Skip to main content

सर्जनशील पालकत्वाची सुरुवात...


पुढील लेख झी दिशा मध्ये नुकताच प्रसिध्द झाला होता. आमच्या सर्जनशील पालकत्वाच्या प्रवासाला सुरुवात नक्की झाली तरी कशी, हे मी या लेखातून मांडायचा प्रयत्न केला आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे होमस्कूलिंग व सर्जनशील पालकत्व या दोन्हीविषयी आम्ही लिहिणार आहोत, याचा हेतू, दोन्ही प्रवासाच्या वाटा जवळपास सारख्याच आहेत व एकमेकींशी गुंफल्या गेल्या आहेत,  हे वाचकांच्या लक्षात यावे हा आहे.

सर्जनशील पालक होताना..
स्नेह, म्हणजे माझा मुलगा दोन किंवा तीन वर्षांचा होता, तेव्हा मी माझ्या नोकरीतील कामाच्या निमित्ताने सतत बाहेरगावी असायचो. त्यामुळे त्याची सगळी जबाबदारी प्रीतीने, म्हणजे त्याच्या आईनेच घेतलेली होती. (आत्ता सुद्धा बऱ्यापैकी  तिच्याकडेच आहे!).
सतत आईबरोबर असल्याने ती त्याची जवळची मैत्रीण होती. तर मी म्हणजे कधीतरी घरी येणारा आणि थोडे दिवस आपले लाड करून, म्हणजे नवीन वस्तू किंवा खाऊ देऊन, लगेचच परत निघून जाणारा माणूस अशी  त्याची समजूत झाली होती. त्याच्या मनातील काही सांगायचे असेल तर तो पटकन आईकडे जायचा आणि त्याला कुठली नवीन वस्तु किंवा खाऊ आणायचा असेल तरच माझ्याकडे यायचा.


त्याच्या वयातील इतर मुलांप्रमाणे, तो अतिशय धसमुसळा किंवा hyperactive होता. मी सतत बाहेर असल्याने मला त्याच्या ऊर्जेशी कसे जुळवुन घ्यायचे हे अजिबातच कळायचे नाही . त्याच्या आईने मात्र ही कला चांगलीच अवगत केली होती . म्हणजे पोळ्या करताना त्याची होणारी लुडबुड, त्याला छोटे पोळपाट लाटणे आणून देऊन तर देवपूजा करताना होणारी लुडबुड त्याला देव हवे तिथे घेऊन जाण्याचा अधिकार देऊन थांबवली होती.

मी मात्र तो आसपास असेल तर, त्याच्या तावडीत माझा लॅपटॉप , चष्मा आणि मोबाईल लागू नये म्हणून जीवापाड प्रयत्न करायचो. तो पठ्ठया मात्र सगळा जोर लावून कधी माझ्यावर तर कधी माझ्या लॅपटॉप वर तुटुन पडायचा.

एकदा रात्री लॅपटॉप वर काम करत असताना अचानक त्याने माझ्या हातातून चक्क लॅपटॉप ओढला आणि माझी सहनशक्ती संपली. मी त्याला तसाच उचलला आणि तो आमच्या घराच्या ज्या अंधाऱ्या गॅलरीला प्रचंड घाबरायचा , तिथे नेऊन शब्दशः कोंडला. त्याचा तो बाबा नका ना कोंडू , परत अस नाही करणार " असा आर्त स्वरातला आरडाओरडा आणि दारावर जिवाच्या आकांताने मारलेल्या धडका, मी रागाच्या आहारी गेल्यामुळे माझ्यावर काहीच परिणाम करू शकल्या नाहीत .
पण आईची माया कामी आली. आईने दरवाजा उघडताच त्यानं आईला मारलेली मिठी आणि रडण थांबल्यानंतर सुद्धा सुरू असलेले, ठराविक अंतराने येणारे ते हुंदके सात वर्षांनंतरही आज मला स्पष्ट आठवतात.

त्यानंतर सुद्धा त्याला अधूनमधून चोप देऊन, त्याने मला जसं पाहिजे तसेच वागावे, असा प्रयत्न करुन , मी त्याचा बाप आहे, हे सिद्ध करतच होतो. 

आणि हे सगळं चालू असतानाच तो रविवार उजाडला. जेवण करून आम्ही निवांतपणे चॅनेल बदलत टीव्ही बघत होतो. अचानक आमचे लक्ष एका चॅनेलवर पालकांसाठी सुरु असलेल्या  कार्यक्रमाकडे गेले. त्या कार्यक्रमात राजीव तांबे पालकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना, मुलांची बाजू घेउन पालकांना झोडपताना बघून मी चांगलाच हादरलो. तुम्ही मुलांचे पालक असाल पण त्यांचे मालक नाही. तुमच्या मुलाला स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येक मुल त्याच्या गतीने शिकते. अशी एकामागून एक त्यांनी दिलेली उत्तरे ऐकताना, माझ्या कानात कुणीतरी गरम तेल ओततय असा भास होऊन माझे डोकं अक्षरश बधिर झालं. मी पालक म्हणून पहिल्यांदाच मुळापासून हादरलो.

माझा मुलगा माझ्यासारखाच किंवा माझ्याहून चांगला झाला पाहिजे म्हणून त्याला "शिस्त" लावण्याचा , “ संस्कार " करण्याचा प्रयत्न करणारा आणि आपले मूल म्हणजे आपलीच प्रतिकृती असते असा मानणारा माझ्यातला "पारंपारिक पालक" हे सगळं ऐकल्यावर पालकत्व ह्या विषयांवर सखोल विचार करायला लागला.

पुढचे तीन दिवस माझे कशातही लक्ष लागत नव्हते. मी ऑफिसमध्ये सुद्धा इंटरनेटवर फक्त पालकत्व ह्या विषयावर लेख, ब्लॉग, विडीओ असे मिळेल ते वाचत होतो,बघत होतो. त्याचबरोबर मी पालकत्वाशी संबंधित बरीच पुस्तके विकत आणली, वाचली आणि माझ्या सर्जनशील पालकत्वाच्या प्रवासाला सुरूवात झाली ..

आता मी घरी आल्यानंतर ऑफिसची काम करणे बंद करून त्याच्याशी भरपूर गप्पा मारणे, दंगा मस्ती करणे सुरु केले. माझ्या लॅपटॉप, मोबाईल, चष्मा ह्या वस्तूंची मी त्याला समजेल अशा भाषेत ओळख करून दिली, व ते किती काळजीपूर्वक वापरावे लागते, हे सागितले. 

मी इतके दिवस चारचौघांचे बघून त्याला बदलायचा प्रयत्न करत होतो आणि कदाचित त्यामुळेच त्याची घुसमट आणि चिडचिड वाढत होती . पण जेव्हा मी स्वतःला बदलायला सुरूवात केली तेव्हा पासून बरेचसे प्रश्न आपोआपच सुटले आणि पुढचा प्रवास धमाल आणि आनंददायी झाला .
त्या वयात स्नेहकडे शब्दसंपदा कमी असल्याने मनातील भावना शब्दात  सांगताना अडचणी येतात, व त्यामुळे त्याची चिडचिड होते, हे मला उमगले. पण तो चित्रातून खूप सहजपणे व्यक्त होतो, हेही समजले. त्याने चित्रातून का होईना पण व्यक्त होणे महत्वाचे, हे समजल्याने  घरातील भिंती त्याचा चित्र भाषेसाठी देऊन टाकल्या . त्यामुळे त्याची चिडचिड आणि हायपर ऍक्टिव्हिटी कमी झाल्याचे जाणवले .

सर्जनशील पालक होणे म्हणजेच  आपले मुल आहे तसे स्वीकारणे, केवळ इतर लोक काय करतात हे बघून आपल्या मुलांविषयी निर्णय न घेता , मुलांचा खरा आनंद कशात आहे हे ओळखणे आणि तो त्याला मिळावा म्हणून नवीन मार्ग किंवा पर्याय शोधणे हे आहे असे मला हळूहळू समजायला लागले.
आता मी "सर्जनशील पालक" झालेल्याला आणि स्नेहला कोंडून ठेवलेल्याला घटनेला जवळपास दोन वर्षे झाली होती.

मी त्याला सहज एक दिवस ऑफिसमध्ये घेऊन गेलो. त्याला माझ्या एका मित्रापाशी बसवून मी एका मिटींगला गेलो.
तेवढ्यात स्नेहने माझ्या मित्राला विचारले माझ्या बाबांचे सर" कुठे आहेत ? मला त्यांना भेटायचे आहे."
त्याला सरांना भेटायची संधी मिळताच तो म्हणाला तुम्ही माझ्या बाबांना शिक्षा करू शकता का ?"
हो, नक्कीच "
मग एक काम करा, त्यांना तुम्ही जिथे खूप अंधार आणि भूत असेल तिथे कोंडून ठेवा , त्यांनी पण मला असच कोंडल होतं ".

आपल्याला साध्या वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीचा मुलांच्या मनावर किती खोल परिणाम होतो आणि त्याचा बदला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घ्यायची कला त्यांना कशी जन्मजात अवगत असते, हे मला त्यादिवशी उमगले आणि त्यातून माझ्या सर्जनशील पालकत्वाच्या प्रवासाचा मार्ग मला अधिक स्पष्ट दिसू लागला.
©चेतन एरंडे.
  

Comments

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...