होमस्कुलिंगच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी, "होमस्कुलिंग करण्याचे नक्की कारण" आपल्याला माहिती असले पाहिजे, हे आपण मागील भागात बघितले.
हे कारण शोधत असताना, आमच्या अनुभवावरून मी असे सांगू शकतो की होमस्कुलिंगचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा विनियोग करण्याची अत्यंत महत्वाची ताकद आपल्याला मिळते.
त्याचबरोबर वेळेचे नियोजन मुलांच्या कलाने करून, त्यांची ऊर्जा, शिक्षणाची साधने व पद्धत ठरवण्याचे महत्वपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला मिळते.
यामुळे मुलांचे केवळ पुस्तकी शिक्षण न होता एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मुलांना सर्वांगीण शिक्षण मिळवण्याची संधी आपण देऊ शकतो.
आता आपल्याला होमस्कुलिंग का करायचे याचे उत्तर शोधता आले की आपल्याला जो पुढचा प्रश्न घ्यायचा आहे तो म्हणजे आपले स्टेकहोल्डर्स कोण आहेत, म्हणजेच या निर्णयाचा परिणाम कुणावर होऊ शकतो आणि या निर्णयावर परिणाम कोण करू शकतात यांची यादी तयार करणे.
या यादीत आपण स्वतः, मूल, आपले नातेवाईक, कदाचित शेजारी, मूल शाळेत जात असेल तर त्याची सध्याची शाळा, स्कुल व्हॅन चालक, मुलाचे मित्र, मुलगा होमस्कुलिंग करू लागल्यावर, ओपन स्कुलिंग बोर्ड जसे की NIOS, होमस्कुलिंग करणाऱ्या पालकांचे स्थानिक व इतर गट असे स्टेकहोल्डर शोधून आपल्याला त्यांची यादी करायची आहे.
त्यानंतर या स्टेकहोल्डर्सचा या निर्णयावर होणारा परिणाम होणारा परिणाम किंवा त्यांच्या या निर्णयावर होणाऱ्या परिणामांच्या तीव्रतेनुसार आपल्याला त्यांना उतरते क्रमांक द्यायचे आहेत. उदारहरणार्थ आपले मूल एक नंबरला असेल तर कदाचित त्याचे मित्र शेवटच्या नंबरवर असतील.
एवढी तयारी करून आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळायचे आहे..
मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर आता आपल्याकडे एक बऱ्यापैकी स्थिर अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. शाळेचा अर्ज भरणे, प्रवेशाची मुलाखत देणे, फी भरणे अशा क्रमाने आपण मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था करू शकतो.
मात्र जे पालक होमस्कुलिंगचा निर्णय घेतात, त्यांना मात्र अशी स्थिर व्यवस्था उपलब्ध नसते. त्यामुळे होमस्कुलिंगला सुरुवात कशी करायची, या प्रश्नाचे उत्तर पालकांना सहजासहजी मिळत नाही.
म्हणूनच होमस्कुलिंग करत असताना, कोणत्या क्रमाने गेलं पाहिजे त्यासाठी काय तयारी केली पाहिजे हे आपण मागच्या काही भागांतून समजून घेत आहोत आणि इथून पुढे देखील समजून घेणार आहोत.
आतापर्यंत आपण बघितलं की होमस्कुलिंग करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला "होमस्कुलिंग का करायचं"? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. त्यानंतर होमस्कुलिंग करत असताना, या निर्णयाचा कुणाकुणावर परिणाम होऊ शकतो याची आपल्याला यादी बनवायची आहे.
ही यादी बनवून झाली की आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे आणि तो प्रश्न म्हणजे मी ज्या वातावरणात होमस्कुलिंग करणार आहे, ते वातावरण नक्की कसं आहे?
हे वातावरण म्हणजे आपल्या कुटुंबातील वातावरण असेल, आपल्या कॉलनीतील वातावरण असेल, आपल्या गावातील, शहरातील, राज्यातील आणि देशातील वातावरण नक्की कसे आहे? याचा वास्तविक विचार आपल्याला करायचा आहे.
या वातावरणाचा विचार करताना, हे वातावरण समजून घेताना, आपल्या होमस्कुलिंगच्या प्रवासात या वातावरणातील कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करतील आणि कोणत्या गोष्टी अडथळा करू शकतात, हे आपल्याला नोंदवायचे आहे.
उदाहरणार्थ पुण्यात होमस्कुलिंग करताना आपल्याला अनेक संस्था आणि व्यक्ती सहज उपलब्ध होऊ शकतील मात्र साताऱ्यात होमस्कुलिंग करताना हे मिळणार नाही.याउलट साताऱ्यात आपण मुलाला एकट्याला बिनधास्तपणे बाहेर पाठवू शकू, पण पुण्यात..
म्हणूनच होमस्कुलिंगला सुरुवात करण्याआधी आपल्याला आपलं वातावरण आपल्याला समजून घेतलेच पाहिजे.
एकदा वातावरण समजून घेतले की आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वळायचे आहे, तो म्हणजे..
क्रमशः
चेतन एरंडे.
Comments
Post a Comment