ऑटोमेशन फिल्ड मध्ये काम करत असताना, बऱ्याचदा "टिच" शब्द वापरावा लागतो. वेगवेगळ्या सेन्सर्स व रोबोट्सना त्यांचं काम योग्य पद्धतीने करण्यासाठी आधी "टीच" करतात.
टीच करायचं म्हणजे काय करायचं, तर त्यांचे काम करण्यासाठी, त्यांना हवी असलेली माहिती फीड करायची आणि कोणत्या माहितीवर कोणती कृती करायची, हे त्यांच्या मेंदूत फीड करायचे. लक्षात घ्या, त्यांना फक्त, त्यांच्याकडून जे काम करून घेणे अपेक्षित आहे, तेवढीच माहिती दिली जाते आणि जी कृती अपेक्षित आहे, तेवढीच टिच केली जाते.
सेन्सर्स व रोबोट्स काम करत असताना, त्यांना टिच केलेल्यापेक्षा जर काही वेगळे समोर आले, तर ते "फॉल्ट" मध्ये जातात. कारण त्यांना "टीच" केले जाते, "लर्न" केले जात नाही.
टिचिंग आणि लर्निंग यामध्ये एक मूलभूत फरक आहे. टिचिंगमध्ये माहिती व कृती यांच्या सीमारेषा स्पष्ट असतात, त्या सीमारेषेबाहेर जाऊन कोणतीही माहिती देणे वा कृतीची अपेक्षा, ज्याला टिच केले जाते, त्याच्याकडून केली जात नाही.
मात्र लर्निंग मध्ये माहिती देण्याऐवजी, लर्नरला अवगत असलेल्या माहितीचे आकलन करण्यावर भर दिला जातो. त्याच्यावर एका चौकटीतील माहितीचा मारा न करता, त्याची चौकट सतत कशी विस्तारत जाईल व त्या विस्ताराने नवनवीन प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊन, त्याचे आकलन करण्यासाठी तो प्रयत्नशील कसा राहील हे बघितले जाते.
कोणताही सजीव हा नैसर्गिकरित्या लर्नर असतो, त्यामुळे त्याला तुम्ही त्याला केवळ माहिती सांगून त्या माहितीवर आधारित प्रश्न विचारत राहिलात तर नैसर्गिकरित्या तो शिकण्याविषयी अनुत्सुक होतो. त्यातून तो शिकण्याऐवजी ती माहिती घोकून फक्त प्रश्नांची उत्तरे द्यायची तयारी करून, त्याच्या असिमीत क्षमता, हरवतो किंवा त्या क्षमतांचे आकुंचन होते.
मी जे म्हणतोय, ते खरे आहे का, हे तपासून घ्यायचे असेल, तर तुम्ही मुलांना "शिकवत" असतानाचा त्यांचा चेहरा, तुम्ही मुलांना प्रश्न विचारल्यानंतरचा त्यांचा चेहरा व त्यांना मुक्तपणे प्रश्न विचारण्याची संधी दिल्यानंतरचा त्यांचा चेहरा, तपासून बघा.
तो चेहरा जे काही सांगेल ते वाचून मुलांना टीच करायचे की लर्न, हे नक्कीच वेगळे सांगावे लागणार नाही...
चेतन एरंडे.
Comments
Post a Comment