Skip to main content

माहिती तंत्रज्ञान - भाग १ - माहितीच्या जगात जबाबदार नागरीक होण्यासाठी....




माहिती तंत्रज्ञान - भाग १
(टीप: या लेखाचा उद्देश तांत्रिक माहिती पुरवणे, हा नसून, किमान तांत्रिक माहिती मिळवणे कशी आवश्यक आहे, याविषयी माझे निरीक्षण मांडणे हा आहे.)  

कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की एक तर आपण घाबरून जातो किंवा त्या तंत्रज्ञानाची पूर्ण ओळख करून न घेता, त्याचा अंदाधुंद वापर करू लागतो. दोन्ही प्रकारामध्ये आपलेच नुकसानच होण्याची शक्यता असते. मुळात कोणतेही तंत्रज्ञान हे विघातक किंवा विधायक असणे, हे त्या तंत्रज्ञानावर नव्हे, तर त्याच्या वापरावर अवलंबून असते. गेल्या काही वर्षापासून सगळीकडे बोलबाला असलेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा, हे तितकेच खरे आहे.

आपला माहिती तंत्रज्ञानाशी दैनंदिन जीवनात संपर्क येतो, तो मुख्यत: इंटरनेटच्या माध्यमातून. सोशल मिडीयाचा वापर, इंटरनेट बँकिंग, ईमेल व ऑनलाईन शॉपिंगच्या रूपाने आपण माहिती तंत्रज्ञानाशी जोडले जातो. हे सगळे वापरत असताना आपण कोणती काळजी घ्यावी, याविषयी मला जे उमगले ते मी तुमच्या पर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

इंटरनेट च्या दुनियेत आपला प्रवेश होतो, तो पासवर्डच्या मदतीने. आपल्या मौल्यवान गोष्टींच्या सुरक्षेची जशी आपण काळजी घेतो, अगदी तशीच काळजी आपण पासवर्डची घेतली पाहिजे. बहुतेक लोक पासवर्ड तयार करताना, स्वत:चे किंवा "आवडत्या" व्यक्तीचे नाव, जन्मतारीख किंवा लग्नाची तारीख अशा गोष्टींचा वापर करताना दिसतात. मात्र असे करणे म्हणजे दाराला कुलूप लावल्यावर, त्याची चावी कुठे ठेवली आहे, हे त्या कुलुपावर लिहून ठेवण्यासारखे आहे!

पासवर्ड कुणालाही सांगायचा नाही, कुठेही लिहून ठेवायचा नाही, हे तर आपल्याला माहिती आहेच. मग लक्षात राहणारा पासवर्ड बनवायचा तरी कसा? त्यासाठी आपल्या आयुष्यातील एखादी घटना आठवायची. उदाहरणार्थ - "माझी बायको माझे सगळे ऐकते". (ऐकत नसेलही, तरी उदाहरण म्हणून समजू! ) हेच इंग्लिशमध्ये "My Wife Listens To Me Carefully Since Our Marrige" असे करूया. मग यातीलच काही वाक्य, घेऊन, लग्नाला किती वर्ष झाली, हे आठवून पासवर्ड कसा तयार होईल, ते बघूया. MW@12LtMcare

असा पासवर्ड जर आपण तयार करू शकलो, तर आपली सगळी माहिती कुणाला मिळाली तरी तो त्यातून तो आपला पासवर्ड ओळखू शकेल का?

एकदा आपल्याला इंटरनेट आणि पासवर्ड मिळाले की, आपण घुसतो ते थेट सोशल मिडीयावर. इथे वावरताना, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. आपण पोस्ट केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे आपली वर्षानुवर्षे अगणित लोकांना उपलब्ध असणारी आपली फुटप्रिंट किंवा संपत्तीच असणार आहे. त्यामुळे फक्त आजचा विचार न करता, भूतकाळाचा व भविष्याचा विचार करून पोस्ट करूया. तुम्ही ज्या ज्या वेळी चेक इन करता, ट्रीपचे फोटो टाकता, तेंव्हा तुम्ही घरी नाही, हे तुम्ही अनेकांना सांगत असता, अगदी टेक सेव्ही चोरांना देखील! त्यामुळे या गोष्टी पोस्ट करताना त्याच्या परिणामांची जाणीव आपल्याला असली पाहिजे.

तुमच्या मित्रांना टॅग करताना, त्यांचे तुमच्याबरोबरचे फोटो, अनुभव पोस्ट करताना, त्यांनी लिहिलेली पोस्ट शेअर करताना, आपल्या हातून चुकून त्याच्या वैयक्तिक आयुष्यात लुडबुड होत नाहीना, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. खरे म्हणजे तसे ते अवघडही नाही. कारण आपण ज्याप्रमाणे, आपल्याला कुणाची वस्तू तात्पुरती वापरायची असेल, तर त्याच्याशी बोलून, त्याची परवानगी घेतो, अगदी तसेच हे काम करायचे आहे. त्यामुळे नंतर होणारे गैरसमज व घोटाळे, आपल्याला टाळता येतील.

कोणतीही गोष्ट शेअर करताना, हे "फेक" तर नाही ना, याची खात्री करण्याची सवय आपल्याला सहज लावून घेता येते. कोणतीही घटना घडली की, आजकाल त्याविषयी मत मांडण्याचा, पोस्ट इकडून तिकडे फॉरवर्ड करण्याचा धडाका सुरु होतो. अशा वेळी, त्या घटनेविषयीचे मत मांडण्याची त्या व्यक्तीची योग्यता नक्की आहे का, हे मत मांडण्याऱ्या व्यक्तीचे त्या घटनेत काही हितसंबंध गुंतले आहेत का किंवा त्याचे मत एखाद्या विचारधारेने प्रेरित आहे का , हे सहज तपासता येते. वर्तमानपत्राच्या साईट, सरकारी साईट व snopes.in, विकिपीडिया सारख्या साईट च्या माध्यमातून आपण वस्तुस्थिती काय आहे, हे तपासू शकतो. आपल्याला इंटरनेटवर मिळालेली माहिती किमान तीन वेगवेगळ्या भूमिका असलेल्या माध्यमातून तपासून घेतल्याशिवाय, त्यावर विश्वास ठेवणे, आपल्यासाठी धोक्याचे आहे.
©चेतन एरंडे.
क्रमशः

Comments

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...