"आमच्या मुलाचे
होमस्कुलिंग करायचे आहे, त्यासाठी आम्ही काय करू ते सांगा." अशी विचारणा आम्हाला
पालक करतात. गेली चार वर्षे आमच्या मुलाचे म्हणजे स्नेहचे होमस्कुलिंग करत असताना
सुरुवातील नवलाई म्हणून भेटायला येणारे पालक आता खरोखरच या पर्यायाचा गंभीरपणे
विचार करू लागल्याने भेटायला येतात, असे जाणवू लागले आहे.
वेगवेगळ्या कारणाने
सातत्याने छोटी होत जाणारी कुटुंबे, त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाविषयी
जागरूक झालेले पालक, नोकरीच्या ठिकाणी रोज नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानामळे होणारे
बदल व त्या तुलनेत मागे असलेली शिक्षणपद्धती, यामुळे अनेक पालक आज अस्वस्थ आहेत.
दुसरीकडे स्मार्टफोन,
स्मार्टटीव्ही, लॅपटॉप या माध्यमातून मुलांना
तंत्रज्ञानाची खूपच जवळून ओळख होऊ लागली आहे. त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट
शिकण्याची त्यांची प्रक्रिया व पद्धत खूप वेगाने उत्क्रांत होत आहे. या प्रक्रियेत
प्रचलित शिक्षण घेणे अनेक मुलांना अडचणीचे जात आहे..त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर
वापर होत नसल्याने त्यांची घुसमट होत आहे.
सुदैवाने आज अनेक
पालकांच्या लक्षात ही घुसमट येत आहे व त्यांच्या परीने ते शाळा बदलणे, मुलाला
परीक्षेचा ताण येणार नाही हे बघणे असे प्रयत्न करत आहेत. मात्र हे प्रयत्न करुनही
काही उपयोग होत नाही, हे बघितल्यावर मात्र
पालक हतबल होतात. या हतबलतेवर उपाय शोधता शोधता समोर येते ते म्हणजे होमस्कुलिंग.
आम्ही सुद्धा या सगळ्या
प्रवासातून होमस्कुलिंग पर्यंत येऊन पोहोचलो. सुरुवातीला आमची मध्यमवर्गीय
पार्श्वभूमी, त्यातून मुलाला असे शाळेतून काढायचे, मग त्याच्याकडे सर्टिफिकेट नसणार, मग त्याला नोकरी कोण देणार? अशा परिस्थितीत त्याचे भविष्य पणाला
लावण्याचा निर्णय घेणे नक्कीच अवघड होते. त्यामुळे एक वर्ष करून बघू, नाहीतर आहेच
परत शाळा, असा विचार करून आम्ही उडी घेतली. सुदैवाने स्नेह्ने दिलेला प्रतिसाद व
त्याच्यात वेगाने होत गेलेले बदल, यामुळे एक वर्षासाठी सुरु केलेला हा प्रयोग चार
वर्षे झाली तरी अजूनही सुरु आहे.
सुरुवातीला आम्ही क्रमिक
पुस्तकाच्या मदतीने स्नेहला शाळेत शिकवतात तसेच घरी शिकवायचो. पण हे करायला काही
पूर्ण दिवस लागायचा नाही. त्यामुळे त्याला भरपूर मोकळा वेळ मिळू लागला आणि स्नेहची
खऱ्या अर्थाने शिकण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्या मोकळ्या वेळात त्याने त्याच्या
कल्पना कधी खेळाच्या, कधी चित्राच्या, कधी लिहिण्याच्या तर कधी आमच्याशी गप्पा
मारण्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणायला सुरुवात केली.
याचा प्रचंड मोठा फायदा
म्हणजे त्याची अस्वस्थता, चिडचिड पूर्ण बंद झाली. आमचा सुरुवातील असलेला
शिकवण्याचा उत्साह आता कमी पडू लागला होता. मात्र आता त्याच्या शिकण्याची जबाबदारी
अगदी नकळत त्याने स्वत:च घ्यायला सुरुवात केली. कधी एखाद्या कार्यक्रमाच्या
निमित्ताने, कधी युट्युबवर व्हिडियो बघताना तर कधी एखादे पुस्तक वाचताना तो त्याच्या
मनाला साठलेले प्रश्न व मिळणारी माहिती यांचा ताळमेळ घालायला शिकला. त्यातून
त्याचे आकलन वाढायला लागले.
आम्ही दोन तीन वर्ष भाषा,
गणित, विज्ञान, परिसर अभ्यास असे वेगवेगळे विषय त्याला शिकवायचा प्रयत्न करत होतो,
कारण आमच्या मनात अजूनही प्रचलित शिक्षणपद्धती कुठेतरी घर करून होती. इथे मात्र स्नेहने
विषयांचे कप्पे न करता जेव्हा गरज पडेल तेव्हा जिथे जशी संधी मिळेल तसे शिकायला
सुरुवात केली. त्याला पोहायला शिकता शिकता विज्ञानातील एखाद्या प्रश्नाचे उत्तर
मिळत होते. नवीन नाटक बसवताना हिशोब जुळवता जुळवता गणित शिकले जात होते तर भटकंती
करता जैवविविधता, परिसर अभ्यास असे अनेक विषय अगदी बेमालूमपणे मिसळून शिकताना
त्याचा खऱ्या अर्थाने "मुक्त
शिक्षणाचा" प्रवास सुरु केला.
या सगळ्या प्रवासात आमचे
काम म्हणजे त्याला विचारप्रवृत्त करतील अशा गोष्टी त्याच्या आजूबाजूला असतील,
त्याला नवीन ठिकाणे बघायला मिळतील, नवीन मित्रांचा सहवास मिळेल व स्वातंत्र्य व
जबाबदारी यांचे भान राहील असे वातावरण निर्माण करणे.
"बाकी सगळे ठीक आहे हो
पण ते इंग्रजी मुलांना शिकवायला आम्हाला कसे जमणार?" असा प्रश्न जेव्हा पालक
आम्हाला विचारतात तेव्हा चार वर्ष होमस्कूलिंग केल्यानन्तर आम्ही खात्रीने सांगू
शकतो की तुम्हाला हे शिकवायचे नाहीच आहे. शिकण्यासाठी तुमच्या मुलाला नक्की कोणती
पद्धत आवडते, याचे फक्त तुम्हाला निरीक्षण करायचे आहे. एकदा ते समजले की त्या पद्धतीने
मुलाला शिकण्यासाठी वातावरण निर्माण करून दिले की गणित, इंग्रजी काय अगदी जर्मन सुद्धा
मुले स्वत:हून शिकतात.
आपल्या मुलांची तुलना इतर
मुलांशी न करता त्यांना त्यांच्या कलाने व गतीने शिकण्याची मुभा द्यायची तयारी असेल,
काळाप्रमाणे सतत बदलण्यासाठी विद्यार्थी म्हणून जगण्याची तुमची तयारी असेल व
मुलाचा आनंद ज्यात आहे आहे, ते करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाचे
होमस्कुलिंग करू शकता.
राहिला प्रश्न शिक्षण पूर्ण
करून पुन्हा प्रचलित नोकरी व्यवसायात ही मुये टिकतील का? हाच, होमस्कुलिंग करत
असताना पालक जर मुलांना योग्य वातावरण म्हणजेच मोकळा वेळ, झपाटलेल्या लोकांची संगत
व ठिकाणे उपलब्ध करून दिले तर ही मुले स्वयंप्रेरित होतात. त्यामुळे प्रचलित
उपजीविकेची वाट न धरता ही मुले त्यांच्या आवडीनुसार अनवट वाटा निवडतात
"शिकण्याची पद्धत
मुलांच्या आवडीचे असणे" यापेक्षा शिकण्याच्या प्रक्रियेत दुसरे काही महत्वाचे
असू शकेल,असे आम्हाला अजिबात वाटत नाही. मुलांना त्यांना हव्या त्या पद्धतीने शिकू
देण्याच्या प्रवासात आत्तापर्यंत असलेला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे परीक्षा व सर्टिफिकेटचे काय?हा पालकांच्या मनात असलेला प्रश्न होता.
सुदैवाने महाराष्ट्र
सरकारने नुकतेच मुक्त शिक्षण बोर्ड सुरु केले आहे. मुलांना आता पाचवी, आठवी, दहावी
व बारावीच्या परीक्षा त्यांच्या गतीने व कलाने देण्याची संधी या बोर्डाने उपलब्ध
करून दिली आहे. त्यामुळे होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांच्या परीक्षा, सर्टिफिकेट व त्या
अनुषंगाने भविष्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. त्यामुळे आता निश्चिंतपणे पालक मुलांच्या
शिकण्याच्या प्रक्रियेकडे "मुक्तपणे" बघू शिकतात, हे नक्की!
चेतन व प्रीती एरंडे.
Comments
Post a Comment