समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.

यामध्ये आपला खरंच काही दोष नाही. आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.
या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.
हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"! आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात.
खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.
आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!
मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायबल" म्हणजे भरवशाचा करत चाललो आहोत.
आपण सुरक्षित घरात राहतो, आपल्याकडे स्वनिर्मित शस्त्रे आहेत, सीसीटीव्ही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माहितीची वेगाने देवाणघेवाण करून धोक्यांची पूर्वसूचना देण्याची यंत्रणा आहे.
निसर्गाने आपल्याला दिलेल्या साधनांच्या पलीकडे जाऊन अशी साधने आपल्या मदतीला असल्याने आपल्या मेंदूला रेफरन्स नसतानासुद्धा निर्णय घेण्याची अद्भुत क्षमता मिळाली आहे.
आपले काम हे आपल्या मेंदूला त्या क्षमतेची जाणीव करून देणे एवढेच आहे.
या क्षमतेमुळे आपल्या "प्रत्येकाकडे" जी "स्ट्रेंथ" म्हणजे ताकद निर्माण झाली आहे, त्याची आपल्याला जाणीव होणे—या जाणिवेतून, आपल्याला सहकार्याची गरज असली तरी, बाहेरच्या "मोटिव्हेशन" वर, मदतीवर सातत्याने अवलंबून राहण्याची गरज नाहीये, याची जाणीव होणं—हे आपल्याला माणूस म्हणून मिळालेल्या जन्माचं "सार्थक" होण्याची पहिली पायरी आहे.
दुसरी पायरी आणि दोन्ही पायऱ्यांचा "रेफरन्स" पुढील भागात... चेतन एरंडे
Comments
Post a Comment