नुकतंच आम्ही मंगलोरला गेलो असतानाचा हा किस्सा. मंगलोर हे भारतातील एक प्रसिद्ध बंदर आहे. किनाऱ्यावरच पोर्ट ट्रस्टचे एक मोठे आवार आहे. तिथे अनेक मोठमोठ्या मालवाहू जहाजांची ये जा सुरू असते.
आम्ही त्या किनाऱ्यावर गेलो असताना, मी गोव्यातील मरमगोवा पोर्ट ट्रस्टमध्ये एका कामासाठी गेलो असताना, तिथे छोट्या बार्ज मधून आयर्न ओअर कशी आणतात, हे सांगितले. ते ऐकताना, त्याचा चेहरा कुतूहलाने फुललेला बघून, ही त्याला "शिकवण्याची" एक चांगली संधी आहे हे हेरले!
मग मी त्याला आयर्न ओअर म्हणजे लोखंड बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल असतो, हे सांगून, माझ्याच सामान्य ज्ञानावर खूष होऊन, त्याला मी नवीन माहिती कशी दिली व त्याच्या ज्ञानात भर कशी घातली, या विचार करून, विजेत्याचे नजरेने बघू लागलो. अर्थातच माझ्या ज्ञानाचा साठा तिथेच संपल्याने, दोन मिनिटं शांतता पसरली..
पुढची सूत्र अचानकपणे स्नेहने हातात घेतली आणि आयर्न ओअर कन्व्हेअर वरून भट्टीत कशी नेतात, तिथे किती तापमान असते, मग त्याचे आयर्न गोट कसे बनवतात, ते गोट म्हणजेच, ट्रकवर आपल्याला दिसते ते रॉ लोखंड असते व त्यापासून वेगवेगळ्या फॅक्टरीत डाय वापरून, पाहिजे त्या वस्तू कशा बनवतात, हा सगळा प्रवास सांगितला.
मागे एकदा पण त्याने मला असंच पिस्टन म्हणजे काय, हे तुला माहिती आहे का असे विचारून पिस्टन वापरून सिलेंडर कसा बनवतात, हे सांगितलं होतं. दोन्ही वेळेस प्रीती सुद्धा आमच्या सोबत होती आणि तिच्यासमोर स्नेह वारंवार माझा इंजिनिअरिंग मधला अनुभव चॅलेंज करत असल्याने, मी चांगलाच त्रस्त झालो, खरं तर ओशाळालो.
आता माझे ओशाळणे झाकण्यासाठी, मी त्याला न राहवून त्याला विचारलं, "तुला हे सगळं कोण शिकवतं?"
"अरे मी माईनक्राफ्ट गेम खेळतो ना त्यात घर बांधायला लोखंड लागतं, त्यासाठी लोखंडाची फॅक्टरी टाकावी लागते, त्यामुळे मला हे समजलं शिवाय पिस्टन, हॉपर आणि कन्व्हेअर पण फॅक्टरीत लागतात, त्यामुळे मला ते सुद्धा समजलं."
त्याचं हे उत्तर ऐकून, त्याला गेम खेळताना बघून अस्वस्थ होणारा एक टिपिकल काळजीवाहू पालक म्हणून मला अनेक प्रश्न पडले.
पहिला म्हणजे, त्याला अनेक गोष्टींची मुळापासून माहिती आहे, हे याच प्रसंगातून नाही तर मागच्या वर्षभरात अनेक प्रसंगातून आम्हाला सुद्धा पहिल्यांदाच समजलं. मग ते "इतरांना" कसे समजणार?
दुसरा प्रश्न म्हणजे असल्या "ज्ञानप्रदर्शनातून" त्याची इयत्ता कशी ठरवायची?
शाळेत जात असता, तर त्याच्या मार्कलिस्ट बघून, या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती, इतरांनाही देता आली असती, मात्र होमस्कुलिंगमुळे तीही सोय नाही.
या अस्वस्थतेने मला टिपिकल पालकाच्या भूमिकेतून बाहेर खेचून एका स्वतः हून शिकणाऱ्या मुलाचा "सहकारी" म्हणून काही मूलभूत चिंतन करायला भाग पाडलं, आणि त्यातून..
क्रमशः
चेतन एरंडे.
Comments
Post a Comment