मागच्या काही
दिवसातील मनात विचारांचे वादळ उठावे, असे तीन चार प्रसंग एकामागून एक माझ्या समोर आले.
प्रसंग -१
लहान मुलांसाठी
एका सोसायटीत आयोजित केलेल्या "खेळातून विज्ञान" या कार्यक्रमात जशी
मुले रमली होती तशी मोठी माणसे सुद्धा रमली होती. विज्ञान इतक्या सोपे पद्धतीने
शिकता येऊ शकते हे त्यांना नव्यानेच समजले. विज्ञानातील मूलभूत संकल्पना समजून
घेण्यासाठी मोठ्या प्रयोगशाळांची नाही तर इच्छाशक्तीची व वेळ देण्याची गरज आहे, हे पालकांच्या हळुहळु लक्षात येते आहे, असे मला जाणवले.
प्रसंग -२
अकरा वर्षाचा
सोनीत पुण्यातील बाणेर टेकडीवर पृथ्वीच्या जन्माची कहाणी पुराव्यानिशी आणि
सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगत होता. त्याच्याकडून मुलांना जशा नवीन गोष्टी समजत
होत्या तशा आम्हाला पालकांना सुद्धा नव्यानेच समजत होत्या. कितीतरी वेळा त्या
टेकडीच्या जवळ जाऊनही हे सगळे नक्की कसे निर्माण झाले असावे, असा प्रश्न गेल्या चाळीस वर्षात आम्हाला कुणालाच कधी पडला नाही. मात्र तोच
प्रश्न सोनीतला अकराव्या वर्षी पडला व त्याने त्याचे उत्तरही शोधून काढले!
प्रसंग -३
एका रेडिओ चॅनेल
वर मेडिकल टेक्नॉलॉजी हा विषय घेऊन बीएस्सी करणाऱ्या मुलाला लिटमस पेपरचा रंग
कोणत्या द्रावणात टाकल्यावर निळा होतो, हे सांगता आले नाही. मात्र या प्रश्नामुळे त्याचा चेहरा मात्र काळा निळा झाला
असावा असे त्या प्रश्नाचे उत्तर देताना तो ज्याप्रकारे भरकटत होता, त्यावरून जाणवले!
प्रसंग -४
दहा दिवसांपूर्वी
स्क्रॅच प्रोग्रामिंग कोर्सची एक जाहिरात मला कुणीतरी पाठवली. त्या
कोर्ससाठी साधारण दहा हजार रुपये फी व आठवड्यात चार तास क्लास असे पॅकेज होते. स्क्रॅच
सॉफ्टवेअर समजून घेण्यासाठी मी पीसी समोर बसलो. थोड्याच वेळात माझा अकरा वर्षाचा मुलगा,
स्नेह माझ्या शेजारी येऊन बसला. हळूहळू त्याने s स्क्रॅच व पीसी चा ताबा घेतला. त्याला कुणीही न
शिकवता स्क्रॅचचे ट्युटोरिअल बघून तो दहाच दिवसात स्वतः हुन बेसिक प्रोग्रामिंग शिकला. त्याने दहा बारा
गेम्स व पाच सहा स्टोरीज सुद्धा तयार केल्या. मात्र त्यासाठी मागचे दहा दिवस रोज
सहा ते सात तास केवळ स्क्रॅच स्वतःहुन शिकणे एवढी एकच गोष्ट तो करत आहे.
या सगळ्या
प्रसंगांमध्ये काही समान सूत्र आहे का याचा विचार माझ्या डोक्यात सुरू असताना
अचानक ते सूत्र सापडले असे मला खान अकॅडमीचे संस्थापक सलमान खान यांचे एक भाषण
ऐकताना जाणवले.
त्याचा साधारण
गोषवारा असा आहे. जेव्हा आपण स्वतःचे घर किंवा एखादी इमारत बांधायला सुरुवात करतो, त्यावेळी सगळ्यात आधी कुठल्यातरी
कॉन्ट्रॅक्टरला धरून आणतो. तो आधी जमिनीची पाहणी करतो, मग त्याप्रमाणे पाया खणायला सुरुवात करतो.
जमीन कशी आहे,
त्यावर पाया
खणायला किती वेळ लागेल,
हे अवलंबून
असते.
मग तो पिलर
टाकतो,
स्लॅब टाकतो, त्यावर पाणी मारतो आणि सगळे काही व्यवस्थित
आहे,
याची खात्री
करून मगच पुढे जातो. भले त्यासाठी ठरल्यापेक्षा "जास्त वेळ" का लागेना.
म्हणजेच इमारत
बांधण्याच्या प्रक्रियेत वेळ किती लागेल हे महत्वाचे किंवा फिक्स नाही. फिक्स काय
आहे तर जमिनीचा दर्जा तपासणे, त्याप्रमाणे पाया ,
मग पिलर, मग स्लॅब हे सगळे १००% मजबूत असणे. म्हणजे
टक्केवारी किती पाहिजे हे फिक्स आहे, बदलतोय तो वेळ. हा जो काही जास्तीचा वेळ लागतोय तो जे काम केले आहे त्याचे
बारकाईने मूल्यमापन करून,
त्यात ज्या काही कमतरता राहिल्या असतील त्या भरून
काढण्यासाठी. त्या कमतरता भरून काढून मग आणि मगच इमारतीचे काम पुढे सरकते.
आता जरा विचार
करा की आपण इमारतीचे काम चालू असताना पुढचे काम सुरू करण्याआधी आधीच्या कामाची तपासणी करणारा म्हणाला की या कामाला मी पस्तीस
टक्के देईन किंवा गेला बाजार पंच्याहत्तर टक्के देईन, तर तुम्ही पुढच्या कामाला परवानगी द्याल का? असे प्रत्येक स्टेजवर इमारतीचे काम साठ ते पंच्याहत्तर
टक्के किंवा अगदी नव्वद टक्के मिळवून पास झाले व आपण तसेच पुढे जात राहिलो तर काय
होईल?
आधीच्या कामात
जी काही कमतरता राहणार आहे,
त्यामुळे
पुढच्या कामाच्या मजबुतीवर परिणाम होईल व मग अर्थातच "भेगा" दिसायला
लागतील. त्या इमारतीत राहणे "आनंददायी" असणार नाही.
आता आपण हाच
संदर्भ घेऊन शिक्षणाच्या इमारतीकडे वळू. इथे फिक्स काय आहे तर वेळ. म्हणजे अगदी
केजी पासून कॉलेज पर्यंत तुम्हाला दरवर्षी पास होत पुढे जायचे आहे. आणि तुम्हाला पस्तीस
टक्के कळाले तरी तुम्हाला पुढे जायची परवानगी आहे. आणि पुढे जाऊन तुम्हाला जे पासष्ट
कळाले नव्हते,
त्याच्यापेक्षा प्रगत
गोष्टी पुढच्या वर्षी शिकायच्या आहेत! म्हणजेच वेळ फिक्स आहे, टक्केवारी पस्तीसच्या वर कितीही चालेल.
म्हणजेच दरवर्षी
शून्य ते पासष्ट
टक्के कमतरता तशाच ठेवून शिक्षणाची इमारत बांधत राहिलो, तर तिथे त्या इमारतीत आपण
आनंदाने राहू शकू का?
आपल्याला जर आनंददायी शिक्षणाची भक्कम इमारत उभी करायची असेल तर प्रत्येक
टप्प्यावर शिक्षण घेताना ज्या कमतरता मुलांमध्ये दिसतात, त्या भरून काढण्यासाठी
त्यांना मदत केली पाहिजे, वेळ दिला पाहिजे. जर आधीच्या गोष्टीच नीट समजल्या नसल्या
तर पुढच्या गोष्टी शिकताना आनंद होईलच कसा व ते शिक्षण आनंददायी कसे म्हणता येईल.
पुन्हा एकदा मला
मागच्या काही दिवसातील ते चार प्रसंग आठवले. सोनीत व स्नेहच्या प्रसंगात त्यांनी
दिलेला वेळ व इतर दोन प्रसंगात एखादी संकल्पना "समजून घेण्यासाठी" त्या
लोकांनी दिलेला "वेळ" यामधील तफावतच वेगवेगळे "रिझल्ट"
येण्यासाठी कारणीभूत असावी,
असे आता वाटू
लागले. स्नेह व सोनीत आनंदी तर इतर दोन उदाहरणामधील मंडळी भेदरलेली व गोंधळलेली
असल्याचे मला लक्षात आले.
आनंददायी शिक्षण म्हणजे प्रत्येकाला त्याच्या गतीने, कलाने व त्याला
मानवणाऱ्या पद्धतीने शिकू देणे म्हणजेच आनंददायी शिक्षण आहे, व ते केवळ शिक्षांच
नाही तर सामौर्ण जीवनच आनंददायी होण्यासाठी आवश्यक असल्याचे मला जाणवले!
©चेतन एरंडे.
Superb Chetanji!
ReplyDelete