मुलं सातत्याने दिसेल त्याच्याविषयी प्रश्न विचारत का सुटत असावीत?
लहानपणापासून स्नेहच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं देताना हा प्रश्न मला कायम छळत आला आहे. त्याचे उत्तर मागच्या काही दिवसात मिळायला सुरुवात झाली आहे, असे मला वाटले म्हणून ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे.
या जगात आलेल्या प्रत्येक सजीवाला त्याच्या आजूबाजूच्या जगाविषयी प्रचंड कुतूहल असते. हे कुतूहल शमवण्यासाठी लहानपणापासून मुले दिसेल ती वस्तू हाताळून बघणे, चव घेण्याचा प्रयत्न करणे, तिच्यातून येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजाचा अंदाज घेणे, ती वस्तू सर्व बाजूंनी डोळे भरून बघून घेणे, असं करत असतात. त्यातून ती वस्तू पुन्हा समोर आली तर प्रतिसाद कसा दिला पाहिजे, हे ठरवणे मुलांना सोपे जाते.
अशा पध्दतीने आपल्या आजूबाजूचे जग समजून घेण्याचा प्रवास हा मूल जोपर्यंत बोलायला शिकत नाही, तोपर्यंत सुरू असतो. हा प्रवास तसं बघितलं तर इतर कोणत्याही प्राण्यांच्या पिल्लांसारखाच असतो. मात्र बोलायला शिकल्यानंतर एक मोठा फरक पडतो तो म्हणजे आजूबाजूचे जग समजून घेण्यासाठी ज्ञानेंद्रियांच्या जोडीने मूल भाषेचा वापर करायला शिकतं, प्रश्न विचारायला लागतं, आजूबाजूच्या जगाची ज्ञानेंद्रियाच्या मदतीने होणाऱ्या आकलनाचा विस्तार करायचा प्रयत्न करू लागतं.
तसं बघायला गेलं तर माणसाची ऐकण्याची, बघण्याची, वास घेण्याची व चव ओळखण्याची क्षमता इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच कमकुवत आहे. तरीही माणसाचे आकलन हे ही क्षमता अधिक असलेल्या प्राण्यांच्या तुलनेत अधिक सखोल आहे कारण तो केवळ ज्ञानेंद्रिय वापरून स्वस्थ बसत नाही तर प्रश्न विचारून, जे अनुभवलंय ते तपासू शकतो, त्याचा विस्तार करू शकतो.
आता डोळ्याचंच बघा ना. आपले डोळे जेव्हा एखादी वस्तू बघतात, तेव्हा आपण केवळ आपल्या डोळ्यांनी काय टिपले आहे त्यावरून त्या वस्तूचे आकलन करत नाही तर मेंदूच्या मदतीने डोळ्याने जे टिपले त्याविषयी आपल्याला असलेल्या माहितीचा वापर करून त्या वस्तूकडे एका परिपूर्ण नजरेने बघतो. डोळे त्या वस्तू विषयी मेंदूला जी माहिती देत नाहीत, ती माहिती मेंदू त्याच्याकडे त्या वस्तूला मिळतीजुळती माहिती वापरून एक परिपूर्ण चित्र तयार करतो.
हे परिपूर्ण चित्र तयार करण्यासाठी मेंदूला माहिती मिळाली कुठून? ही माहिती अर्थातच माणसाला मिळते, ते प्रश्न विचारण्यातून. प्रश्नाचे उत्तर हा नंतरचा भाग झाला. पण ज्ञानेंद्रियाच्या मर्यादा ओलांडण्याची नैसर्गिक कृती ही प्रश्न विचारण्यातून झाली. त्यातून मेंदूला माहिती मिळत गेली. ही माहिती मेंदूने ज्ञानेंद्रियांकडून आलेल्या माहितीच्या जोडीला वापरली आणि माणसाला इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक ताकद मिळाली.
हे फक्त डोळ्याच्या बाबतीत नाही, तर कान, नाक, स्पर्श व जीभ यांच्याविषयी सुद्धा तितकेच सत्य आहे.
थोडक्यात प्रश्न विचारणे हे मेंदूला अधिक सक्षम करण्याचे एक किंबहुना एकमेव म्हणूनच साधन आहे. आता विचार करा, दिसत असून डोळ्याला पट्टी बांधली, ऐकायला येत असून कानात बोळे घातले, तर काय होईल? सरळ ताटात आहे पण ओठांत नाही, अशी अवस्था होईल. क्षमता असूनही आपण तिचा पुरेपूर वापरच करू शकणार नाही.
मी पूर्वी स्नेहच्या प्रश्नांनी प्रचंड एरिटेट व्हायचो, कधी कधी तर त्याला दरडावून गप्प करायचो. पण आता जेव्हा जेव्हा त्याचे प्रश्न दाबून टाकण्याचा विचार माझ्या मनात येतो, तेव्हा तेव्हा मला, मी त्याला दिसत असूनही डोळ्यावर पट्टी बांधतोय किंवा ऐकायला येत असूनही त्याच्या कानात बोळे घालण्याचा गुन्हा करून त्याला अक्षम करतोय की काय, असं वाटू लागतो.
मग मी माझा त्रागा आवरता घेतो, त्याच्या प्रश्नांना मुक्त वाव देतो, उत्तर माहिती असेल तर लगेच देऊन टाकतो, नसेल तर एकत्र शोधायचा प्रयत्न करतो आणि माझ्या परीने त्याच्या मेंदूला, हे जग ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे जाऊन समजून घेण्यासाठी, जशी जमेल, तशी मदत करायचा प्रयत्न करतो...
टीप- मुले प्रश्न का विचारतात हे अप्रत्यक्षपणे समजून घेण्यासाठी मला ज्या टेडचा उपयोग झाला त्याची लिंक इथे देत आहे. त्याचबरोबर मुलांच्या प्रश्नांनी एरिटेट नाही तर उत्साही होण्याची प्रेरणा मला, नोबेल विजेते रिचर्ड फाईनमॅन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि प्रोफेसर डॉ. यशपाल यांचे विचार वाचून व ऐकून मिळाली.
चेतन एरंडे.
Where is the link it's not visible
ReplyDeleteWill you please share it again 🙏😊