कोणत्याही होमस्कूलरला
हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे "तुझे दिवसभराचे टाईमटेबल काय
असते?"
कोणताही होमस्कूलर खरे तर
या प्रश्नाने पहिल्यांदा गडबडूनच जातो. मग वेळ मारून नेण्यासाठी म्हणून काहीतरी
थातूरमातुर उत्तर देऊन स्वत:ची सुटका करून घेतो.
मूल जेमतेम तीन वर्षाचे
झाले रे झाले की आपण त्याला एक शेड्यूल देऊन त्याला दिवसभर कुठे ना कुठे गुंतवून
ठेवायचा प्रयत्न सुरु करतो. मग हे गुंतवणे प्री स्कूल मध्ये असेल, डे केअर असेल,
ग्राउंड असेल किंवा क्लासेस असतील. मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे हे शेड्यूल
अधिक भरगच्च होऊ लागते. शेड्यूल जितके भरगच्च तितकी मूल
शिकण्याची ग्यारंटी जास्त, असे एक समीकरण आपण मनाशी पक्के करून टाकले आहे.
होमस्कूलिंग करणाऱ्या
मुलांना शाळा नाही, परीक्षा नाही त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे कसे होणार? हा
प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतोच. त्यामुळे किमान त्यांचे टाईमटेबल समजून घेतले
आणि जर का ते भरगच्च किंवा फिक्सड वगैरे आहे, असे समजले, तर "भरगच्च किंवा
आधीच ठरवलेल्या दिनक्रमामुळे का होईना, ही मुले शिकतात" अशी त्यांना खात्री
करून घ्यायचे असते.
आता मला सांगा "शिकणे"
जसे आपल्या मानसिक प्रगतीसाठी आवश्यक आहे अगदी तसेच "जेवणे" सुद्धा
आपल्या "शारीरिक" प्रगतीसाठी आवश्यक आहे. पण म्हणून तब्ब्येत चांगली
व्हावी म्हणून आपण सतत जेवत बसतो का? आपण जेवणासाठी दिवसातील जास्तीत जास्त एक तास
देतो. कदाचित दुपारचे जेवण ठराविक वेळात होते मात्र रात्रीचे जेवण, सकाळचा व
संध्याकाळचा नाश्ता या सगळ्याची "वेळ व प्रमाण" हे तुमच्या भूक
लागण्यावर अवलंबून असते.
जेवणासाठी फक्त एक तास आणि
ते जिरवण्यासाठी, पचवण्यासाठी? जेवणाच्या वेळेच्या चौपट, पाचपट वेळ आपण जेवलेले
अन्न पचवण्यासाठी देतो. आत्ता याच अनुषंगाने शिक्षणाचा विचार केला तर? आपण
"माहिती गोळा करायला" किती वेळ देतो आणि ती माहिती "पचवायला,
जिरायला" किती वेळ देतो?
खरे तर पुस्तकातून किंवा
इतर माध्यमातून "माहिती" गोळा करायला दिवसातील, तीन ते चार तास पुरतात.
उरलेला वेळ हा ती माहिती तपासून घेण्यासाठी, त्याचे मनन करण्यासाठी त्याच बरोबरीने
पुस्तकी माहितीच्या पलीकडे जाऊन जगण्याची जी कौशल्ये आत्मसात करावी लागतात,
त्यासाठी दिला पाहिजे का नाही?
होमस्कूलिंग म्हणजेच स्व अध्ययन
करत असताना मुलांना त्यांच्या कलाने गतीने व पाहिजे तितक्या वेळ शिकण्याची मुभा
असते. जर या मुलांचे वेळापत्रक ठरवून टाकले तर स्व अध्ययनाचा पाया असलेली "मुलांच्या
कलाने व गतीने शिकण्याची" संधीच निघून जाईल! मग ती घरी चालू केलेली
एक शाळाच बनेल!!
त्यामुळे होमस्कूलिंग
करणाऱ्या मुलांचा दिनक्रम हा त्या दिवशी त्यांना काय शिकावेसे वाटते यावर ठरतो.
"त्यांना काहीतरी शिकावेसे वाटावे" असे वातावरण होमस्कूलिंग करणारे पालक
निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. पालक तयार करत असलेल्या या वातावरणामुळे,
मुलांना प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांची धडपड हीच
त्यांचा दिनक्रम बनते!!
©चेतन एरंडे,
Comments
Post a Comment