माणसाला किंवा खरं तर कोणत्याही सजीवाला सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती? याचा शोध घेतला तर निर्विवादपणे एकच उत्तर येईल, ते म्हणजे "स्वातंत्र्य".
प्रत्येक सजीव जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करून आनंदाने, समाधानाने तेव्हाच जगू शकतो, जेव्हा तो त्याचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असतो. माणसाच्या सातत्याने चालणाऱ्या संघर्षाचे मूळ जर आपण बघितले, तर ते त्याच्या स्वातंत्र्याच्या झालेल्या संकोचात सापडते.
माणूस त्याच्याही नकळत कधी गरजा वाढवून ठेवल्याने, खऱ्या गरजा ओळखता न आल्याने आर्थिक, सामाजिक पारतंत्र्यात अडकत जातो. नोकरीतून स्वातंत्र्य हवे असते पण कर्जाचे हप्ते बेडीचे काम करतात, शहरातील दगदगीने मन आणि शरीर थकून जाते, त्याला निसर्गातील मोकळ्या वातावरणाची ओढ लागते पण पुन्हा एकदा, नोकरी, व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणाच्या बेड्या आड येऊन, माणसाचे स्वातंत्र्य हिरावले जाते.
माणसाच्या आयुष्यात घडणारे असे सगळे संघर्ष स्वातंत्र्य नसल्यानेच निर्माण होतात, हे नक्की.
माणसाला शाश्वत समाधान व सुख मिळवून देऊ शकेल अशा स्वातंत्र्याचा पाया हा शिक्षणात आहे, असे मला वाटते. हे शिक्षण म्हणजे केवळ क्रमिक पुस्तकातून मिळणारे शिक्षण नाही तर माणसाला आयुष्यभर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लागणारे शिक्षण आहे. अनेकदा हे माहिती असून देखील आपल्या हातून शिकण्याचा कंटाळा केला जातो, दुर्लक्ष केले जाते याचे कारण हे आपण काय शिकायचे? याचा निर्णय आपल्या हातात नसणे, हेच असते.
माणसाला निसर्गतः स्वातंत्र्य प्रिय असते. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी, प्रत्येक माणसाकडे एक "रडार" असते. हे रडार म्हणजे "अँटी पर्स्युयेशन रडार"! इतरांनी आपल्याला कोणतीही गोष्ट करायला सांगितली रे सांगितली की ही गोष्ट सांगणारा आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणतोय असे आपल्याला वाटून, त्या माणसाचे "सांगणे" आपले हे रडार लगेच हाणून पडते!
त्यामुळे इतरांनी आपल्याला दिलेले सल्ले आपल्या फायद्याचे आहेत की तोट्याचे याचा फारसा विचार या रडार मुळे आपण करत नाही आणि आपल्याला हवे तेच करत राहतो.
शिक्षणाच्या बाबतीत देखील हेच लागू पडते. जर विद्यार्थ्याने मग तो कोणत्याही वयाचा असो, काय शिकायचे? कसे शिकायचे? कुणाकडून शिकायचे? याचे निर्णय स्वतः घेतलेले असतील, तर असे शिक्षण हे कायम विद्यार्थ्याला समाधान मिळवून देते. समाधान मिळणारे शिक्षण घेतल्याने पुढे जाऊन काय करायचे? याचे उत्तर देखील अशा विद्यार्थ्यांना मिळते.
कोणत्या क्षेत्रात काम करायचे? याचे स्वातंत्र्य असल्याने, उपजीविका म्हणजे तुरुंग न वाटता समाधान मिळवून देणारी गोष्ट वाटते. म्हणजेच माणसाचे स्वातंत्र्य अशा प्रकारे अबाधित राहू शकते.
थोडक्यात काय तर जन्मापासून स्वतंत्र आयुष्य जगणे ही माणसाची नैसर्गिक इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करायची असेल तर माणसाला हवे ते शिकण्याची संधी मिळणे व त्यातून हव्या त्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे ही त्याची मूलभूत गरज आहे.
ही मूलभूत गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकांना मदत करू शकलो, तर एक आनंदी व निकोप आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र समाजाची आपल्याला निर्मिती करता येईल.
चेतन एरंडे.
Comments
Post a Comment