पालक म्हणून, शिक्षक म्हणून किंबहुना एक समाज म्हणून आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे, नॅचरल इन्स्टिकट चा विचार केला तर जोपर्यंत मुलांचे या इलेक्ट्रॉनिक साधनांशी पोटभर "खेळून" होत नाही, स्मार्टफोन, लॅपटॉप मधील बहुतेक फंक्शन आता आपल्याला समजली आहेत, ही साधने वापरण्याचे कौशल्य आपल्याला आत्मसात झाले आहे, हा आत्मविश्वास जोपर्यंत मुलांना येणार नाही, तोपर्यंत मुले ही साधने आपल्याला अपेक्षित आहे, त्याप्रकारे शिकण्यासाठी, अभ्यासासाठी वापरणार नाहीत.
म्हणजेच हातात आलेले स्मार्टफोन, लॅपटॉप मुलांनी गेम खेळण्यासाठी वापरले असतील, युट्युब बघण्यासाठी वापरले असतील, मित्रांशी गप्पा मारण्यासाठी वापरले असतील, तर ते निसर्गनियमाला धरून आहे, हे समजून घ्यावे लागेल.
ही अंत:प्रेरणा समजून न घेता, तुम्ही मुलांना, स्मार्टफोनला, ऑनलाईन शिक्षणाला दोष देत असाल तर तुम्ही मुलांवर व आधुनिक साधनांवर फार मोठा अन्याय तर करत आहातच पण मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर दूरगामी नकारात्मक परिणाम करत आहात आणि म्हणूनच मुलांची शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया तुम्हाला समजून घेण्याची जास्त गरज आहे, असे मला जाणवले.
त्या जाणीवेतून घडलेली ही गोष्ट....
स्नेहच्या हातात आम्ही जेव्हा दोन वर्षांपूर्वी लॅपटॉप आणि स्मार्टफोन दिला. स्नेह अगदी मागच्या मे महिन्यापर्यंत या गोष्टींचा जास्तीत जास्त उपयोग गेम खेळण्यासाठी आणि युट्युबसाठीच करत होता. त्याचं हे वागणं जेव्हा आमच्यासाठी चिंतेचा विषय होऊ लागले, तेव्हा आम्ही या विषयाचा मानसशास्त्राच्या अंगाने अभ्यास सुरू केला आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे, आमची भेट इवोलुशनरी सायकॉलॉजीशी म्हणजे मानसशास्त्राचा उत्क्रांतीच्या अंगाने विचार करणाऱ्या शाखेशी झाली.
या शाखेची केवळ तोंडओळख करून घेत असतानाच आम्हाला उत्क्रांतीच्या अंगाने मुले कशी शिकतात? त्यासाठी कोणत्या नैसर्गिक अंत:प्रेरणा काम करत असतात? हे समजले. त्यामुळे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शिकण्याच्या किंवा एकूणच जगण्याच्या प्रक्रियेत आपण सगळे, कसा प्रतिसाद देतो? कोणती कृती करतो? हे आम्हाला समजू लागले.
या अभ्यासाला सुरुवात केल्याने आम्हाला स्नेहची शिकण्याची प्रक्रिया समजली, खेळण्याचा शिक्षणाशी किती जवळून संबंध आहे हे समजले, त्यामागचे विज्ञान समजले. त्यामुळे मग आम्ही स्नेहला, बोलायला आणि चालायला शिकताना जशी "खेळण्याची"संधी निसर्गतः दिली, तशीच संधी स्मार्टफोन व लॅपटॉप शिकण्यासाठी त्याच्याशी "खेळण्याची" संधी देण्याचे ठरवले, त्याच्यावर "विश्वास" ठेवायचे ठरवले.
सुदैवाने आमचा हा विश्वास तीन महिन्यांपूर्वी सार्थ ठरला. स्मार्टफोन व लॅपटॉप यांचा वापर नक्की कशासाठी केला तर भविष्यात आपल्याला फायदा होऊ शकेल? हे स्नेहला आता समजले आहे. आता त्याच्याकडे एकही गेम नाही. युट्युबचा वापर मनोरंजनासाठी आता तो फक्त शनिवार , रविवार करतो.
स्मार्टफोन, लॅपटॉप व इंटरनेटचा यांचा सुनियोजित वापर करून तो आता अनेक नवीन गोष्टी एखाद्या हावरटा सारखा शिकू लागला आहे कारण शिकण्याची भूक त्याला स्वस्थ बसू देत नाहीये!
हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन लर्निंग, हेच शिक्षणाचे भविष्य आहे. आज ना उद्या मुलांना हीच साधने वापरून शिकावे लागणार आहे. त्यामुळे या साधनांचा बागुलबुवा उभा करून मुलांना त्यापासून दूर ठेवण्याऐवजी, मुलांना या साधनांशी "खेळण्याची" संधी देणे गरजेचे आहे.
अर्थात हे करत असताना, ही साधने वापरताना काय काळजी घेतली पाहिजे? हे सांगण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. ती कशी, तर मूल चालायला शिकताना नुसते हात समोर ठेवून, त्याच्या चालण्याच्या प्रक्रियेत ढवळाढवळ न करता मूल धडपडण्याची शक्यता असेल किंवा ते मदत मागेल तेव्हाच ती देण्याची आपण जबाबदारी घेतो ना, अगदी तशी!
समाप्त.
Excellent thought in the last line. Chetan I too am homeschooling my 2 sons and I would like to be in touch for various projects with similar thinking people. We do share a WhatsApp group too.
ReplyDeleteNicely & Correctly explained.
ReplyDeleteThanks Chetan Sir for Wonderful Sharing.