दोन ब्लॉगपोस्ट मधून मी या विषयावर झालेले संशोधन व माझे वैयक्तिक अनुभव व निरीक्षणे या माध्यमातून या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत आहे.
जरूर वाचा. उपयुक्त वाटले तर नक्की शेअर करा.
आपलं मूल बोलायला जेव्हा सुरुवात करतं तेव्हा कसं बोबड बोलत असतं ना? ना शब्दांचा ताळमेळ, ना व्याकरणाचा गंध. पण म्हणून आपण त्याचं तोंड बांधतो का?
की आपण त्याच्या त्या शब्दांशी खेळायच्या कृतीचे भरपूर कौतुक करतो? त्याला शब्दांशी खेळायला अजून प्रोत्साहन देतो? की मूल अर्थपूर्ण वाक्य न बनवता, शब्दांशी खेळतंय म्हणून अस्वस्थ होतो?
शब्द उच्चरायला सुरुवात करण्यापासून पूर्ण अर्थपूर्ण वाक्य बोलायला कमीत कमी दोन वर्षे तरी जातात.आपण तेवढ्या वेळ थांबतो
अगदी तसंच मूल सुरुवातीला पुढं सरकायला लागतं, मग रांगायला, मग आधाराने उभं राहायला, आधाराने पुढं चालायला सुरुवात करतं. मग कसंतरी वाकडं तिकडं, कधी पळत तरी कधी पडत, पायांशी, हातांशी खेळत मग दोन एक वर्षांनी व्यवस्थित चालायला लागतं.
या प्रक्रियेत सुद्धा आपण त्या रांगणाऱ्या, धडपडणाऱ्या मुलाला चालत नाही म्हणून बेफिकीर म्हणतो की प्रोत्साहन देतो? चालण्याची प्रक्रिया शिकण्यासाठी म्हणून मूल हातापायाशी खेळतंय, या "खेळण्यातूनच" त्याचे चालण्यावर आणि शब्दांशी "खेळण्यातून" बोलण्यावर नियंत्रण येणार आहे, कौशल्य आत्मसात केले जाणार आहे, हे अनेक पिढ्यांच्या अनुभवाने, निरीक्षणाने पालक म्हणून आपल्याला उपजतच माहिती असते. म्हणूनच आपण त्याला "खेळायला" परवानगी देतो!
थोडक्यात काय तर शब्द वापरून बोलणे असो वा पाय वापरून चालणे असो, जी साधने आपल्याला एखादे कौशल्य शिकण्यासाठी मदत करणार आहेत, त्या साधनांशी सगळ्या खाचाखोचा लक्षात येईपर्यंत पोटभर खेळल्यानेच आपल्याला ते कौशल्य खऱ्या अर्थाने आत्मसात होई शकते ही निसर्गाने माणसाला दिलेली अंत:प्रेरणा म्हणजेच नॅचरल इन्स्टिकट आहे आणि म्हणूनच मुले त्यांना जगण्यासाठी, शिकण्यासाठी गरजेच्या प्रत्येक गोष्टीशी "खेळत" असतात.
काळानुसार ही साधने बदलत जातात. सध्याच्या काळाचे उदाहरण घायचे झाले तर पूर्वी मुले अभ्यासक्रमाची पुस्तके, वह्या अशी मुख्यतः "लिखित" स्वरूपातील साधने वापरत होती. आता मात्र मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने असेल किंवा बाहेरच्या जगाशी संपर्क करण्याच्या निमित्ताने स्मार्टफोन, लॅपटॉप अशी इलेक्ट्रॉनिक साधने मोठ्या प्रमाणावर वापरावी लागत आहेत. मोठ्या माणसांना देखील सध्या उपजीविकेसाठी असेल, संपर्कासाठी असेल, हीच साधने वापरावी लागत आहे.
अशा वेळी पालक म्हणून, शिक्षक म्हणून किंबहुना एक समाज म्हणून आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे, नॅचरल इन्स्टिकट चा विचार केला तर जोपर्यंत मुलांचे या इलेक्ट्रॉनिक साधनांशी पोटभर "खेळून" होत नाही, स्मार्टफोन, लॅपटॉप मधील बहुतेक फंक्शन आता आपल्याला समजली आहेत, ही साधने वापरण्याचे कौशल्य आपल्याला आत्मसात झाले आहे, हा आत्मविश्वास जोपर्यंत मुलांना येणार नाही, तोपर्यंत मुले ही साधने आपल्याला अपेक्षित आहे, त्याप्रकारे शिकण्यासाठी, अभ्यासासाठी वापरणार नाहीत.
क्रमशः
Comments
Post a Comment