"माझा मुलगा शाळेत
जायला तयारच होत नाही हो. तसा अभ्यासात चांगला आहे, परीक्षेत मार्क सुद्धा चांगले
मिळवतो, पण शाळेत जायचा मात्र प्रचंड कंटाळा करतो, आम्ही काय करू?" आम्ही
आमच्या मुलाचे म्हणजे स्नेह्चे, गेली चार वर्षे होमस्कुलिंग करत असताना, आम्हाला
भेटायला येणारे बहुतेक पालक याच वाक्याने सुरुवात करतात!
ते सांगतात यात नक्कीच तथ्य
असते. याचे कारण काय असावे? हा विचार करता करताना मी पंधरा वीस वर्षे मागे गेलो.
त्या काळी मुलांना बाहेरच्या जगाची माहिती करून देणारे एकमेव केंद्र होते ते
म्हणजे शाळा. शाळेत वयानुसार इयत्ता ठरतात. इयत्तेनुसार कोणती व किती माहिती मुलांना
द्यायची याचे प्रमाण ठरते. त्यामुळे पाचवीतल्या मुलाला "पाऊस कसा पडतो?"
याची असलेली माहिती, दुसरीतल्या मुलाला असेलच असे नाही.
मात्र तंत्रज्ञानातील बदलांचा
अफाट वेग, स्मार्टफोन व इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना युट्युब सारखे उपलब्ध
झालेले माध्यम त्यामुळे कोणत्याही वयाच्या मुलाला हवी ती "माहिती" सहज
उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे शिकण्याला असलेली वयाची, वेळेची, पुस्तकाची मर्यादाच
कोलमडून पडली.
इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या
प्रमाणावर उपलब्ध असलेले, आजकालच्या पिढीला सहज "समजेल" अशा पद्धतीने
माहिती पुरवणारे असंख्य मोफत व्हिडियो, गुगल व विकिपीडियासारख्या माहितीच्या
स्त्रोतानी मुलांची शिकण्याची प्रक्रिया व वेग पुरता बदलून टाकला आहे. त्याच
जोडीला मुलांना त्यांचे आकलन पडताळून पाहण्याची संधी देणारे अनेक उपक्रम विज्ञान
शिबिरे, वाढलेले पर्यटन, नावाजलेल्या व्यक्ती व संस्था यांचा इंटरनेटमुळे मुलांशी
वाढलेला संवाद यामुळे मुलांची शिकण्याची पद्धत वेगाने उत्क्रांत होत आहे.
त्यामुळे केवळ माहिती गोळा
करण्यासाठी मी शाळेत का जाऊ? त्यापेक्षा तोच वेळ मी मी माझ्या पद्धतीने, गतीने व
कलाने ती माहिती मिळवून, मोकळ्या वेळेत ती माहिती खेळाच्या, प्रयोगांच्या,
गप्पांच्या, चित्रांच्या माध्यमातून तपासून बघण्यासाठी वापरेन. हा विचार मुलांच्या
मनात खूप प्रकर्षाने येऊ लागला आहे व म्हणूनच शाळेत जाण्याचा कंटाळा करण्याचे
प्रमाण वाढले आहे, असे माझे निरीक्षण आहे.
कुठल्याच पालकाला आपल्या
मुलाने असे दु;खी होऊन शिकावे असे वाटत नाही. म्हणूनच ते शाळा बदलणे वगैरे पर्याय
वापरून काही उपयोग होत नाही, हे बघून होमस्कुलिंगचा पर्याय निवडण्याची चाचपणी करू
लागतात. मात्र हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी आत्तापर्यंत पालकांपुढे सगळ्यात
मोठा अडथळा होता तो म्हणजे परीक्षा व प्रमाणपत्र कसे मिळवायचे हा.
सुदैवाने महाराष्ट सरकारने
नुकत्याच सुरु केलेल्या मुक्त शिक्षण बोर्डामुळे पालकांच्या मनातील परीक्षा व प्रमाणपत्र
याविषयीची भीती काढून टाकायला मदत होत आहे. या बोर्डाच्या माध्यमातून मुलांना
पाचवी, आठवी, दहावीच्या परीक्षा मराठी व इंगजी माध्यमातून देता येणार आहेत.
बोर्डाकडून मिळणारे प्रमाणपत्र हे प्रचलित
माध्यमिक बोर्डाशी समकक्ष असणार आहे. मुक्त शिक्षण बोर्डाचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य
म्हणजे मुलांना विषय निवडायचे व परीक्षा कधी द्यायची याचे असलेले स्वातंत्र्य. यामुळे
परीक्षा व प्रमाणपत्र हे शिक्षणाचे साध्य नसून ते केवळ मूल्यमापनाचे एक साधन आहे,
ही अनेक शिक्षणतज्ज्ञांनी मांडलेली कल्पना
प्रत्यक्षात येत आहे.
महाराष्ट्र सरकारचे मुक्त
शिक्षण बोर्ड सुरु होण्याआधी अगदी १९९२ पासून एनआयओएस या केंद्रीय मुक्त शिक्षण
बोर्डाच्या माध्यमातून परीक्षा देण्याची व समकक्ष प्रमाणपत्र मिळवायची सोय होतीच.
मात्र या बोर्डाच्या अभ्यासकेंद्राची अत्यल्प संख्या, मातृभाषेतून शिक्षण संधी नसणे
यामुळे हे बोर्ड विद्यार्थी व पालकप्रिय व्हायला कमी पडले. महाराष्ट्र सरकारच्या
मुक्त शिक्षण बोर्डाच्या माध्यमातून घराच्या जवळ उपलब्ध होणारे केंद्र व
मातृभाषेतून शिक्षणाची संधी यामुळे अनेक मध्यमवर्गीय पालकांना होमस्कूलिंगचा
निर्णय घेणे सोपे होणार आहे.
शिक्षणाचा हक्क म्हणजे फक्त
शाळेत जाण्याचा हक्क नसून, दर्जेदार, मुलांच्या कलाने व गतीने शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. एखाद्या मुलाला काही कारणाने जर शाळेत, शारीरिक व मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असल्याने तो शिकण्याचा आनंद मिळवू शकत नसेल, तर त्याने काय करायचे? याविषयी सर्व शिक्षण हक्क
कायद्यात म्हणावा तसा उहापोह झालेला नाही. मुक्त शिक्षण बोर्डाच्या
माध्यमातून हा उहापोह व्हावा व या बोर्डाने आता मुलांना खरोखर "मुक्त"
शिक्षण मिळण्यासाठी एक जिवंत व्यासपीठ म्हणून काम करावे, अशी होमस्कूलिंग करणाऱ्या
पालकांची अपेक्षा आहे.
प्रचलित शिक्षणव्यवस्थेच्या एकूण आकारामुळे जे
कालसुसंगत बदल तिथे घडवणे अशक्य आहे, ते बदल घडवायची व्यवस्था मुक्त शिक्षण बोर्ड व त्याची
अभ्यासकेंद्रे करणार असतील, तरच हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक पाऊल ठरेल. नाहीतर मुक्त शिक्षण
बोर्डाचा वापर फक्त सर्टिफिकेट मिळवण्याचा एक पर्याय म्हणूनच केला जाईल, हे नक्की.
असे होऊ नये म्हणून या
बोर्डाने मुलांना अभ्यासकेंद्रात प्रचलित अभ्यासक्रम न राबवता, भारत सरकारने
"स्वयम"च्या माध्यमातून, नामाकित विद्यापीठाच्या मदतीने, विद्यार्थ्यांना
आवडीच्या विषयात शिक्षण देण्याची मुक्त व मोफत ऑनलाईन व्यवस्था निर्माण केली आहे,
त्याच्याशी अभ्यासकेंद्रे जोडावीत व खऱ्या अर्थाने शिक्षण मुक्त करावे.
आम्ही चार वर्षापूर्वी
स्नेह्चे होमस्कूलिंग करायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या वयाचा दुसरा होमस्कुलर
आमच्या घरापासून दहा किलोमीटरवर होता. आज चार वर्षांनी आमच्या घरापासून दोन
किलोमीटरच्या अंतरावर स्नेहच्या वयाची अजून चार मुले होमस्कूलिंग करत आहेत आणि
दरवर्षी यात भर पडत आहे! केवळ परीक्षेचे काय हा प्रश्न सुटत नसल्याने सीमारेषेवर
असलेले अनेक जण आता महाराष्ट्र सरकारच्या मुक्त शिक्षण बोर्डामुळे आश्वस्त होतील व
होमस्कूलिंगचा निर्णय घेतील, असे पालकांशी बोलताना जाणवत आहे. माझ्या
अंदाजाप्रमाणे महारष्ट्रात येत्या पाच वर्षात मुक्त शिक्षण घेणाऱ्या मुलांची
संख्या ही हजारोंच्या संख्येत असेल.
अजूनही अनेक पालकांना केवळ
मुक्त शिक्षणाच्या पर्यायाविषयी खात्रीशीर मार्गदर्शन मिळत नसल्याने ते आला दिवस
ढकलत आहेत. मुक्त शिक्षण बोर्डाने जर आपल्या मुलांना पर्यायी शिक्षण देत असलेल्या
पालकांच्या मदतीने खात्रीशीर मार्गदर्शनाची व्यवस्था उभी केली, तर भविष्यात
होमस्कुलिंगच्या चळवळीला अजून बळ मिळेल.मुलांना तणावरहित, स्वतंत्र विचार करायची
संधी देणारे, स्वत:च्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्याची संधी देणारे व तुलना
नसल्याने स्वकेंद्रित न होता मुलामध्ये समाजभान जागवणारे मुक्त शिक्षण ही आता
काळाची गरज आहे व मुक्त शिक्षण बोर्ड ही गरज पूर्ण करेल अशी आशा ठेवायला सध्या तरी
हरकत नसावी!
©चेतन एरंडे.
यामध्ये देशभरात कार्यरत शाळांचे लॉबी आड येणार नाही का ?
ReplyDelete