तुम्ही होमस्कुलिंग करत असाल आणि परीक्षाही देत नसाल, तर तुमचा मुलगा शिकतोय, याचा तुमच्याकडे कोणताच पुरावा नसतो. त्यामुळे मुलांना एक विशिष्ट कंटेंट म्हणजेच अभ्यासक्रम देऊन त्या कंटेंट मधले त्याने किती शोषून घेतले आहे, हे मार्कलिस्ट हा सोपा पुरावा वापरून सिद्ध करता न येणे, अनेकदा मुलाच्या शिकण्याविषयी तुमचा आत्मविश्वास डळमळीत करते. मागच्या पाच वर्षात, एकीकडे स्नेहचे स्व अध्ययन सुरू असताना, दुसरीकडे आमचेही, शिक्षण म्हणजे नक्की काय, मुले स्वतः हून शिकतात म्हणजे नक्की कशी शिकतात, याविषयी सातत्याने अभ्यास सुरू होता. त्या अभ्यासाच्या आधारे शिकणे म्हणजे माहिती गोळा करणे व परीक्षेत ती माहिती जशीच्या तशी उतरवून जास्तीत मार्क मिळवून बुद्धिमता सिद्ध करणे नव्हे, एवढे समजले होते. शिक्षण समजून घ्यायचे असेल, तर कंटेंट किंवा अभ्यासक्रम नाही तर शिकण्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे हेही मनाशी पक्के झाले होते. मात्र आम्ही जे शिकलो, ते अंमलात कसे आणायचे याबाबतीत मात्र आम्ही कमी पडत होतो. स्नेहने गेमच्या माध्यमातून असेल, इंटरनेटच्या माध्यमातून असेल, क्षेत्र भेटीतून असेल किंवा त्या त्या क्षेत्रा...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.