आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग ३
अनेकदा
होमस्कुलिंग करण्याचा निर्णय आधी पालक घेतात
आणि मग तो मुलांना
सांगितला जातो. मात्र बेळगावच्या रावी कोडबागेच्या बाबतीत
हे एकदम उलटे होते.
शाळेत होणारी कुचंबणा, शारीरिक शिक्षा आणि जे आवडतंय
ते शिकायला न मिळणे यामुळे
कित्येक दिवसांपासून होमस्कुलिंग करायचा तिने तगादा लावला
होता. रावीच्या आईने मग वर्षभर
बेळगावमधील काही पालकांना सोबत
घेऊन शिक्षणावरील वेगवेगळी पुस्तके वाचली. मुलांचे भातलावणीपासून ते वेगवेगळ्या ठिकाणांना
एकत्र भेटी देण्याचे उपक्रम
आयोजित केले. मुलांना शाळेपासून स्वातंत्र्य दिल्यानंतर मिळणारा मोकळा वेळ कसा वापरायचा?
हे समजतंय व त्यासाठी त्यांना
आता आपण हवी ती
मदत करू शकतो ही
खात्री पटताच रावीला होमस्कुलिंग करायची परवानगी मिळाली. रावी सध्या तिच्यासारखे
बेळगावमध्ये अजून मित्र मैत्रिणी
मिळतात का याचा शोध
घेत आहे!
स्नेहच्याच
वयाचा मित चांदगुडे असाच
शाळेला कंटाळला. शाळा त्याला समजून
घेत नसल्याने व त्याला काय
करायचं आहे यापेक्षा शाळेला
काय हवंय हे त्याच्यावर
लादायचा प्रयत्न करत असल्याने तो
शाळेत जायचा कंटाळा करायचा. आई वडील दोघे
नोकरी करत असूनही मुलाला
शिकण्याचा कंटाळा येऊ नये तर
आनंद मिळावा म्हणून त्यांनी दोन वर्षांपूर्वी मितचे
होमस्कुलिंग सुरु केले. ज्या
मुलावर अभ्यासाचा कंटाळा करण्याचा आरोप केला जायचा
तोच मुलगा आता त्याच्या आवडीची
गोष्ट करायला सुरुवात केल्यावर तहानभूक हरपून तो गोष्ट पूर्ण
करायचा प्रयत्न करू लागला आहे.
याचा पुरावा म्हणजे त्याने तयार केलेल्या आर्ट
आणि क्राफ्ट ठेवायला आता त्यांच्या हॉलमध्ये
जागाच शिल्लक राहिली नाहीये!
एवढेच
नाही तर आई वडिलांनी
माझ्या आनंदाचा विचार केला ही गोष्ट
त्याला इतकी भावली की
शाळेत जाणाऱ्या मितपेक्षा होमस्कुलिंग करणारा मित आता आईशी
विश्वासाने अनेक गोष्टी शेअर
करू लागला आहे.
हा होमस्कुलिंगचा
मार्कांच्या कसोटीवर मोजता न येणार एक
मोठा फायदा आहे!
आयुष्यभर
कधीच पहिला नंबर न सोडलेल्या
आणि एका नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय
कंपनीत काम करणाऱ्या प्रसाद
व रूपा गुरव यांना शिक्षणाचे
व्यापारीकरण व मुलांच्या शिकण्याच्या
नैसर्गिक प्रक्रियेमध्ये शाळेच्या रूपाने निर्माण होणारा अडथळा अस्वस्थ करत होता. त्यांच्या
मुलीची म्हणजे वल्लरीची शाळेत जाताना वयाच्या चौथ्या वर्षी होणारी रडारड त्यांना अस्वस्थ करत होती. म्हणूनच
तिचे होमस्कुलिंग करून तिला नैसर्गिक
प्रेरणेने जगू देण्याचा निर्णय
घेतला. शिकणे ही सुद्धा नैसर्गिक
प्रेरणा असल्याने त्यासाठी आपण जबरदस्ती करण्याची
गरज नाही हे तत्व
त्यांनी पाळले. सहाव्या वर्षीच ती सहा भाषातून
बोलू लागली आहे! तिचे शेतीमुळे जमिनीचे होणारे नुकसान बघून व्यथित होणे,
तिच्या आकलनानुसार तिने उपाय सुचवणे
प्रसादला महत्वाचे वाटते. ही सहवेदनाचं वल्लरीला
यशस्वी विद्यार्थी बनवेल असे तो म्हणतो!
होमस्कुलिंग करणारी मुले
स्वतःच्या आवडीनिवडी ओळखून त्याप्रमाणे स्वतःहून शिकतात. मात्र याची अनुभूती यायला
आधी होमस्कुलिंगला सुरुवात करावी लागते आणि होमस्कुलिंग करायची इच्छा असली तरी दोन
महत्वाच्या गोष्टींमुळे पालक होमस्कुलिंग करायला धजावत नाहीत. त्यातील पहिली गोष्ट
म्हणजे अर्थातच परीक्षा आणि दुसरी म्हणजे सोशलायजेशन.
क्रमशः
चेतन एरंडे
Comments
Post a Comment