साधारणपणे मे महिन्यापासून होमस्कुलिंग विषयी चौकशी करणाऱ्या पालकांची संख्या वाढू लागते.
गेले वर्षभर माझा एकूणच सोशल किंवा एकूणच मीडियावरचा वावर कमी झाल्याने, फोन येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी तुरळक फोन्स अजूनही येत असतात.
होमस्कुलिंग सुरू करताना, पालकांच्या मनात अनेक प्रश्न असणे स्वाभाविक आहे. होमस्कुलिंग करण्याचा निर्णय घेण्यापर्यंत जेव्हा पालक येतात याचाच अर्थ प्रचलित शिक्षणव्यवस्थेने त्यांच्यापुढे असे काही प्रश्न उभे केले आहेत, ज्यांची उत्तरं आता व्यवस्थेबाहेर येऊनच शोधावी लागणार आहेत.
८ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा व्यवस्थेच्या बाहेर पडलो तेव्हा आम्ही बेसिक पूर्वतयारी केली असली तरी आज ज्या प्रमाणात रिसोर्सेस, माहिती आणि माहिती देण्याची तयारी असलेले पालक आहेत, तेव्हढे तेव्हा नव्हते.
त्यामुळे आता जे पालक होमस्कुलिंगचा निर्णय घेण्यापर्यंत आले आहेत, त्यांना या मार्गावर चालण्यासाठी अगदी हमरस्ता जरी नसला तरी किमान भरवश्याची पायवाट नक्की तयार झाली आहे.
त्यामुळे पालकांनी हा निर्णय घेताना जर थोडीशी पण योग्य तयारी केली तर त्यांचा पुढचा प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा होईल हे नक्की!
ही तयारी करायची तरी कशी?
होमस्कुलिंगचा निर्णय हा जर सुरुवातीलाच विचारपूर्वक घेतला, पुढील प्रवासाचे किमान ढोबळ नियोजन केले तर प्रचलित व्यवस्थेच्या बाहेर असल्याने पालकांच्या मनात निर्माण होणारा गोंधळ, बऱ्याच प्रमाणात कमी होऊन, आपली ऊर्जा आपण योग्य ठिकाणी लावू शकतो.
होमस्कुलिंगची तयारी किंवा निर्णय घेण्याची सुरुवात कशी करायची?
सुरुवात करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे, प्रत्येक मूल, प्रत्येक कुटुंब, आजूबाजूचे वातावरण हे "युनिक" असते. त्यामुळे होमस्कुलिंग करणाऱ्या एखाद्या मुलाने किंवा कुटुंबाने वापरलेली प्रोसेस, सगळ्यांनाच जशीच्या तशी लागू होऊन, सेम रिझल्ट मिळतील अशी अपेक्षा अजिबात ठेवू नये.
मग सुरुवात कशी केली पाहिजे?
यासाठी पहिला प्रश्न जो आपण स्वतःला विचारायचा आहे, तो म्हणजे मी होमस्कुलिंग करायचा निर्णय का घेतोय?
या निर्णयातून मला कोणते फायदे अपेक्षित आहेत?
जसे की मुलाला त्याच्या कलाने, गतीने शिकता यावे, मुलाला जास्त वेळ मिळावा, मुलाला हवं ते शिकता यावं, मुलाचं आरोग्य चांगले राहावे, पैसा सत्कारणी लागावा, इत्यादी.
आणि हो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहून ठेवायची आहेत कारण पुढचे नियोजन करण्यासाठी आपल्याला या प्रश्नांची उत्तरे पुन्हा पुन्हा "रिव्हिजिट" करावी लागणार आहेत.
या प्रश्नाचे उत्तर एकदा मिळाले की मग आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आहे.
तो आपण पुढील भागात बघूया..
क्रमशः
चेतन एरंडे.
Comments
Post a Comment