लाखो वर्षे माणूस
निरनिराळ्या गोष्टी शिकत आला आहेच. काळानुसार शिकण्याची साधने जरी बदलत गेली असली, तरी
"शिकणे" ही प्रक्रिया शाश्वत आहे, व ती
"शाश्वत" प्रक्रिया जर आपण समजून घेऊ शकलो, तर
कदाचित "मूल शिकते कसे?" व त्यातून त्याचा
उत्क्रांतीमध्ये नकळत हातभार कसा लागतो, या
प्रश्नाचे कदाचित एक वेगळेच उत्तर आपल्याला मिळू शकेल!
म्हणूनच ही प्रक्रिया
शोधण्यासाठी मी पुन्हा एकदा उत्क्रांती समजून घेऊ लागलो. त्यातून मला माणूस
उत्क्रांतीच्या कोणत्याही टप्प्यावर असला तरी एक समान प्रक्रिया घडताना दिसली, ती
म्हणजे "आपल्या आजूबाजूच्या जगाचे सतत अत्यंत बारकाईने निरीक्षण करणे.
त्यासाठी भरपूर वेळ देणे. निरीक्षणातून टिपले गेलेले बदल किंवा नवीन गोष्टी प्रत्यक्ष
कृतीतून व स्वतःच्या हाताने तपासून पाहणे. त्यांचे आकलन करून घेणे, त्यासाठी इतर
माणसांशी संवाद साधणे. सरतेशेवटी या नवीन गोष्टीमुळे रोजच्या जगण्यात काही चांगले
बदल होतात का हे जगता जगता तपासून घेणे, जर चांगले बदल झालेले दिसले तर जुन्या
व्यवस्थेला किंवा परंपरांना कवटाळून न बसता नवे बदल स्वीकारून, प्रगतीचा एकेक टप्पा गाठत
पुढे जाणे."
उदाहरणार्थ आगीचा शोध,
शिकारीच्या वेगवेगळ्या पद्धती व त्यासाठी वापरली जाणारी शस्त्रे, अन्न धान्याचे
विविध प्रकार, ते साठवण्याच्या बदलत गेलेल्या पद्धती, वास्तुकला, चित्रकला,
शिल्पकला, गणित, विज्ञान, दळणवळण अशा अनेक क्षेत्रात हळूहळू पण सातत्याने होत
गेलेले बदल हे उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वर सांगितलेल्या
प्रक्रियेनुसारच होत गेले, असे मला वाटते. त्याचबरोबर निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या
उत्खननातून नवीन बदल घडवून आणण्याची, तो बदल स्वीकारण्याची व तो बदल दूरवर
पोहोचवण्याची प्रक्रिया पुराव्यानिशी समोर येत आहे.
एका पिढीला दुसऱ्या पिढीला
मिळालेले ज्ञान पाया म्हणून वापरत, पुढच्या पिढ्यांनी त्यांची निरीक्षणे त्या
ज्ञानाशी पडताळून पाहणे व तर्कसंगत विचारांच्या मदतीने त्या ज्ञानामध्ये भर घालत,
ते ज्ञान पुढच्या पिढीकडे देणे, ही शिकत राहण्याची अत्यंत नैसर्गिक व सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, हे उत्क्रांतीचा
अभ्यास करताना लक्षात येते.
याचे उदाहरण म्हणजे आगीचा
शोध लागला म्हणून माणूस तिथेच थांबला नाही, तर त्या ज्ञानाच्या जोरावर पुढच्या
पिढ्यांनी आगीचा वापर अन्न शिजवण्यासाठी, उजेडासाठी, धातू वितळवून उपयोगी वस्तू
करण्यासाठी व आता तर अंतराळात जाण्यासाठीही सुरु केला.
हे सगळे करत असताना, त्याला
कधी यश मिळाले असेल तर कधी अपयश. पण या दोन्हीमधून माणूस शिकत राहिला. यशाने
उन्माद न करता व अपयशाने खचून न जाता प्रत्येक पिढी हा वारसा कळत नकळत पुढे नेत गेली.
या सगळ्याचा विचार करता मला
असे वाटते की, निरीक्षण, कारण मीमांसा, त्यातून आकलन, ते आकलन प्रत्यक्ष कृतीतून
समजून घेणे, त्या आकलनातून आपल्या रोजच्या आयुष्यात करावे लागणारे बदल स्वीकारणे हीच
शिकण्याची शाश्वत प्रक्रिया आहे. आपण जर शिक्षणाची ही शाश्वत प्रक्रिया समजून न
घेता आपला शिक्षणाचा गदा पुढे रेटत राहिलो तर त्यातून आपली एक मानवजात म्हणून
शाश्वत प्रगती होणे केवळ अशक्य आहे.
शिकणे हा जीवनाचा नव्हे तर
एकूणच माणसाच्या "अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे". अर्थातच शिकणे व जगणे
वेगळे होऊच शिकत नाही. त्यामुळे "मूल शिकते कसे?" या प्रश्नाचा विचार
करून "मूल जगते कसे?" असा
प्रश्न स्वत:ला विचारून मुलांना त्यांचे अस्तित्व अर्थपूर्ण करण्यासाठी आपल्याला
मदत करावी लागेल.
माझ्या मुलाच्या शाश्वत
शिक्षणासाठी प्रयत्न करत असताना, त्याला मुबलक प्रमाणात शैक्षणिक साधने उपलब्ध
करून देण्यापेक्षा त्याच्या जीवनाच्या कशा रुंदावण्याचा मी आता आता जास्तीत
प्रयत्न करणार आहे. त्याला जितके जास्त व वैविध्यपूर्ण अनुभव देता येतील, तेवढे
देण्याचा मी प्रयत्न करेन. आत्तापर्यंतची वाटचाल लक्षात घेता, असा प्रत्येक अनुभव
असंख्य प्रश्नांना उत्तर देतो, व प्रत्येक प्रश्न शिकण्याची उर्मी वाढवतो.
मूल्यमापन करत असताना, तो शिकत असलेल्या नवीन गोष्टींच्या मदतीने त्याच्या जीवनात,
त्याच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत, अगदी छोटे का होईना पण सकारात्मक बदल होतात
का नाही, याचे निरीक्षण मी आता जास्त बारकाईने करत आहे कारण तेच त्याच्या
शिकण्याचे म्हणजेच जगण्याचे मूल्यमापन आहे.
अशा प्रकारे उत्र्कांतीच्या
मुळाशी गेल्याने, माझा स्वत:च्या जीवनाकडे बघायचा दृष्टीकोन अधिक स्पष्ट व
सर्सामावेषक तर झालाच शिवाय स्नेहच्या शिकण्याविषयी मला पडलेल्या अनेक प्रश्नांची समाधानकारक
उत्तरं देखील मिळाली.
ही उत्तरे मी स्नेहच्या
शिकण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्षात कशी उपयोगात आणली, हे प्रसंगानुसार अधून मधून
लिहिण्याचा प्रयत्न करेनच..
समाप्त.
©चेतन एरंडे.
खूप छान! फक्त इथं शाश्वत या शब्दाची तुम्हाला अभिप्रेत असलेली व्याख्या थोडी स्पष्ट करावी.
ReplyDeleteछान लिहिलं आहे. पुढचे लेख वाचायला नक्की आवडतील !
ReplyDelete