठेतरी अनैसर्गिक व एकूणच प्रत्यक्ष जीवनाशी विसंगत वाटायला लागले.
जसा स्नेहचा आहे ,तसाच खरं म्हणजे प्रत्येक मुलाचा कल भरपूर प्रश्न विचारून स्वतः हून उत्तर शोधणे व त्यातला "युरेका" प्रकारचा आनंद शोधण्याकडे असतो. नेमके त्याचवेळी त्याला आपण "पुस्तक वाक्यं प्रमाणम" संस्कृतीत अडकवतो आणि शिक्षण ही प्रक्रिया नीरस करतो. एवढेच नाही तर शाळा , पुस्तक , स्पर्धा असे मजबूत कुंपण घालून मुलांचा वैचारिक कोंडमारा करतो.
हे टाळण्यासाठी प्रचलित शिक्षणव्यवस्था बदलण्याइतकी ताकद आमच्यात नसल्यामुळे , आम्ही "होमस्कूलिंग" अर्थात स्वःअध्ययनाकडे वळलो.
सध्या ज्या प्रकारची शिक्षणव्यवस्था आपण मान्य केली आहे त्याची सुरुवात इंग्रजांनी त्यांना प्रशानासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध ह्यावे ह्या हेतूने सुरु केली आणि रुजवली. त्यामुळे ह्या व्यवस्थेचा भर हा एकसारखा विचार करणारी, नेमून दिलेले काम एकाच प्रकारे करणारी माणसे तयार करणे ह्यावर होता. पण ही व्यवस्था भारतात सुरु होण्याआधी भारतीय “शिकतच” नव्हते का?
भारतात शाळा सुरु होण्याआधी प्रत्येक जण आपल्या गरजेप्रमाणे शिकत होताच. आणि ते शिक्षण त्याला प्रत्यक्ष हाताने काम करून, कधी घरातून तर कधी आजूबाजूला चाललेल्या अनेक घडामोडींविषयीच्या कुतुहलातून, निरीक्षणातून मिळत होते. शिकणारा आणि शिकवणारा एकमेकाला उत्तम ओळखत होते. शिक्षणाचा प्रवास दरवर्षी होणाऱ्या परीक्षेपाशी थांबत नव्हता तर तो प्रवास आयुष्य जसे पुढे सरकत होते तसा आपोआप विस्तारत होता. त्या काळी प्रयोगशाळा एका कोपऱ्यात आणि शाळा बंदिस्त वर्गांनी व्यापलेली असे चित्र नव्हते तर सर्वत्र पसरलेली प्रयोगशाळा आणि फक्त प्रयोगशाळा एवढेच चित्र होते!
शाळा रुजल्या तसे चित्र बदलत गेले. जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकायला मिळत नाहीत, जे शिकवले जाते ते पडताळून पाहण्याची कुठे सोय नाही, त्यासाठी प्रोत्साहन नाही, त्यामुळे अनेकांची घुसमट सुरु झाली. शिकून बाहेर पडल्यावर जे धड शेतीतले किंवा पारंपारिक व्यवसायतले कौशल्य आत्मसात न केल्यामुळे ते कामही जमेना,पारंपारिक व्यवसायात काही नाविन्यपूर्ण करण्याची इच्छाही होईना त्यामुळे अर्थातच जगणे अवघड होऊ लागले. ज्यांचाकडे उत्तम पाठांतराची क्षमता होती तेवढेच तरले, सरकारी नोकर किंवा कामगार होऊन मिळेल ते काम करून गुजराण करू लागले.
आकड्यांचाच विचार करायचा झाला तर भारतात “शाळा” सुरु होण्याआधी, म्हणजे साधारण १८३५ च्या सुमारास , भारताचा जागतिक व्यापारात वाटा होता साधारण २३ % आणि आज शाळा ही व्यवस्था अगदी खेड्यापर्यंत रुजल्यानंतर भारताचा जागतिक व्यापारात वाटा उरला आहे जेमतेम २.५% . हे असे का झाले. शाळेत जाऊन, शिकून भारतीय समृद्ध होण्याऐवजी कंगाल का झाले असावेत ह्याचा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आले की प्रचलित शिक्षणव्यवस्थेत जीवनाचा आणि शिक्षणाचा संबंधच न उरणे हेच आपल्या एकूण भौतिक व बौद्धिक अधोगतीचे मुख्य कारण आहे. मेकॉलेने जेव्हा भारतात तथाकथित आधुनिक शाळा सुरु करण्यासाठी १८३५ साली प्रस्ताव ठेवला तेंव्हा त्याने भारतातील एकूण सामाजिक व्यवस्थेचा, व्यापाराचा गळा गोठण्याचे तंत्र अवलंबले. भारतीय ज्यामुळे स्वावलंबी राहू शकतील, स्वतंत्र विचार करू शकतील, आपल्या संस्कृतीशी जोडले राहू शकतील अशी प्रत्येक गोष्ट त्याने शिक्षणातून हद्दपार केली आणि राजकीय व प्रशासकीय दृष्टीने भारतीयांना परावलंबी बनवत असताना ते मानसिक दृष्ट्या सुद्धा कसे परावलंबी बनतील ह्याची काळजी घेतली.
त्याकाळी काही भारतीय विचारवंत प्रामुख्याने स्वामी विवेकानंद , रवींद्रनाथ टागोर , महात्मा गांधी ह्यांच्या लक्षात इंग्रजी शिक्षणव्यवस्थेतील एकूण गडबड व भारतीय सामाजिक जीवनावरील त्याचे गंभीर परिणाम लक्षात आले . हे गंभीर परिणाम रोखण्यासाठी टागोरांनी शांतीनिकेतन, तर गांधीजींनी नयी तालीम असे अभिनव प्रयोग सुरु केले. पुढे अप्पाजी पेंडसे ह्यांनी स्वामी विवेकानंद ह्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन ज्ञान प्रबोधिनी सारखी संस्था सुरु करून जीवन आणि शिक्षण ह्यांचा पुन्हा संबंध जोडण्याचा जोरदार आणि यशस्वी प्रयत्न सुरु केला.तर साधारण १९८० च्या दशकामध्ये मुुलांना शाळेत न पाठवता “स्व”अध्ययन करण्यासाठी संधी देण्याचा अत्यंत आगळावेगळा प्रयोग भारतात काही धाडसी पालकांनी सुरु केला.
आम्ही ज्यावेळी स्नेहच्या “स्व”अध्ययनाला सुरुवात केली तेव्हा आमचा मुख्य हेतू शालेय शिक्षण हे पुस्तक, परीक्षा आणि वेळापत्रक ह्या बंधनातून बाहेर काढून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्याचा मुक्त वावर कसा होईल आणि शिकण्याच्या प्रत्येक संधीचे सोने कसे करता येईल हे पाहणे हाच होता व अजूनही आहे.. “स्व”अध्ययन करताना आमच्या लक्षात आले की होमस्कूलिंग हे दुसरे तिसरे काही नसून शाळा ही व्यवस्था सुरु होण्याआधी भारतात नैसर्गिकपणे कधी गुरुकुलातून तर कधी प्रत्यक्ष काम करून मिळत असलेले शिक्षणचा आहे!
आम्ही स्नेह ला लौकिक अर्थाने शिकवण्यापेक्षा त्याला ते शिकण्याची इच्छाशक्ती कशी निर्माण होईल, एवढेच बघण्याचे काम सुरु केले. त्यामुळे एकदा प्रबळ इच्छा निर्माण झाली की कोणताही विषय मुळापासून शिकण्याकडे, ते प्रत्यक्ष पडताळून पाहण्याकडे स्नेहचा कल दिसू लागला.
भाषा शिकत असताना त्याच्या वयाला समजेल असे साहित्य वाचण्याकडे, लिहिताना पुस्तकातील धडे जसेच्या तसे लिहण्यापेक्षा स्वतःचे विचार लिखाणातून व्यक्त करण्याकडे त्याची वाटचाल सुरु झाली.
गणित शिकत असताना ह्या संख्या मुळात आल्या तरी कुठून हे समजून घेण्यापासून त्रिकोण, काटकोन हे आपल्या घरात, परिसरात आजूबाजूला कुठे आहेत आणि तिथे तेच कोन का वापरले असतील हे शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला. दुकानात खरेदी करताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार समजायला लागला.
परिसर अभ्यास, भूगोल हे प्रवास करता करता गप्पा मधून आणि घरी आल्यावर धरण, कालवा ह्या सारख्या गोष्टींचे प्रारूप बनवून शिकायला सुरुवात झाली. घराचा नकाशा बनला. पुठ्ठा वापरून शहर, रस्ते बनवले गेले. विज्ञानातील संकल्पना घरातील वस्तू वापरून , छोटे छोटे प्रयोग प्रत्यक्ष करून शिकायला सुरूवात झाली .
तर इतिहास प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊनच शिकायला सुरुवात केली.
इतिहासात शिकलेल्या शस्त्रांचाही अभ्यास झाला आणि पुठ्ठ्यांची शस्त्रे बनवून त्यांचा वापर कसा होत असेल , हे समजून घेतले गेले.
अश्याप्रकारे शिकण्याची प्रक्रीया नकळत सतत आणि सर्वत्र घडू लागली.
“स्व”अध्ययन हेच आता शिक्षणाचे भविष्य आहे आणि आता शाळा भविष्यात नामशेषच होतील असे आम्हाला नक्कीच म्हणायचे नाही . आणि तरीही जर शाळा खरोखरच नामशेष झाल्या तर “स्व”अध्ययन करणे सगळ्यांनाच जमेल की पुन्हा एकदा शिक्षण ही ठराविक वर्गाची मक्तेदारी होऊन बसेल?
मुळात प्रत्येक मुल वेगळे आहे हे आपण मान्य केले तर प्रत्येक मुलाच्या शिक्षणविषयक गरजा सुद्धा नक्क्कीच वेगळ्या असतील हे मान्य करावेच लागेल . त्यामुळे काही मुले शाळेत रमतील, तिथे राहून स्वता:ची उत्तम प्रगती करून घेतील. तर काही मुलांची शाळेमध्ये, शाळेतील स्पर्धात्मक आणि वेळापत्रकाला बांधील वातावरणात घुसमट होऊ शकेल. अशी घुसमट होणारी जी मुले आहेत त्यांच्यासाठी आज प्रचलित शिक्षणव्यवस्था कोणताही पर्याय देत नसल्यामुळे , ह्या मुलांना “स्व”अध्ययनाची संधी उपलब्ध करून देणे हा एक उत्तम पर्याय ठरत आहे आणि तो भविष्यात अजून रुजेल आणि शाळांशी संघर्ष न करता सहकार्यातून अधिक समृद्ध होईल हे नक्कीच.
“स्व”अध्ययन करत असताना समविचारी पालकांना एकत्र काम करणे आणि मुलाला “स्व”अध्ययन करणारे समवयस्क मित्र मिळवून देणे ही अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागते. मुलाच्या प्रश्नांना उत्तर देता यावे, त्याच्यासाठी माहितीचे वेगवेगळे स्त्रोत उपलब्ध करून देता येणे ह्यासाठी अनेक तज्ञ मंडळी व संस्था ह्यांच्या संपर्कात राहावे लागते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आई व बाबा ह्यापैकी कुणीतरी एकाने मुलासाठी पूर्ण वेळ देण्याची व दुसऱ्याने लागेल तशी मदत करण्याची तयारी ठेवावी लागते.
मात्र मुलाला आनंदाने आणि परिपूर्ण शिक्षण घेण्यात अडथळा येतो आहे हे जर पालकांच्या लक्षात आले तर त्यांनी हताश होऊन बसण्यापेक्षा “स्व”अध्ययनाची कास धरावी. “स्व”अध्ययनाची वाट स्वीकारल्यानंतर शाळेची फी, वाहतुकीचा खर्च कमी होत असल्यामुळे आर्थिक भार हलका होतो. त्याच पैशांचा उपयोग मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणे, उपक्रमासाठी साहित्य आणायला केला जाऊ शकतो. शाळेत जाण्याची दगदग कमी झाल्यामुळे मुलांचा उत्साह नकीच वाढतो, आरोग्य उत्तम राहते, त्यामुळे नवीन गोष्टी करण्यासाठी मुले सतत तयार असतात.
आज भारतामध्ये जवळपास दहा हजारहून अधिक पालकांनी ही वाट निवडली आहे आणि अश्या पालकांची संख्या वेगाने वाढत आहे. “स्व”अध्ययनाचा पर्याय निवडणारे पालक केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील पालकांशी आज इंटरनेट द्वारे जोडले गेले आहेत. भारतामध्ये “स्व”शिक्षण ह्या नावाने “स्व”अध्ययन करत असलेल्या पालकांना मदत करणारा एक समूह सुरु झाला आहे. त्या माध्यमातून आज अनेक पालक व त्यांची मुले एकमेकांना सतत प्रत्यक्ष भेटून शिक्षणाचा प्रवास अधिक समृद्ध करत आहेत.
स्व:अध्ययन करत असलेल्या मुलांना NIOS ह्या सरकारी संस्थेकडून घेतल्या जात असलेल्या परीक्षांना बसता येते. NIOS ही सरकारी संस्था असल्याने भारतातील व परदेशातील अनेक विद्यापीठे ह्या संस्थेने घेतलेल्या परीक्षा प्रवेशासाठी ग्राह्य धरतात.
ज्यांना मुल आणि शिक्षण ह्या विषयी खरोखर कळकळ आहे अश्या संस्थानी आणि व्यक्तींनी “स्व”अध्ययनाविषयी गैरसमज न करून घेता जर “स्व”अध्ययन करण्यार्या मुले आणि त्यांचे पालक ह्यांच्यासोबत येऊन काम केले तर अनेक मुलांना त्यांचे आणि पर्यायानी आपल्या देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी आपण नक्कीच देऊ शकतो, असे आम्हाला वाटते .
चेतन व प्रीती एरंडे.
धायरी, पुणे.
chetanerande@gmail.com
Comments
Post a Comment