शिकण्याचा विचार करताना दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.पहिली शिकण्याची प्रक्रिया व दुसरी म्हणजे शिकण्याची साधने.
शिकण्याची साधने ही काळानुसार बदलत जाणारी गोष्ट आहे तर शिकण्याची प्रक्रिया तिचे मूळ स्वरूप न बदलता केवळ उत्क्रांत होत जाणारी गोष्ट आहे.
शिकण्याची साधने जशी की क्रमिक पुस्तके, शिक्षकांच्या सूचना, परीक्षा ही मुख्यतः शिकण्याची "मोजदाद" करून पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी वापरली जातात.
शिकण्याची प्रक्रिया ही मुळातच नैसर्गिक प्रेरणा आहे. त्यामुळे ती माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कळत नकळत पण सातत्याने वापरली जाते. साधने वापरून मिळवलेले शिक्षण जसे "मोजता" येते तसे शिकण्याच्या निसर्गदत्त प्रक्रियेतून मिळवलेले शिक्षण "मोजता" येत नाही.
पण गंमत म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याचा विचार केला तर मार्कांच्या रुपात मोजून मिळवलेल्या शिक्षणा पेक्षा, शिकण्याच्या निसर्गदत्त प्रक्रियेतून मिळालेले शिक्षण आपल्याला जास्त गरजेचे असते.
उदाहरणार्थ अनेक पर्यायातून योग्य पर्याय निवडण्याची क्षमता, इतरांना समजून घेण्याची क्षमता, काळानुसार स्वतः मध्ये योग्य ते बदल करण्याची क्षमता, चालण्याची, बोलण्याची, भावना योग्य प्रकारे व्यक्त करण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचे भीतीशी दोन हात करत, जोखीम घेत स्वतः च्या क्षमता ओळखण्याची व त्या वापरण्याची क्षमता.
बऱ्याच वेळा मार्क्स कमी असूनही किंवा प्रचलित शिक्षण कमी असूनही आयुष्यात मोठं यश मिळवलेली माणसे आपण बघतो. याचं कारण म्हणजे, जरी मोजता येणारे शिक्षण कमी असले तरी मोजता न येणारी शिकण्याची प्रक्रिया मात्र या माणसांना बरोब्बर समजलेली असते, ती त्यांनी आत्मसात झालेली असते.
मोजता येणारे प्रचलित शिक्षण कमी महत्वाचे आहे, असे मला म्हणायचे नाही. मात्र जर निसर्गदत्त शिकण्याच्या प्रक्रियेचा सरावाच्या संधीच मिळाल्या नाहीत व ही प्रक्रिया आत्मसात करता आली नाही, तर प्रचलित शिक्षण तुमच्यातील क्षमता पूर्णपणे वापरण्याची संधी द्यायला कमी पडते, हे नक्की.
मग प्रश्न उरतो तो हा की निसर्गाने दिलेल्या या निसर्गदत्त शिकण्याच्या प्रक्रिया समजून कशा घ्यायच्या हा. त्याविषयी पुढच्या भागात..
©चेतन एरंडे.
आपल्या शिक्षणपद्धतीत मुलांच्या स्वयं अध्ययनाचा विचार केलेला आहे पण शिक्षक परंपरागत शिक्षण देण्यात समाधान मानतात.असे माझे वैयक्तीक मत आहे
ReplyDeleteनक्कीच, निसर्गदत्त शिक्षण वरदान आहे, परंतु स्वतः पालक हे ज्या शिक्षण पद्धतीने सुजान झाले आहेत, त्या पद्धतीत त्यांच्यात हा नवीन(आहे जुनाच, त्यांच्या दृष्टिकोनातून नवीन) संस्कार(दृष्टिकोण) रुजन्यास वेळ लागेल. जेंव्हा त्यांच्या समोर तुमच्या सारखे पालक पाल्य एक उदाहरण म्हणून पाहतील, तेंव्हा हळू हळू बदल स्विकारला जाईल!
ReplyDelete