होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका
आत्तापर्यंत मी मांडलेल्या
अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात,
तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या
शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा
गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ
स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे.
स्व-अध्ययन करत असताना, मूल
कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर
मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या
प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष
वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका.
"शिकणे" ही
माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक
माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा
प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे"
आपण शिकणे या व्याख्येत बसवत नाही एवढेच.
स्व-अध्ययन करत असताना
किंवा स्व-अध्ययन करण्याचा निर्णय घेण्याआधी पालकांनी मुळात शिकण्याची परिपूर्ण
व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलाने ज्याप्रमाणे त्याच्या वयानुसार
काही अध्ययन क्षमता आत्मसात करणे अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे त्याला वयानुसार जीवन
कौशल्य आत्मसात करून देण्याची संधी मिर्माण करून देणे हा स्व-अध्ययन करण्याचा
उद्देश असला पाहिजे. केवळ अध्ययन क्षमताच जर विकसित करायच्या असतील, तर मग
त्यासाठी प्रचलित शाळा हीच योग्य पद्धत आहे, त्यासाठी स्व-अध्ययन करण्याची गरज
नाही. मात्र जर तुम्हाला केवळ जगण्यासाठी न शिकता रोजचे जीवन जगता जगता मुलाने
शिकावे, त्याच्या शिक्षणाचा व जगण्याचा जवळून संबंध असावा असे वाटत असेल व अशी
संधी देणारी शाळा तुम्हाला सापडत नसेल, तर पालक म्हणून तुम्ही मुलाच्या
स्व-अध्ययनासाठी किमान वर्षभर आधी तयारी सुरु केली पाहिजे.
अशी तयारी करायची असेल तर
या प्रवासात पालकांची भूमिका नक्की काय असू शकते, हे आमच्या अनुभवावरून मांडायचा
आम्ही पुढीलप्रमाणे प्रयत्न करत आहोत.
शिकणे ही जर नैसर्गिक
प्रेरणा असेल तर जन्माला आलेले प्रत्येक मूल आपोआप शिकणार हे निर्विवाद सत्य आहे. मूल
जर असे स्वत:हून शिकणार असेल, तर स्व-अध्ययन करताना पालक म्हणून मला काहीच करावे
लागणार नाही का? असा प्रश्न मनात येणे स्वाभाविकच आहे. ज्याप्रमाणे भूक ही जरी
नैसर्गिक प्रेरणा असली आणि भूक लागल्यावर न सांगता आपण सगळे जेवत असलो तरी
ज्यावेळी भूक लागते, त्यावेळी आपल्याला अन्न उपलब्ध असणे, हे किती गरजेचे आहे, हे सांगायला
नकोच! त्याचप्रमाणे मूल जरी स्वत:हून शिकत असले, तरी त्याच्या आजूबाजूला जर
"शिकण्याच्या" संधी आपण पालक म्हणून निर्माण करून देऊ शकलो नाही, तर
मुलाची इच्छा असूनही तो "स्व-अध्ययन" करूच शकणार नाही, त्याची
"शिक्षण उपासमारी" होऊन शिकण्याच्या दृष्टीकोनातून एक कुपोषित
विद्यार्थी होईल!
शिकण्याची संधी उपलब्ध करून
द्यायची म्हणजे नक्की काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर देणे खरे म्हणजे वाटते तितके
सोपे नाही. कारण अशा संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील, तर पालक म्हणून आपल्याला
आपल्या मुलाला कोणत्या पद्धतीने शिकायला आवडते, हे आधी समजून घ्यावे लागेल. काही
जणांना प्रत्यक्ष क्षेत्र भेटीतून शिकायला आवडेल. काही मुलांना घराबाहेर न जाता,
आजूबाजूला उपलब्ध असलेल्या वस्तू वापरून शिकायला आवडेल. काही जणांना युट्यूब वर
वीडियो बघून तर काही जणांना समवयस्क मुलांबरोर काम करता करता शिकायला आवडेल.
आपल्या मुलाला नक्की कसे
शिकायला आवडते, हे समजून घ्यायचे असेल तर मुलांना या सगळ्या संधी आपण उपलब्ध करून
दिल्या पाहिजेत. एक एक संधी मुलांना त्यांना हवी तितक्या वेळ वापरू द्यावी लागेल.
तो कुठल्या पद्धतीमध्ये जास्त चांगल्या प्रकारे गुंतून राहतो, त्याचे कुतूहल टिकून
राहते, त्याला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची त्याची अविरत धडपड सुरु राहते,
हे आपल्याला एकदा समजले की, त्याच्या वयानुसार अध्ययन क्षमता व जीवन कौशल्ये त्या पुढे
जाऊन त्या पद्धतीशी कशी जोडायची, हे पालक म्हणून आपल्याला शिकावे लागेल.
अध्ययन क्षमता मुलांना
सहजपणे आत्मसात करता याव्यात यासाठी त्यांना आधी जीवनकौशल्ये शिकण्याची भरपूर संधी
देणे गरजेचे आहे. एकूणच मुलाच्या मनात जगण्याविषयी एक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण
करावा लागेल. ज्या व्यक्ती कडे उत्तम जीवनकौशल्ये असतात त्याच व्यक्तीचा जीवनाकडे
बघण्याचा उद्देश सकारात्मक व उत्साहवर्धक असतो. एकूणच जगण्याकडे नकारात्मक
दृष्टीकोन असलेली मुलेच काय मोठी माणसे सुद्धा आयुष्यात अत्यंत कमी नवीन गोष्टी
शिकतात अर्थात त्यामुळे त्यांच्या अंगभूत गुणांची त्यांना जाणीव होत नाही. याचा
परिणाम म्हणून त्यांच्या प्रगतीचा प्रवास खुंटतो व ते अजूनच नकारात्मक होतात.
जीवनात सकारात्मक दृष्टीकोन
निर्माण होण्यासाठी दर्जेदार चित्रपट, संगीत, चित्रकला, स्थापत्य, साहित्य संस्था
यांची मुलांना सुरुवातीला स्थानिक, नंतर जिल्हा, राज्य व हळूहळू आंतरराष्ट्रीय पातळीवर
जाऊन ओळख करून दिली पाहिजे. त्याविषयी त्यांच्याशी भरभरून बोलून, त्यांच्या मनात
अजून उत्सुकता कशी निर्माण होईल, हे बघितले पाहिजे.
मुलांना जीवनकौशल्य म्हणजेच
स्वयंपाक करणे, शेती करणे, घरातील वस्तू स्वत:हून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे, स्वत;चे
कपडे शिवण्याचा प्रयत्न करणे, घरातील कामांमध्ये झेपेल एवढी जबाबदारी घेणे, आपल्या
कुटुंबाचा इतिहास, आपण जिथे राहतो त्या भागाचा इतिहास व भूगोल समजून घेणे, या
सगळ्यासाठी पालक म्हणून आपण मदत केली पाहिजे. हे सगळे करत असताना मुलांना प्रश्न
विचारण्यासाठी प्रवृत्त करणे, त्या प्रश्नाची उत्तरे त्यांना स्वत:हून शोधण्यासाठी
मदत करणे, त्यासाठी लागणारी साधने उपलब्ध करून देणे, क्षेत्र भेटी करणे, जबाबदारी
बरोबरच त्यांना निर्णय घेण्याची, चुकायची संधी उपलब्ध करून देणे, हे पालक म्हणून
आपल्याला करावे लागेल.
आणि हो, हे सगळे करत असताना,
पालकांनी एकमेकांशी संवाद वाढवणे व एकमेकांचे अनुभव शेअर करणे, अत्यंत आवश्यक आहे.
स्व-अध्ययन हा मुलांना व त्याचबरोबर पालकांनाही त्यांचे आयुष्य सातत्याने समृद्ध
करून देणारा एक प्रवास आहे. या प्रवासात मुले आणि पालक जर एकमेकाला समजून घेऊन,
एकमेकाच्या हातात हात घालून, नवनवीन गोष्टी शिकत पुढे जात असतील तर यश हे अंतिम
ध्येय वगैरे न राहता, प्रवासाचाच एक भाग बनून सतत सोबत करत राहील हे नक्की!!
©चेतन एरंडे.
We too had some of the questions you talked about when we are thinking of homeschooling our Madhura. Thank you for the answers Chetan sir.
ReplyDeleteThank you!!
ReplyDelete