होमस्कुलिंग व सोशलायजेशन - भाग १
होमस्कुलिंग व सोशलायजेशन याविषयी अनेक पालक
सतत आम्हाला प्रश्न विचारात असतात. म्हणून मी दोन भागात या विषयावर लिहित आहे.
पुण्यापासून
साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर साने गुरुजी स्मारक येथे एक पाच दिवसांचे निवासी शिबीर दरवर्षी होते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून सुमारे पन्नास मुलांना तिथे पाच दिवस आई वडिलांपासून
लांब स्वावलंबी जीवन जगण्याची व वेगवेगळ्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. अशा ठिकाणी, म्हणजेच साने गुरुजी स्मारकाच्या
अभिव्यक्ती शिबिरामध्ये, जिथे
त्याच्या व आमच्या ओळखीचे
कुणीही नाही तिथे आमच्या अकरा वर्षाच्या मुलाला म्हणजे स्नेहला पाठवायचा निर्णय यंदा आम्ही घेतला.
त्यात
काय विशेष, असे तर आम्हीही
करतोच की, असे तुम्ही
म्हणणे स्वाभाविक आहे.
बरोबर, बरेच पालक असे करतात, पण या
घटनेतील वैशिष्ठ्य हे आहे, की आमचा
स्नेह मागची तीन वर्ष शाळेतच गेलेला नाही, तो स्वअध्ययन
म्हणजेच होमस्कुलिंग करतो. तो होमस्कुलिंग
करत असल्याने त्याचे सोशलायजेशन होत नाही (असे
होमस्कुलिंग न करणाऱ्यांचे म्हणणे
आहे), तरीही त्याला अशा अनोळखी ठिकाणी, अनोळखी लोकांमध्ये पाठवायचा धोका आम्ही
स्वीकारला!
१८
ते २२
एप्रिल २०१८ असे पाच दिवस तो तिथे राहिला, त्याला पाच दिवसात आम्ही एकदाही फोन केला नाही. २२
एप्रिलला आम्ही त्याला ज्यावेळी आणायला गेलो, तेंव्हा आम्ही आलेलो बघूनही, त्याला
आमच्याकडे कधी एकदा पळत येतोय असे झाले नाही, उलट तो जवळ
येत नाही म्हणून आम्हीच अस्वस्थ होत होतो. ज्यावेळी त्याचे मित्रांबरोबर बोलणे संपले, त्यावेळी
"तुम्ही कधी आला?' हे विचारण्यासाठी तो
आमच्याकडे आला खरा, पण तेवढ्यात,
"स्नेह, स्नेह" असा पुकारा करून त्याच्या मित्रांनी त्याला परत "बोलतोस काय,सामील हो"
असे म्हणत खेळायला ओढून नेले!
ज्यावेळी
आम्ही स्नेहचे होमस्कुलिंग करायचा निर्णय घेतला त्यावेळी "सोशलायजेशन" हा आमच्यासाठी नक्कीच एक चिंतेचा विषय होता, हे मान्य
करावेच लागेल, मात्र त्यानंतर सर्जनशील पालक समूहाचा उपक्रम असू दे,
आर्ट टेक मध्ये वर्षभर कला व तंत्रज्ञान शिकण्याची संधी असू दे, अमृत सामक यांची सेशन, खेळघर, सर्जनशील पालक
समूहाची उन्हाळी दिवाळी, भातलावणी, किरण
पुरंदरे यांच्याबरोबर मुंगी गटात एक दिवस केलेले काम, पुणे वेध मध्ये ओळख झालेल्या सिद्धार्थ चक्रवर्ती यांच्याशी पुढचे सहा महिने सातत्याने केलेला संवाद, गोष्ट
रंग कट्टा, तबला क्लास, सोसायटीतील मित्र आणि क्लायमॅक्स म्हणून पाच दिवसाचे हे निवासी
शिबीर. या सगळ्या ठिकाणी त्याने ज्या प्रकारे, पूर्वी कधीही न भेटलेल्या
व्यक्तींशी संवाद साधला, या प्रत्येक
ठिकाणी सुरु असलेले उपक्रम मुळापासून आणि मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावरून सोशलायजेशन आणि होमस्कुलिंग हे विरुद्धार्थी
शब्द नाहीत, उलट होमस्कुलिंग मुळे त्याच्या समाजातील वावरणे,
कुणाशीही स्पर्धा व तुलना नसल्याने, सहज व नैसर्गिकपणे होत आहे,
असे आमचे निरीक्षण आहे.
अनेक
पालकांना व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या
अनेक व्यक्तींना देखील असे वाटते की, मुलांचे सोशलायजेशन केवळ आणि केवळ "शाळेतच" होऊ शकते, होमस्कुलिंग
मध्ये हे शक्य नाही, पण वस्तुस्थिती खरेच तशी आहे का? अशी शंका येण्यामागे होमस्कुलिंग मधील
"होम" हा शब्द कदाचित कारणीभूत असेल. होमस्कुलिंग म्हणजे घरात बसून
पुस्तकात डोके घालून अभ्यास करणे, जे शाळेत करतात, तेच घरी करणे असे नाही.
शिकण्यासाठी अनेक माध्यमे जसे की किराणा मालाचे दुकान, एखादे इंजिनिअरिंग वर्कशॉप
आणि फुकट उपलब्ध असलेला ज्ञानाचा सगळ्यात मोठा खजिना म्हणजे आपला निसर्ग होमस्कुलर
वापरतात. आता मला सांगा, जी मुले आठ आठ तास चार भिंतीच्या आत राहून शिकत असतील, व
वर्ग सुरु असताना ज्यांना "पिन ड्रोप सायलेन्स" ठेवायची आज्ञा असेल,
त्यांना सोशलायजेशनची संधी जास्त असेल की जी मुले समाजात व निसर्गात उपलब्ध
असलेल्या साधनाच्या मदतीतून शिकत असतात, त्यांना सोशलायजेशनची संधी जास्त
असेल?
त्यामुळे सगळ्यात आधी आपण होमस्कुलिंग व सोशलायजेशन याचा विचार
करताना, ही मुले घरात बसून शिकतात, हा आपला गैरसमज दूर केला पाहिजे.
त्यापुढे जाऊन मला असा प्रश्न पडतो की, होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांच्या सोशलायजेशन विषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्या किती जणांची "सोशलायजेशन"
ची व्याख्या स्पष्ट आहे? मी एक
दोन जणांना (त्यांना राग येणार नाही, याची
काळजी घेऊन व मी आगाऊ आहे, हा गैरसमज
होणार नाही हे बघून) "सोशलायजेशन" ची व्याख्या विचारली. त्यावेळी त्यांनी असे सांगितले, की
आपल्या वयोगटातील मुलांबरोबर शेअरिंग करणे, इतरांना सांभाळून घेणे, चांगल्या
व वाईट मुलांशी कसे वागावे, कशी मैत्री करावी, हे
शिकणे हे फक्त शाळेतच होऊ शकते, आणि मुख्य म्हणजे "या
स्पर्धेच्या युगात" कसे टिकून राहायचे हे मुले फक्त शाळेतच शिकू शकतात. हे सगळे
करता येणे म्हणजे "सोशलायजेशन" आहे.
आता
आपण "सोशलायजेशन" समजून घेण्यासाठी जरा आपल्या आजूबाजूला बघूया. रस्त्यावर सर्रास वाहतुकीचा नियम मोडणारी माणसे, "मेरी
कमीज तेरे कमीज से सफेद कैसी" असा विचार करून त्रस्त होणारी माणसे, गरज नसताना वीज पाणी यांचा अपव्यय करणारी माणसे, रस्त्यावर
मंडप टाकून जोरजोरात डीजे लावून इतरांच्या आनंदाचा विचार न करता, आनंद उपभोगणारी माणसे, या
पृथ्वीवर आपण जसे राहतो, तसे अनेक प्राणी, पक्षी, वनस्पती सुद्धा राहतात व त्यांना आपल्याइतकाच जगायचा अधिकार
आहे, हे विसरून शाश्वत जीवनशैलीऐवजी, गरज नसतानाही सतत संपत्ती गोळा करण्यासाठी पळणारी व "स्पर्धेच्या युगात" पुढे राहण्यासाठी गरज पडल्यास इतरांच्या पायात पाय घालणारी माणसे, आपण उठ सुठ
रोज ज्यांना शिव्या घालतो ते राजकारणी, ते नोकरशहा,
ते बेशिस्त वाहनचालक "सोशलाईज" आहेत, त्यांना समाजभान आहे,
असे तुम्हाला वाटते का?
यातील
जवळपास सगळेच शाळेत गेले आहेत, काही तरी उच्चशिक्षित आहेत, तरीही
त्यांचे सोशलायजेशन का झाले नाही?
©चेतन एरंडे.
क्रमश:
Comments
Post a Comment