"माझा मुलगा शाळेत जायला तयारच होत नाही हो. तसा अभ्यासात चांगला आहे, परीक्षेत मार्क सुद्धा चांगले मिळवतो, पण शाळेत जायचा मात्र प्रचंड कंटाळा करतो, आम्ही काय करू?" आम्ही आमच्या मुलाचे म्हणजे स्नेह्चे, गेली चार वर्षे होमस्कुलिंग करत असताना, आम्हाला भेटायला येणारे बहुतेक पालक याच वाक्याने सुरुवात करतात! ते सांगतात यात नक्कीच तथ्य असते. याचे कारण काय असावे? हा विचार करता करताना मी पंधरा वीस वर्षे मागे गेलो. त्या काळी मुलांना बाहेरच्या जगाची माहिती करून देणारे एकमेव केंद्र होते ते म्हणजे शाळा. शाळेत वयानुसार इयत्ता ठरतात. इयत्तेनुसार कोणती व किती माहिती मुलांना द्यायची याचे प्रमाण ठरते. त्यामुळे पाचवीतल्या मुलाला "पाऊस कसा पडतो?" याची असलेली माहिती, दुसरीतल्या मुलाला असेलच असे नाही. मात्र तंत्रज्ञानातील बदलांचा अफाट वेग, स्मार्टफोन व इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना युट्युब सारखे उपलब्ध झालेले माध्यम त्यामुळे कोणत्याही वयाच्या मुलाला हवी ती "माहिती" सहज उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे शिकण्याला असलेली वयाची, वेळेची, पुस्तकाची मर्यादाच कोलमडून पडली. इ...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.