आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग १
मागच्या वर्षी आम्ही आमचा होमस्कूलिंगचा प्रवास लोकसत्ताचे चतुरंग पुरवणीत मांडला होता. सध्या अनेकजण होमस्कूलिंगविषयी विचारणा करत असल्याने हा लेख तीन ते चार भागात पुन्हा एकदा ब्लॉगवर पोस्ट करत आहे.
तसेच या लेखाचे लवकरच माझ्या युट्युब चॅनेलवर वाचन करण्याचा देखील विचार आहे. त्याविषयी लवकरच पोस्ट करेन.
"मला
थ्रीडी डिझाईन आणि ऍनिमेशन करायला
खूप आवडत, मला ते शिकायचंय"
आमच्या तेरा वर्षाच्या मुलाने, स्नेहने
हे सांगताच सुजाण भूमिकेत शिरून मी व प्रीती
त्याच्यासाठी थ्रीडी डिझाईनचा क्लास शोधून काढला. मात्र स्नेहला त्या क्लासची सगळी
माहिती देऊन, "तू हा क्लास
करशील का?" असे विचारताच त्याने
ठाम नकार दिला.
त्याचा नकार बघून आम्ही जरी हा विषय सोडून दिला तरी त्याने मात्र हा विषय सोडून दिला नव्हता! तो झाडून कामाला लागला. जमतील तेवढे ऑनलाईन प्लँटफॉर्म पालथे घातले आणि ब्लेंडर नावाचे एक थ्रीडी डिझाईन सॉफ्टवेअर असते असा शोध लावला. नुसता शोध लावून तो थांबला नाही तर त्याने युट्युबच्या मदतीने ते सॉफ्टवेअर शिकायला सुरुवात करून एक महिन्यात डोनट व कॉफी कपचे थ्रीडी मॉडेल बनवून आमच्यापुढे थाटात पेश देखील केले!
संध्याकाळी आल्यावर त्याचे खेळणे, घरी दिलेला अभ्यास हे सगळं करता करता तो इतका दमून जायचा की त्या कल्पना हवेत विरून जायच्या! त्याची दमछाक आणि मनातील कल्पना प्रत्यक्षात आणता येत नसल्याने होणारी घुसमट आम्हाला अस्वस्थ करत होती. ही घुसमट कमी करण्यासाठी आम्ही शिक्षणाचा खरा अर्थ, मुलांची शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी अभ्यासाला लागलो.
त्यामुळे मुले शाळेत आठ तास बसून ज्या गोष्टी करतात त्या घरी तीन ते चार तासात सहज होऊ शकतात हे आमच्या लक्षात आले. बरं मुलांचे सामाजिकीकरण व्हावे म्हणून त्यांना शाळेत पाठवावे तर वर्गात शिक्षकांच्या दबावाने आणि पंधरा पंधरा मुलं कोंबलेल्या व्हॅनमध्ये काकांच्या दबावाने मुलांना एकमेकांशी बोलता सुद्धा येत नसेल तर सामाजिकीकरण कसे होणार उलट घृणाच वाढते हे आम्ही अनुभवले.
त्याची रोज होणारी चिडचिड बघून एक वर्ष स्नेहला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना होमस्कुलिंग हा शब्द सुद्धा आम्ही ऐकला नव्हता. आमची प्राथमिकता ही स्नेहच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद आणण्याला होती
आमचा अंदाज खरा ठरला. पहिल्या वर्षी आम्ही त्याला क्रमिक पुस्तकाच्या मदतीने शिकवत असताना अभ्यासक्रम तीन चार महिन्यात पूर्ण झाला आणि त्याला भरपूर मोकळा वेळ मिळाला. त्याचा उपयोग सकाळी उठल्यानंतर त्याला ज्या नाविन्यपूर्ण कल्पना सुचत होत्या, त्या प्रत्यक्षात आणायला होऊ लागला. एकामागून एक अनेक गोष्टी नुसत्या शिकत बसण्यापेक्षा त्यांचे आकलन करून घेण्याची त्याला सवय लागली. हा पहिल्या वर्षी आम्हाला झालेला होमस्कुलिंगचा सगळ्यात मोठा फायदा होता आणि तो बघूनच आम्ही होमस्कुलिंग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
Comments
Post a Comment