"बाबा, तुम्ही शाळेत असताना तुम्हाला "जीएफ"
होती का?" माझ्या अकरा वर्षांच्या मुलाने म्हणजे स्नेह्ने
चेहरा शक्य तितका निरागस करत मला हा प्रश्न विचारला.
"जीएफ, ते काय असते बुवा" मी
उत्सुकतेने विचारले.
"बाबा, अरे जीएफ म्हणजे गर्ल फ्रेंड, एवढे साधे तुला
माहित नाही" त्याने आपल्याला किती पुरातन काळातील बाबा मिळाला आहे, असा विचार
करत माझ्याकडे दयेने बघितले.
आई बाबांचा मुलाशी मुक्त संवाद असावा, याची आम्ही
आत्तापर्यंत कायमच काळजी घेत आलो आहे, पण आपला मुलगा एवढ्या लहान वयात इतक्या
मुक्त प्रकारे व्यक्त होईल, याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती. त्यामुळे अर्थातच
मी थातुर मातुर
उत्तर देऊन, विषय बदलायचा प्रयत्न केला.
तरीही तो सुसाट सुटला व "एकावेळी किती मैत्रिणी असाव्यात,
मैत्रिणीला कधी व का सोडावे, तिच्या मागण्या कशा पुरवल्या पाहिजेत इथून सुरुवात
करून, बाबा बलात्कार म्हणजे काय रे" असा माझा क्लीन बोल्ड काढूनच तो थांबला.
मित्रांबरोबर खेळताना, थेट लैंगिक क्रिया व इंद्रिये यांचे उल्लेख असलेले
"शब्द" वापरून मित्र व मैत्रिणी पुढच्याला कसे गप्प करतात, ही मौलिक
माहिती सुद्धा त्याने पुरवली.हे सगळे ज्ञान त्याला मित्रांशी होत असलेल्या चर्चेतून
मिळाल्याचे समजले. तसेच आता आपण मोठे झालो आहोत त्यामुळे आपल्याला असेच बोलले
पाहिजे नाहीतर आपल्याला लिंबू टिंबू समजतील,
असा त्याचा व त्याच्या मित्रांचा गैरसमज झाल्याचे त्याच्याशी बोलताना
लक्षात आले.
एवढे सगळे ऐकल्यावर "असले धंदे करता का खेळायला
जायच्या नावाखाली, खबरदार हा विषय परत मित्रांच्यात किंवा घरात काढशील तर "
असे त्याच्या मुस्काटात दोन ठेवून देत सुनावता आले असते. पण त्यामुळे तो कदाचित
परत घरात याविषयावर बोलला नसता. पण त्यामुळे त्याला एकूणच स्त्री पुरुष संबंध व
लैगिकता याविषयी वाटणारे कुतूहल शमले असते का? सुदैवाने मला व प्रीतीला त्याला
सुनावण्याआधी हा प्रश्न पडला, व आम्ही या घटनेकडे संकट म्हणून न बघता एक संधी
म्हणून बघायचे ठरवले.
खरे तर आपण बारा - तेरा वर्षाचे होतो तेव्हा आपल्या कानावर
देखील अशी "माहिती" येत होतीच. त्याकाळी आपल्या घरात प्रेम हा शब्द
उच्चारणे सुद्धा पोरगा बिघडल्याचे लक्षण मानले जात असल्यामुळे, या लैंगिक
प्रश्नांचे व समजलेल्या माहितेचे आकलन करण्यासाठी स्नेह सारखे घरच्यांची मदत
घेण्याचा तेव्हा प्रश्नच नव्हता. त्यामुळे हे कुतूहल शमवण्याचे मित्रांच्या मदतीने
मार्ग शोधले गेले. अर्थातच त्यापैकी नव्वद टक्के मार्ग चुकीची माहिती देणारे
असल्याने एकूणच स्त्री पुरुष संबंध व लैगिकता या विषयी आपली मते अशास्त्रीय व
बुरसटलेली राहिली. हे सगळे आठवल्याने किमान आपल्या मुलाला तरी अशा चुकीच्या
माध्यमातून माहिती मिळू नये, म्हणून आम्ही त्याच्यावर न चिडता त्याला या सगळ्या
गोष्टी योग्य पद्धतीने समजून सांगायचे ठरवले.
तसे आम्ही पूर्वीपासून घरात या विषयावर त्याच्याशी गरज पडेल
तेंव्हा बोलायचा प्रयत्न करत होतोच. त्यातून आपल्या आईला महिन्यातून चार दिवस पाळी आल्यावर त्रास
होतो म्हणून आपली आई जशी महिनाभर आपली काळजी घेते, तशी चार दिवस तिची काळजी आपण घेतली
पाहिजे इथपर्यंत त्याला समज होती. पाळी येणे ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया आहे,
हे सुद्धा त्याच्या लक्षात आले होते. मात्र त्याच्या या नव्या प्रश्नान उत्तर
देण्यासाठी, आमच्याकडे कसलेच शास्त्रीय ज्ञान नव्हते, त्यामुळे त्याच्यापर्यंत चुकीची
माहिती जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही हे कसे सांगावे याचा शोध घेत असताना,
आम्हाला इंटरनेटवर "बच्चे कैसे बनते है" हे एक अतिशय सुंदर पुस्तक
मिळाले. या पुस्तकात अकरा वर्षाच्या मुलाला सहज समजेल, अशा भाषेत बाळ कसे जन्माला
येते, त्यासाठी स्त्री व पुरुष दोघेही कसे महत्वाचे आहेत, हे निसर्गातील दाखले देत
समजून सांगितले आहे.
मुळात त्याला निसर्गाची प्रचंड आवड आहे, त्यामुळे आम्ही तोच
धागा पकडून, निसर्गाने स्त्री व पुरुष अशी विभागणी का केली हे समजून सांगता सांगता
त्याच्या मनात पडलेल्या प्रश्नांना उत्तरे शोधायचा प्रयत्न करायचे ठरवले, त्यासाठी
हे पुस्तक त्याला एकट्याला वाचायला न देता, सगळ्यांनी मिळून व मोठ्याने वाचायचे
ठरवले. पुस्तक वाचता वाचता स्त्री आणि पुरुष यांना निसर्गाने कसलाही भेदभाव न करता
कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, हे गप्पा मारता मारता त्याच्या लक्षात आणून दिले.
मुलांना मुलींचे व मुलींना मुलांचे आकर्षण वाटणे ही
नैसर्गिक गोष्ट आहे. पण म्हणून दर वेळी आकर्षण वाटले की सिनेमात, इंटरनेटवर
दाखवतात तशी आपल्याला आवडणाऱ्या मुलीबरोबर किंवा मुलाबरोबर अंगाशी लगट करत नाचणे
हे नैसर्गिक नाही, हे त्याच्या मुद्दामून लक्षात आणून दिले. त्याचप्रमाणे पुरुष व
स्त्री यांना एकत्र येऊन बाळाला जन्म द्यायचा असेल, तर त्यासाठी त्यांना आधी
एकमेकांची व होणाऱ्या बाळाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम कसे व्हावे लागते, हेही त्याला
उमगले.
पुस्तक वाचून झाल्यावर तो म्हणाला,
"बाबा, मला आता बऱ्याच गोष्टी समजल्या, पण बलात्कार
म्हणजे काय, हे अजूनही नाही समजले"
"हे बघ, तू जसा तुला जे मित्र आवडतात त्यांच्याशीच
मैत्री करतो, तो जसा तुझा अधिकार आहे, तसेच मुलींना सुद्धा जो मुलगा आवडतो, त्याच्याशीच मैत्री
करण्याचा अधिकार आहे. आता मला सांग, तुला एखाद्या मुलीशी मैत्री करण्याची इच्छा
होईल, पण तिला तसे वाटणार नाही, त्यावेळी तू काय करशील?"
"तिला आवडत नसेल, तर मी नाही तिच्याशी मैत्री
करणार"
"बरोबर, जर पण सगळेच लोक असे समजूतदार नसतात, त्यामुळे
ते मुलीची इच्छा नसताना, तिच्यावर मैत्रीची जबरदस्ती करतात, शारीरिक त्रास देतात.
त्यामुळे अर्थातच त्या मुलीला त्रास होतो. तरीही काही निर्लज्ज लोक आनंद ओरबाडून घेण्याचा
प्रयत्न करतात व त्या अधाशीपणाला शौर्य समजतात, असे वागण्याला बलात्कार म्हणतात."
हुश्श, त्याची "अच्छा" अशी प्रतिक्रिया ऐकली आणि त्याला
समजेल अशा भाषेत बलात्काराची व्याख्या सांगण्यात मी यशस्वी झाल्याचे समाधान
मिळाले.
सध्या समाजात सगळीकडे स्त्री ही एक उपभोगाची व मनोरंजनाची
वस्तू आहे, स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्याचे किंवा बदला घेण्याचे एक साधन आहे, असे
टीव्ही, इंटरनेट, सिनेमा अशा माध्यमातून इतक्या प्रभावीपणे मांडले जाते की मुलांना
तेच वास्तव वाटू लागते. हे सगळे थांबवणे
आपल्या आवाक्यात नाही, हे आम्हाला पक्के माहिती असल्यामुळे स्नेह्ला किमान लैंगिक
कुतूहलच्या मागे दडलेले वास्तव जितके शक्य होईल तितके स्पष्ट करून दाखवण्याचा
आम्ही कधी एकटे तर कशी सर्जनशील पालक गटाच्या माध्यमातून एकत्र प्रयत्न करत आहोत.
त्यातून मुलांना जबाबदारीचे तर मुलींना आत्मविश्वासाने
समाजात वावरण्याचे बळ मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.
©चेतन एरंडे.
मस्तच.
ReplyDeleteमस्तच.
ReplyDelete