अनेकदा शिक्षण याविषयावर चर्चेला सुरुवात झाली की ती पूर्वी शाळा या विषयावर येऊन थांबायची.
मागच्या काही वर्षात, विशेषतः कोविडनंतर, शिक्षण या विषयावर चर्चा करताना आता "शाळा की होमस्कूलिंग" अशी नव्या पद्धतीने चर्चा होऊ लागली आहे.
त्यामुळे दोन ध्रुव तयार होऊन दोन्ही ध्रुव आपापली पोझिशन बळकट करण्यासाठी आपापले मुद्दे मांडू लागले. यामध्ये "शिकण्याची भाषा" हा एक नव्याने ध्रुव तयार होत आहे, असे देखील वाटू लागले आहे.
कोणत्याही चर्चेत माझा एक कटाक्ष असतो —
ज्या व्यवस्थेचा आपल्याला अनुभव नाही, त्यावर शक्यतो आपले मत व्यक्त करू नये; किंवा केल्यास त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ द्यावा.
माझा गेल्या काही वर्षात शाळा या व्यवस्थेशी संबंध राहिलेला नाही, मात्र शिक्षणाशी आहे. त्यामुळे मी "शिक्षण" हा संदर्भ घेऊन माझे मत मांडायचा प्रयत्न करेन.
१. मुलांच्या शिक्षणाविषयी विचार करताना सगळ्यात आधी आपल्या मुलांविषयी आपल्याला सहवेदना असणे गरजेचे आहे.
२. या सहवेदनेने आपल्याला मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील अडथळे समजून घेणे आणि त्यांना नक्की कुठे मदत हवी आहे, हे समजणे सोपे जाते.
३. शिकणं ही जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी "नैसर्गिक" प्रक्रिया आहे.
या प्रक्रियेत वयानुसार, काळानुसार "कंटेंट" बदलत जाते, मात्र शिकण्याची "प्रक्रिया" ही शाश्वत असते.
अर्थात उत्क्रांतीच्या रेट्याने त्यात बदल होऊ शकतात, मात्र ते होण्यासाठी वेळ लागतो आणि असे बदल हे पूर्ण समाजाला लागू होतात.
४. म्हणूनच कोणत्याही काळात टिकून राहण्यासाठी कंटेंटपेक्षा शिकण्याची प्रक्रिया आत्मसात होणे आणि या प्रक्रियेचे मूल्यमापन गरजेचे आहे.
५. मुलांना जगण्यासाठी सरकारी व्यवस्थेशी डील करण्यापासून ते आहार, आरोग्य, नातेसंबंध, त्यांच्या मुलांचे संगोपन, घर घेणे, गाडी घेणे, म्हातारपणात करायची तरतूद, आर्थिक व्यवहार, आणि अशा अनेक गोष्टी "शिकाव्या" लागतात.
या गोष्टी कोणत्याच अभ्यासक्रमात नसतात.
६. माझ्या दृष्टीने शिक्षण म्हणजे:
आपण करत असलेल्या कोणत्याही गोष्टीचा हेतू समजून घेणे,
आपल्यापुढे असलेल्या पर्यायांमधून आपल्या हेतूशी जवळचा पर्याय निवडण्याचे कौशल्य मिळवणे,
एवढेच आहे.
हे कौशल्य ज्यांच्याकडे असते, ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःला निभावून नेतात.
७. शेवटचे आणि महत्वाचे:
शिकण्याच्या प्रक्रियेत सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर —
समोर आलेली माहिती "अनुभवून" मगच त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे आणि त्या माहितीला "ज्ञान" म्हणून स्वीकारणे.
येणाऱ्या काळात ज्या प्रमाणात माहितीचा लोंढा येणार आहे, ते बघता माहितीचा "अनुभव" घेऊन मगच स्वीकार करणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे.
म्हणूनच आपल्याला सगळ्यांनाच केवळ एका कोणत्या तरी व्यवस्थेवर, व्यक्तीवर अवलंबून न राहता, मुलांना अधिक अधिक अनुभव घेण्याची संधी देत त्यांना "सुशिक्षित" करावे लागेल.
— चेतन एरंडे
Comments
Post a Comment