"होमस्कुलिंग करता आहात का? अरे व्वा छान छान."
"पण तुम्ही मुलाला ग्राउंड वगैरे लावा
बरं का? आणि खेळायला पाठवता ना खाली मुलांच्यात, तेवढे नक्की करत
जा."
"हो का, पण कशासाठी."
"कसं आहे, होमस्कुलिंग चांगलं
आहे हो, पण तो शाळेत जात नाही ना, मग त्याचे सोशलायजेशन होण्यासाठी तर हे केलेच पाहिजे, ना."
वारंवार हे ऐकल्यावर, मी या विषयावर
माझ्या ब्लॉगवर अतिशय सविस्तर लिहिले आहेच, पण तरीही काही मुद्दे पुन्हा एकदा नव्याने
समोर ठेवावे, म्हणून हा लेखनप्रपंच.
होमस्कुलिंग व सोशलायजेशन याचा विचार करताना सगळ्यांच्या मनात
एक लोकप्रिय गृहीतक असते, ते म्हणजे,
शाळेत गेले की मुलांचे (आपोआप) सोशलायजेशन होते.
आता एकीकडे हे गृहीतक आणि दुसरीकडे
वस्तुस्थिती यांचा विचार करूया.
वस्तुस्थिती १ - समाजात आज
होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांची संख्या नगण्य आहे. तरुण व मध्यमवयीन नागरिकांचा
विचार केला तर त्यामध्ये होमस्कुलिंग करणारे शोधणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई
शोधण्यासारखे आहे.
वस्तुस्थिती २ - आपल्या समाजाकडे आज
बघितल्यावर किती जण "सोशल" आहेत असे आपल्याला मनापासून वाटते? "मी
टू" असेल किंवा रेल्वे खाली चिरडून पन्नास लोकांना आलेला मृत्यू असेल किंवा
रस्त्याच्या कडेला साठत जाणारा कचरा असेल, बेशिस्त वाहतूक असेल, हे सगळे का घडते?
रेल्वेमधून चादरी आणि दिवे चोरीला का
जातात? एकीकडे मोठमोठ्या पार्ट्या, तिथे वाया जाणारे अन्न"दान"
आणि दुसरीकडे उपाशी मरणारी जनता हे चित्र का दिसते?
माणूस माणसाशी काही ना काही कारण काढून सतत भांडत का
असतो?
दोन्ही वस्तुस्थिती बघितल्या तर असे म्हणावे लागेल की
शाळा किंवा होमस्कुलिंग दोन्हीचा आणि सोशलायजेशनचा
काही एक संबंध नाही. कारण मुलांच्या जगात समाज म्हणजे फक्त "शाळा" नसते
तर आजूबाजूचे सगळे जग मिळून समाज तयार होत असतो. शाळा हा त्यांच्या दृष्टीने
समाजातील फक्त एक घटक असतो पण तो सर्वव्यापी नसतो.
जसं पोहोण्यासाठी पाण्यात उतरावं
लागतं, तसं सोशलायजेशन साठी समाजात
उतरावं लागतं, त्यासाठी मोकळा वेळ व संवाद साधण्याची कला, आत्मविश्वास आवश्यक
असतो. समोरचा माणूस समजून घेण्याआठी धीर कसा ठेवावा व वाईट अनुभव आल्यानंतरही पुढे
जाण्याची उमेद कायम कशी ठेवावी हे शिकावे लागते.
होमस्कुलिंग करत असताना मिळणारा मोकळा
वेळ, सतत
बाहेरच्या जगात वावरून नव्या गोष्टी शिकण्याची, नवीन लोकांना भेटण्याची "अपरिहार्यता" यामुळे या मुलांची व
त्या अनुषंगाने त्यांच्या पालकांची समाजात उतरण्याची प्रक्रिया सुरू राहते. रोज
रोज एकाच प्रकारच्या लोकांशी, मुलांशी संबध येण्याऐवजी नवीन माणसे, नवीन मुले व
त्यांच्या जोडीने येणारे नवे अनुभव यामुळे समाजात कसे वावरावे हे शिकणे सोपे जाते.
"चांगले काय" आणि "वाईट काय" हे समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या
क्षेत्रातील लोकांशी येणारा संबंध, यासारखी पर्वणी नाही.
शाळा असो वा होमस्कुलिंग, सोशलायजेशन ही
बंदिस्त, एकसुरी व रोज भेटणाऱ्या लोकांच्या सहवासात राहून घडणारी प्रक्रिया नाही. त्याच
बरोबर सोशलायजेशनची जबाबदारी
शाळेवर ढकलणेही चुकीचे आहे कारण मुलांचे "सर्वांगीण शिक्षण" ही शाळा,
पालक व समाज अशा तिन्ही घटकांची जबाबदारी आहे, केवळ शाळेची नाही.
शिवाय शाळा हा घटक मुलांच्या अध्ययन
क्षमता विकसित करून त्यांना चांगली नोकरी मिळावी म्हणून अस्तित्वात आला, त्यांचे सोशलायजेशन व्हावे म्हणून नव्हे, हे
कितीही कटू वाटले तरी सत्य आहे. म्हणूनच शाळा
मुलांचे मूल्यमापन हे त्यांच्या अध्ययन क्षमतेनुसार करतात, त्यांच्या सोशलायजेशन च्या क्षमतेवर नाही.
मुलगा हुशार आहे, पण वयानुसार तो
अजून "सोशलाइज" नाही, म्हणून ज्यावेळी
मुलांना पुन्हा त्याच इयत्तेत ठेवले जाईल, व त्याला सोशल करण्यासाठी शाळा अतिरिक्त प्रयत्न करेल त्या दिवशी मुले शाळेत जाऊन सोशल होऊ शकतात, हे केवळ गृहीतक न
राहता, एक वस्तुस्थिती होईल. तोपर्यंत शाळेत गेल्याने सोशलायजेशन होते, या भ्रमातून बाहेर येऊन, ज्यांना आपल्या मुलांचे सोशलायजेशन व्हावे असे वाटते, त्यांनी मुलांना
घेऊन प्रत्यक्ष "समाजात उतरणे" याला पर्याय नाही...
©चेतन एरंडे.

Comments
Post a Comment