Skip to main content

होमस्कुलिंग वरील लोकसत्ता मध्ये आलेला माझा लेख..






परीक्षेत चांगले मार्क मिळवणे, विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे देणे, शाळेतल्या उपक्रमामध्ये भाग घेणे, हे सगळे करणारा, सगळ्या मुलांसारखा मुळातच हुशार असलेला एखादा मुलगा, शाळेत जाताना किंवा पुस्तक घेऊन अभ्यास करताना मात्र प्रचंड चिडचिड, त्रागा करत असेल, तर त्याच्या शिक्षणाची व चांगल्या शिक्षणावर अवलंबून असलेल्या त्याच्या "भविष्याची" काळजी वाटून, पालकांनी अस्वस्थ होणे, गोंधळून जाणे साहजिकच आहे.

आम्हीही तीन वर्षापूर्वी आमच्या मुलाच्या म्हणजेच स्नेहच्या बाबतीत असेच अस्वस्थ होतो. चार वर्षात चार शाळा बदलूनही, फरक पडत नव्हता. संपूर्ण आठवडा सुट्टी न घेता तो नियमित शाळेत गेला आहे असे कधीच झाले नाही. पुढचा मार्ग ठरवण्यासाठी, आम्ही पालकत्वाविषयी, मुलांच्या शिकण्याविषयी अनेक पुस्तके वाचली, प्रयोगशील शाळा बघितल्या, शिक्षणतज्ञांना भेटलो. त्यानंतर आम्हाला समजले की स्नेह्ला "शिकण्याचा" बिलकुल कंटाळा नाही तर ज्या "शिक्षणपद्धती" मधून तो शिकतोय त्या पद्धतीचा त्याला कंटाळा आहे. त्यामुळे शाळा बदलण्यापेक्षा, शिकण्याची पद्धत बदलण्याचे आम्ही ठरवले व स्नेहसाठी होमस्कूलिंग अर्थात स्वअध्ययन या पद्धतीची निवड केली.
 
आमच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांना, भविष्यासाठी जवळ कसलीही भरभक्कम आर्थिक तरतूद नसताना,एकुलत्या एक मुलाला प्रचलित शिक्षणपद्धतीतून बाहेर काढणे नक्कीच अवघड होते. म्हणूनच सुरुवातील एक वर्ष स्वअध्यन करूया, जमले तर ठीक, नाहीतर परत शाळा आहेच, असा विचार करून, जे  शाळेत शिकवतात तेच घरी शिकवायचे असे ठरवले.

आम्ही स्नेहसाठी तिसरीची क्रमिक पुस्तके विकत घेऊन घरातच त्याची "शाळा" घ्यायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी दोन महिन्यातच त्याने पुस्तकातील सगळा अभ्यासक्रम म्हणजेच "पुस्तकात विचारलेल्या प्रश्नांना, "अपेक्षित" उत्तर देण्याचा सोपस्कार" पूर्ण करून टाकला. पुस्तकात विचारलेले प्रश्न संपल्यामुळे उरलेले वर्ष कसे घालवायचे हा प्रश्न पडला. भरपूर मोकळा वेळ मिळाल्यामुळे स्नेहने स्वत:हुन पुन्हा क्रमिक पुस्तके उघडली आणि पुस्तकात विचारलेले पण त्याला पडलेले प्रश्न शोधले!

गणिताच्या पुस्तकातील बेरीज वजाबाकी, भाषेच्या पुस्तकातील म्हणी, वाक्प्रचार, विज्ञानातील पाण्याचे स्रोत, प्रदूषण, हवा, गंध या संकल्पना तसेच इतिहासातील व्यक्ती, ठिकाणे या सगळ्याचा, रोजच्या जगण्याशी नक्की काय संबंध आहे,याविषयी त्याचे कुतूहल वाढले. चार भिंतीतील शाळेची मर्यादा ओलांडल्या नंतर आता स्नेहचे कुतूहल शमवण्यासाठी आम्हाला क्रमिक पुस्तकांची  मर्यादा ओलांडावी लागली व आपोआपच शिकण्याच्या अमर्याद संधी  उपलब्ध झाल्या.

आईला स्वयंपाकघरात मदत करत असताना, स्नेहला पदार्थाच्या घन, द्रव, वायू या अवस्था, जिन्नस मोजायच्या लिटर, किलोग्राम, तोळा या वेगवेगळ्या मापन पद्धती काम करता करता, गप्पांमधून समजल्या. दुध किलोमध्ये व साखर लिटरमध्ये मोजली तर काय फरक पडतो, हे त्याला प्रत्यक्ष प्रयोग करून बघता आले. काड्यापेटीतील काड्या वापरून, तो त्रिकोण, चौकोन हे आकार व भौमितिक संकल्पना शिकू लागला. एकीकडे पुस्तकात शिकवल्या जाणाऱ्या संकल्पना तो आईबरोबर स्वयंपाकघरात शिकत असताना, दुसरीकडे जगण्यासाठी आवश्यक असलेले मात्र प्रचलित शिक्षण पद्धतीत साधा उल्लेखही नसलेले स्वयंपाकाचे कौशल्य शिकायला त्याने सुरुवात केली. वयाच्या दहाव्या वर्षी, वरण भाताचा कुकर लावणे, दुध तापवणे, प्रचंड भूक लागली असेल तर नुडल्स करून खाणे हे सुद्धा तो शिकला.

शाळेत जात नसल्यामुळे, परीक्षेचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे मार्क नव्हते व अर्थातच पहिला किंवा दुसरा नंबर नव्हता, कुणाशीही स्पर्धा नव्हती. त्यामुळे नवीन गोष्ट शिकण्याची सुरुवात पुस्तकातील धड्यापासून सुरु होऊन घोकंपट्टीच्या वाटेवरून जाऊन परीक्षेपाशी संपण्याऐवजी, ती मुळापासून शिकणे, पूर्णपणे आत्मसात झाल्याशिवाय पुढे न जाणे आपोआप घडू लागले. होमस्कुलिंग करताना मूल्यमापन परीक्षेच्या माध्यमातून होत नसले तरी आधी माहिती नसलेली एखादी नवीन गोष्ट, शिकल्यावर त्याची नोंद करणे, महिन्याच्या शेवटी किंवा गरज लागेल तशा त्या नोंदी तपासून घेणे, त्या नोंदीमध्ये गरज पडेल तसे बदल करून त्या अदयावत ठेवणे हे सुरु झाले. मोकळ्या वेळात केलेले बागकाम, ते करत असताना लावलेल्या रोपामध्ये झालेल्या बदलांची नोंद करण्याची त्याला लागलेली सवय यावेळी आम्हाला उपयोगी पडली.

परीक्षा, स्पर्धा नसल्यामुळे स्नेहला इतरांविषयी कधीच असूया वाटत नाही तसेच कुणीतरी माझ्या पुढे जाईल व मी मागे पडेन अशी भीतीही वाटत नाही. त्यामुळे त्याचा मित्रांशी असलेला संवाद खूपच निरोगी झाला. "हाताची घडी, तोंडावर बोट" या संस्कृतीची ओळख नसल्यामुळे, पुण्यात साहित्यिक, सांगीतिक, विज्ञानविषयक कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर पडलेले प्रश्न विचारताना किंवा वयाने मोठे असलेल्या व्यक्तींशी बोलून मनातील शंका दूर करून घेताना आवश्यक असलेला आत्मविश्वास त्याच्यामध्ये आपसूकच आला. अभ्यासाचा किंवा शिकण्याचा तणाव नसल्यामुळे मित्रांच्यात किंवा समाजात मिसळणे त्याला सहज व सोपे होत गेले.

स्नेह्ला होमस्कुलिंग म्हणजेच स्वअध्ययन पद्धतीने शिकवत असताना शाळा, परीक्षा, पुस्तके म्हणजे शिकण्याचे "साध्य" नसून अनेक साधनांपैकी एक "साधन" आहेत, हे आम्हाला समजले. त्यामुळे स्नेह्ला शिकण्याची इतर साधने म्हणजेच, हाताने काम करून शिकणे, नवनवीन ठिकाणी प्रवास करणे, आपल्या आवडीच्या विषयाशी संबधित कार्यक्रमांना हजेरी लावून नवीन गोष्टी शिकणे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना भेटून तसेच संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचे काम समजून घेतल्यामुळे स्नेहच्या शिकण्याची व्याप्ती वाढून ते सर्वसमावेशक झाले.

होमस्कुलिंग करतानाचे महत्वाचे निरीक्षण म्हणजे गणित, भाषा, विज्ञान व इतिहास हे विषय वेळापत्रकाच्या कप्प्यांमध्ये न अडकल्यामुळे इतिहास शिकता शिकता गणित तर विज्ञान शिकता शिकता भाषा शिकणे सुरु झाले. त्यामुळे "महत्वाचे" व "बिनमहत्वाचे" विषय अशी विभागणी होण्याची भीती टळली.

इतिहास, परिसर अभ्यास तर कधी भाषा या विषयात उल्लेख झालेली ठिकाणे प्रत्यक्ष बघायला जायला आम्ही सुरुवात केली. या ठिकाणापर्यंत जाण्याचा मार्ग शोधण्याच्या निमित्ताने स्नेह नकाशा वाचनाकडे वळला. प्रचलित नकाशे वाचन सुरु असतानाच त्याने गुगल मॅपचाही वापर सुरु केला. गुगल माप्च्या वापरामुळे जगातील कोणत्याही ठिकाणी एकटे जाऊन परत घरी येण्याचा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण झाला. गुगल मॅपचा वापर फक्त नकाशा म्हणून नाही, तर आपण जे ठिकाण शोधतो तेथील फोटो, हवामान, राहणीमान, प्रसिद्ध खाद्यपदार्थ वगैरे सगळीच माहिती मिळवण्यासाठी केल्यामुळे, भूगोल व जोडीला इंग्रजी भाषा हे विषय शिकण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता आला.

तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलते आहे, त्याच वेगाने आजकालची मुले ते आत्मसात करत आहेत, त्याचा चांगला तर कधी गैरवापरही करत आहेत, मात्र शाळेचे अभ्यासक्रम तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलत नसल्यामुळे बाहेरच्या जगात जे दिसते आणि पुस्तकात जे लिहिलेले असते यातील तफावत मुलांच्या सहज लक्षात येते. त्यामुळे त्यांना काही विषय किंवा एकूणच शिकणे कंटाळवाणे वाटू लागते. मात्र होमस्कुलिंग करत असताना, स्नेहचा अभ्यासक्रम ठरवण्याचे स्वातंत्र्य आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळते. नवनवीन संकल्पना वापरून शिकणे, शिकताना नवीन प्रयोग करणे आम्हाला सहज शक्य होते.

तंत्रज्ञानाचा शिकण्यात वापर सुरु केल्याने स्नेहला त्याच्या नावडत्या विषयाची नव्याने ओळख करून देणे आम्हाला सोपे जाऊ लागले. शाळेत असताना मराठी किंवा इंग्रजी भाषा हे विषय स्नेहला अजिबात आवडत नव्हते. तेच विषय स्नेह आता अवांतर वाचन करून व नियमित अवांतर लेखनाच्या माध्यमातून शिकला. अर्थात लिहिण्यासाठी वही पेना ऐवजी कॉम्पुटरचा किबोर्ड हे तंत्रज्ञान वापरायची आणि वाचण्यासाठी त्याला आवडतील तीच पुस्तके इंटरनेटवर वाचू देण्याची लवचिकता, होमस्कुलिंग अर्थात स्वअध्ययन या शिक्षण पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे आम्ही दाखवू शकलो व शिकण्यातील अडसर दूर करू शकलो.

आपल्या मुलांची प्रचलित शिक्षणपद्धतीत घुसमट होत आहे असे वाटणाऱ्या पालकांनी, होमस्कुलिंग या पर्यायाचा, आर्थिक स्तर, मातृभाषा किंवा शहरी ग्रामीण अशी भीती न बाळगता  बिनधास्त विचार करावा. ही शिक्षणपद्धती, मुलांचे कुतूहल जिवंत ठेवून त्यांना  स्व निर्मितीचा आनंद देण्यासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे, याची खात्री चार वर्षाच्या प्रवासानंतर आम्ही देऊ शकतो, हे मात्र नक्की!!

चेतन एरंडे.
chetanerande@gmail.com

Comments

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...