तुम्ही होमस्कुलिंग करत असाल आणि परीक्षाही देत नसाल, तर तुमचा मुलगा शिकतोय, याचा तुमच्याकडे कोणताच पुरावा नसतो. त्यामुळे मुलांना एक विशिष्ट कंटेंट म्हणजेच अभ्यासक्रम देऊन त्या कंटेंट मधले त्याने किती शोषून घेतले आहे, हे मार्कलिस्ट हा सोपा पुरावा वापरून सिद्ध करता न येणे, अनेकदा मुलाच्या शिकण्याविषयी तुमचा आत्मविश्वास डळमळीत करते.
मागच्या पाच वर्षात, एकीकडे स्नेहचे स्व अध्ययन सुरू असताना, दुसरीकडे आमचेही, शिक्षण म्हणजे नक्की काय, मुले स्वतः हून शिकतात म्हणजे नक्की कशी शिकतात, याविषयी सातत्याने अभ्यास सुरू होता. त्या अभ्यासाच्या आधारे शिकणे म्हणजे माहिती गोळा करणे व परीक्षेत ती माहिती जशीच्या तशी उतरवून जास्तीत मार्क मिळवून बुद्धिमता सिद्ध करणे नव्हे, एवढे समजले होते.
शिक्षण समजून घ्यायचे असेल, तर कंटेंट किंवा अभ्यासक्रम नाही तर शिकण्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे हेही मनाशी पक्के झाले होते. मात्र आम्ही जे शिकलो, ते अंमलात कसे आणायचे याबाबतीत मात्र आम्ही कमी पडत होतो. स्नेहने गेमच्या माध्यमातून असेल, इंटरनेटच्या माध्यमातून असेल, क्षेत्र भेटीतून असेल किंवा त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने जे शिकले असेल, ते पुन्हा कंटेंटच्या स्वरूपात बघायची सवय अंगवळणी लागल्याने, तो जेव्हा जेव्हा एखादे कंटेंट आम्हाला सांगायचा तेव्हा तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसत होता.
मात्र पुन्हा एकदा शांतपणे चिंतन केल्यानंतर तो काय शिकला हे बघायचे नसून, कसं शिकला हे समजून घेणे जास्त महत्वाचं आहे, हे आज जाणवतंय.
त्यामुळे इथून पुढे त्याने परत एखादा असा धक्का दिला तर आनंदाच्या उकळ्या फुटण्याची गरज नसून, तो ते कसं शिकला, शिकलेल्या गोष्टी त्याने रोजच्या जगण्यात कशा वापरल्या यांवर फोकस केला पाहिजे, हेही समजलं. त्यामुळे स्नेहच्या शिकण्याचे मूल्यमापन करून त्याचे मार्कलिस्ट कसे बनवायचे, हेसुद्धा डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागले.
स्नेह शिकत असताना, पुढील प्रक्रिया व्यवस्थित घडून येतात का? हे तपासणे व हे तपासताना, त्याच्या वयानुसार, मेंदूची वाढ व प्रगल्भता यांची जाणीव ठेवणे या गोष्टींच्या आधारे, आम्ही त्याचे मार्कलिस्ट बनवण्याचा प्रयत्न करून. या प्रक्रिया पुढीलप्रमाणे,
1. तो नवीन गोष्टी शिकण्याविषयी उत्सुक आहे की टाळाटाळ करतो?
2. आजूबाजूच्या जगाचे निरीक्षण करताना, त्याला एखादा प्रश्न पडला तर तो उत्तर शोधायचा स्वतः हून प्रयत्न करतो का? ते उत्तर मिळवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो का?
3. कोणताही निर्णय घेताना, एकापेक्षा अनेक पर्याय समोर आले तर तो योग्य पर्याय निवडण्यासाठी काय निकष लावतो?
4. त्याच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडूनही अपयश आले, तर तो त्या अपयशाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो की कुणाला तरी दोष देऊन, स्वतः ची सुटका करून घेतो?
5. अपयशातून तो काही धडा घेतो का?
6. पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून त्याला सतत कुणाकडून तरी कौतुक करून घ्यावेसे वाटते का?
7. होमस्कुलिंग करतो म्हणून आपसूक होणाऱ्या कौतुकाने, तो वाहवत जातो की, हे सगळे विसरून, सातत्याने व नव्याने प्रयत्नशील असतो?
8. निसर्गातील त्याचे स्थान व निसर्गातील इतर घटकांविषयी त्याला काय वाटते?
9. समाजात वावरताना, समाजाने स्वीकारलेले नियम तो पाळतो का? त्याचवेळी समाजात वावरताना त्याच्यावर अन्याय होणार नाही, याविषयी तो जागरूक आहे का?
10. आजूबाजूला रस्त्यावर येऊन लोकं आंदोलन करत असताना, लोकशाहीत आंदोलने ही रस्त्यावर नाही तर कोर्टात, मतपेटीतून व संसदेत केली गेली पाहीजेत, हे त्याला समजते का? स्वातंत्र्यपूर्व काळ व तेव्हाची आयुधे व आत्ताची आयुधे, यामध्ये फरक आहे, हे त्याला समजते का?
11. कोणत्याही माणसाकडे बघताना, तो पुरुष आहे का स्त्री, बहुसंख्याक आहे की अल्पसंख्याक, माझ्या विचारधारेचा आहे का नाही, माझ्या जातीचा आहे की नाही, हे निकष न लावता, केवळ इथून तिथून एकच असलेले होमोसेपीएन म्हणून त्या माणसांना समजून घेण्याचा, विवेकी मार्ग तो स्वीकारतो का?
या सगळ्या प्रक्रिया त्याच्या आत्ताच्या जगण्याशी जोडून विचार केला, तर आम्हाला असं वाटतं की, या प्रक्रिया घडून येण्यासाठी लागणारे सगळे रॉ मटेरियल त्याने व्यवस्थित जमा केले आहे. अजून एक दोन वर्षे कदाचित तो या प्रक्रिया वापरण्यासाठी आवश्यक पाया मजबूत करण्याचे काम करेल. त्यानंतर त्याची पौगंडावस्थेतील ऊर्जा, वरील प्रक्रियेतील कौशल्य आणि वयानुसार नैसर्गिकरित्या प्रगल्भ होऊ लागलेला मेंदू यांचा वापर करून, तो त्याचा मार्ग, त्याची पॅशन बरोबर ओळखेल व त्या मार्गावर चालण्यासाठी, जे काही करायचे आहे, ते पूर्ण ताकदीनं करेल, असे आम्हाला वाटते.
आणि हो तो गिफ्टेड आहे, बुद्धिमान आहे, या भ्रमातून आम्ही सुदैवाने लवकर बाहेर पडलो, तो या जगात त्याची जागा शोधून तिथे समाधानानं जगण्यासाठी धडपड करणारा, निसर्गाच्या इतर घटकांसारखाच एक घटक आहे, हेच आता आमचे मत आहे. त्यामुळे वरील सगळ्या प्रक्रिया जास्तीत जास्त नैसर्गिकरित्या घडू देण्यासाठी, वातावरण निर्माण करून देणे, एवढेच आमचे काम आहे, याची आम्हाला जाणीव आहे.
ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू शकलो तर निसर्गाने स्नेहच्या रुपात दिलेला एक ठेवा, एक समाधानी व सुजाण मानवाच्या स्वरूपात आम्ही निसर्गाला परत करू शकू व निसर्गाला त्याचे मार्कलिस्ट अभिमानाने दाखवू शकू, असा आम्हाला ठाम विश्वास आहे....
समाप्त
चेतन एरंडे
Comments
Post a Comment