Skip to main content

मुलांशी काय बोलायचं? भाग १

 मुलांशी काय बोलायचं? भाग १ 

मला आठवतंय मी होमस्कुलिंग म्हणजे काय? या विषयांवर बोलण्यासाठी एका पालक गटाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे मला एका पालकांनी विचारलेला प्रश्न आश्चर्यचकित करणारा होता. तो म्हणजे "होमस्कुलिंग करता म्हणजे तुमचं मूल सारखं तुमच्या डोळ्यासमोर असणार. मग तुम्हाला ते "इरिटेट" होत नाही का? सारखं त्याच्याशी बोलत राहण्याचा कंटाळा येत नाही का? आमचं मूल सुट्टीच्या दिवशी घरी असलं तरी त्याच्याशी सारखं काय बोलायचं हा प्रश्न पडतो? मग तुम्ही नक्की बोलता तरी काय?" 


त्यावेळी मी या प्रश्नाला फक्त हसून उत्तर दिलं!

आपल्या मुलाशी काय बोलायचं, असा प्रश्न पालकांना पडत असेल का? हा विचार मनात तेव्हापासून घोळत असताना मला काही दिवसांपूर्वी रिबेका रोलंड यांनी लिहिलेल्या "थी आर्ट ऑफ टॉकिंग विथ चिल्ड्रेन" या नावाच्या एका पुस्तकाविषयी कळलं. मी हे पुस्तक पूर्ण वाचलेलं नसलं तरी या पुस्तकात मुलांशी काय बोलावं याविषयीच्या टिप्स मला वाचायला मिळाल्या, त्या सोप्या करून इथे मांडायचा मी प्रयत्न करतोय. 

१. तू मला काय शिकवशील? 
या वाक्याने मुलांशी संवादाला सुरुवात करू  मुलांना "शिकवण्यासाठी" त्यांच्याशी केलेल्या संवादापेक्षा, मुलांकडून "शिकण्याच्या" इच्छेने केलेला संवाद हा अधिक प्रभावी असतो. 
आपण पूर्वी मुलांकडून शिकायच्या गोष्टींची यादी तयार करून तसा एखादा समर कॅम्प घेण्याचा विचार केला होता. गंमत म्हणजे या लेखिकेने सुद्धा "चल, मी तुला शिकवतो यापेक्षा तू मला काय शिकवशील"  या वाक्याने संवाद कसा मस्त बहरतो, हेच सुचवले आहे! म्हणजे या दिवाळीत आपण असा प्रयोग करून बघायला हरकत नाही! 

२. तू आणि मी चिडल्यावर  घाबरल्यावर, दुःखी असू तर किंवा कुणाकडून दुखावले असू तर आपण कसे रिऍक्ट होतो? 
या विषयावर आपण गप्पा मारू शकतो. गप्पा मारता मारता अशा वेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत आपला राग, आनंद, दुःख,  भीती कशी व्यक्त करायची याच्या टिप्स आपण शेअर करू शकतो. 

३. तुला अशी एखादी गोष्ट आठवतेय जी करताना तुझ्या मनात प्रचंड भीती होती, अस्वस्थता होती तरीही ती गोष्ट तू केलीस? तेव्हा तुला कसं वाटलं? 
हे बोलता बोलता भीती आणि त्या अनुषंगाने एकीकडे धोकादायक कृत्य तर करायचं नाही पण दुसरीकडे भीतीमुळे मागं राहून संधीही घालवायची नाही, हे कसं जमवायचं हे उदाहरणांतून मुलांना सांगत आपण संवाद वाढवू  शकतो. मग त्यात हेल्मेट घालणे असेल, गिर्यारोहण असेल किंवा मग बेफिकीरपणे रस्त्यावर सायकल, गाडी चालवणं असे, अशा विषयांवर गप्पा होऊ शकतात. 

४. अशी कुठली ऍक्टिव्हिटी आहे जी करताना तुला स्ट्रेस तर येतो पण मजा पण येते ? 
हे बोलता बोलता आपण स्ट्रेस ही काही दरवेळी वाईटच गोष्ट असते असं नाही तर स्ट्रेस  घेतल्याने आपण दोन पावलं पुढं देखील कसं जाऊ शकतो? हे सांगू शकतो.  तसेच कष्ट घेणं ही काही वाईट किंवा कमी पणाची गोष्ट नाहीये, उलट अनेकदा कष्ट आपल्या प्रगतीसाठी कसे गरजेचे असते हेही सांगू शकतो. 

५. तुला सगळ्यात जास्त सुरक्षित कधी वाटतं आणि का? 
मला माहिती नाहीये आपण कितीवेळा या विषयवार आजपर्यंत मुलांशी बोलले असू. पण मला वाटतं की हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मूल जेव्हा बोलण्याच्या मनस्थितीत असेल, आजूबाजूला योग्य वातावरण असेल तेव्हा हा प्रश्न आपण विचारून बघितलाच पाहिजे! याचे फायदे काय आहेत? हे मी सांगण्याची गरज नसावी!! 

पुढचे पाच मुद्दे पुढच्या भागात.. 

महत्वाचे: अशा प्रकारे संवाद करत असताना, घरातील वातावरण, मुलाचा आणि आपला मड या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मुलांशी संवाद सुरु करण्याआधी मुलाला  कंफर्टेबल वाटेल असं वातावरण तयार करण्यावर भर दिला पाहिजे नाहीतर हा संवाद "बॅकफायर" होऊ शकतो!! 

क्रमशः 
चेतन एरंडे 


Comments

Popular posts from this blog

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

बदलत्या काळात शिक्षण कसे समजून घ्यावे?

  अनेकदा शिक्षण याविषयावर चर्चेला सुरुवात झाली की ती पूर्वी शाळा या विषयावर येऊन थांबायची. मागच्या काही वर्षात, विशेषतः कोविडनंतर, शिक्षण या विषयावर चर्चा करताना आता "शाळा की होमस्कूलिंग" अशी नव्या पद्धतीने चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे दोन ध्रुव तयार होऊन दोन्ही ध्रुव आपापली पोझिशन बळकट करण्यासाठी आपापले मुद्दे मांडू लागले. यामध्ये "शिकण्याची भाषा" हा एक नव्याने ध्रुव तयार होत आहे, असे देखील वाटू लागले आहे. कोणत्याही चर्चेत माझा एक कटाक्ष असतो — ज्या व्यवस्थेचा आपल्याला अनुभव नाही, त्यावर शक्यतो आपले मत व्यक्त करू नये; किंवा केल्यास त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ द्यावा. माझा गेल्या काही वर्षात शाळा या व्यवस्थेशी संबंध राहिलेला नाही, मात्र शिक्षणाशी आहे. त्यामुळे मी "शिक्षण" हा संदर्भ घेऊन माझे मत मांडायचा प्रयत्न करेन. १. मुलांच्या शिक्षणाविषयी विचार करताना सगळ्यात आधी आपल्या मुलांविषयी आपल्याला सहवेदना असणे गरजेचे आहे. २. या सहवेदनेने आपल्याला मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील अडथळे समजून घेणे आणि त्यांना नक्की कुठे मदत हवी आहे, ह...