कोरोना के साथ भी - कोरोना के बाद भी मुलांना वेळ द्यायचा म्हणजे नक्की काय करायचे? भाग ४
पालकत्वावरील कोणत्याही पुस्तकात, भाषणात आणि गप्पातपालकांना हमखास दिला जाणारा सल्ला म्हणजे, "मुलांना वेळ दिला पाहिजे!" आजकालच्या धकाधकीच्या जीवनात "आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही" याची टोचणी सतत मनाला असताना, "मुलांना वेळ दिला पाहिजे" असं कुणी म्हणालं की का कुणास ठाऊक पणअजूनच ओशाळल्यासारखे होते!
त्यात अजून भर म्हणजे, सध्या कोरोनाच्या काळात घरून काम करत असून सुद्धा आपण, मुलांना वेळ देऊ शकत नाही ही भावना अजूनच जास्तच तीव्रतेने छळू लागते!
आजच्या भागात पालकांनी मुलांना वेळ द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं याविषयी युनिसेफ या मुलांसाठी जगभर काम करणाऱ्या संस्थेचे मत काय आहे, हे आपण समजून घेणार आहोत.
आपण आपली "प्रोफेशनल" कामे करत असताना ज्याप्रमाणे प्रत्येक कामासाठी "ठरवून" वेळ काढतो, अगदी तसेच आपण आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी "ठरवून" किमान २० मिनिटे तरी रोज वेळ काढलाच पाहिजे. आपण दिवसभरात कमीत कमी १६ तास म्हणजे ९६० मिनिटे जागे असतो, त्यापैकी केवळ २० मिनिटे म्हणजे केवळ दोन टक्के वेळ सुद्धा कुटुंबासाठी काढू शकत नाही का? आणि काढू शकत नसू तर हा आपल्या "बिझी दिनक्रमाचा" नाही तर "इच्छाशक्तीचा दोष" आहे, हे लक्षात घ्या!
या २० मिनिटात काय करायचे? याचे स्वातंत्र्य तुमच्या मुलांना, कुटुंबाला असू द्या. तरच ही २० मिनिटे सार्थकी लागतील. नाहीतर वेळ कधी काढायचा? किती काढायचा? आणि त्या वेळात काय करायचे, हे सगळेच मी ठरवले तर, त्या वेळात केवळ संघर्ष होईल, संवाद नाही, हे लक्षात घ्या,
तुमची मुलं जर लहान असतील तर, तुम्ही त्यांना गाणी, गोष्टी सांगण्यापासून ते एखादे पुस्तक वाचून दाखवणे, त्यांच्याबरोबर छोटी नाटुकली करणे याबरोबरच "शरीर थकवणारे" पण "मन मोकळे" करणारे खेळ खेळायला सुरुवात करू शकता.
मुलं मोठी असतील तर एकत्र सायकलिंग करणे, एकत्र चालायला जाणे, मुलांच्या आवडीच्या गोष्टींवर त्यांच्याशी बोलणे, स्वयंपाक, घर आवरणे, गाडी धुणे अशी कामे एकत्र करू शकता
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या २० मिनिटात टीव्ही असेल किंवा कोणतेही गॅजेट असेल हे "जाणीवपूर्वक" लांब "ठेवलेच" पाहिजे. या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही २० मिनिटे लक्ष दिली नाही तर कोलमडून जाईल. "नोकरी बदलणे" आणि "कुटुंब बदलणे" यापकी कोणती गोष्ट जास्त सोपी आहे? याचा आढावा घेऊन या २० मिनिटात मध्येच नोकरीचे अतिक्रमण होऊ द्यायचे की नाही? हे तुम्ही ठरावाचे आहे!!
त्याचबरोबर मुलांशी बोलताना, प्राधान्य हे आपले म्हणणे मांडण्यापेक्षा मुलांचे म्हणणे ऐकण्याला देणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेताना संपूर्ण लक्ष मुलांच्या बोलण्याकडे असेल याची काळजी घेणे, या गोष्टी केल्या तर ही २० मिनिटे अधिक सार्थकी लागतात!!
एवढे सगळे वाचल्यावर मुलांसाठी, कुटुंबासाठी वेळ कसा काढायचा? ही खरी समस्या नसून आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींची प्राथमिकता ठरवताना गोंधळ उडणे ही खरी समस्या आहे! हे तुमच्या लक्षात आले असेलच. त्यामुळे मुलांना वेळ देण्याची सुरुवात तर आपल्याला करायची आहेच, पण त्याचा श्रीगणेशा हा आपल्या प्राथमिकता ठरवण्यापासून करायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे.
पुढच्या भागात "सकारात्मक पालकत्वाविषयी" आपण बोलणार आहोत..
चेतन एरंडे.
एकदम मुद्देसूद मांडले आहे. धन्यवाद.
ReplyDelete