सध्या इंटरनेटवरून ज्याप्रमाणे आपण माहिती मिळवत आहोत, तशीच इंटरनेटवर कळत नकळत आपलीही माहिती पुरवत आहोत! त्यामुळे जर आपल्याकडे किमान "माहिती साक्षरता" नसेल, तर पूर्वीच्या काळी सावकार जसे अडाणी माणसांना फसवून लुबाडत होते, तसेच आपल्यालाही कुणीतरी लुबाडेल!
माहिती साक्षरता - भाग १
आपल्या जीवन पद्धतीमध्ये
काळानुसार सतत बदल होत असतो. तो पूर्वीही होत होता, आत्ताही होत आहे व इथून पुढेही
होणार आहे. म्हणूनच "आमच्या काळी" अशी सुरुवात करून उगाचच आत्ताचा काळ
किती भयानक वगैरे आहे, अशा चर्चांना एक करमणुकीचे साधन यापलीकडे फारशी किंमत
नसावी.
जशी जीवनपद्धती बदलते, तशा
अनेक संकल्पनाही बदलतात. मग ते दळणवळण असो, संपर्क असो किंवा नोकरी असो. अशीच
वेगाने बदलत जाणारी एक संकल्पना म्हणजे साक्षरता..
एकेकाळी पाठांतर उत्तम
असणे, हे साक्षरतेचे लक्षण होते. त्यानंतर लिहिता वाचता येणे ही साक्षरतेची कसोटी
झाली. मग संगणक साक्षरता हे साक्षरतेचे लक्षण मानले जाऊ लागले. साक्षरतेची अशी
संकल्पना बदलत जाण्यामागे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानातील बदल त्यानुसार उपलब्ध होणारी
नवनवीन साधने..
संगणकाची उपलब्धता व उपयुक्तता
वाढल्यामुळे संगणक साक्षरतेला महत्व आले. सध्याचा काळ बघितला तर केवळ संगणक वापरून
काम करता येणे महत्वाचे नसून, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचे विश्लेषण
करणे, त्याआधारे त्या माहितीचा, तंत्रज्ञानाचा किमान वापर आपल्याला करता येणे, हे
जास्त महत्वाचे ठरत आहे.
सध्या इंटरनेटवरून
ज्याप्रमाणे आपण माहिती मिळवत आहोत, तशीच इंटरनेटवर कळत नकळत आपलीही माहिती पुरवत आहोत! त्यामुळे जर आपल्याकडे किमान
"माहिती साक्षरता" नसेल, तर पूर्वीच्या काळी सावकार जसे अडाणी माणसांना फसवून
लुबाडत होते, तसेच आपल्यालाही कुणीतरी लुबाडेल!
आपल्यापैकी अनेकजण कदाचित "माहिती
साक्षर" काही सुशिक्षितही असतील. मी नुकताच "माहिती साक्षरतेचा" एक
कोर्स पूर्ण केला आहे, त्यामुळे अर्थातच मी मात्र नवसाक्षर आहे! कदाचित त्यामुळेच या
कोर्समधून एक जबाबदार "Digital Citizen" असणे म्हणजे काय हे मला जे
उमगले ते कुणालातरी कधी एकदा सांगतोय असे मला झाले आहे! म्हणूनच माझ्या ब्लॉग वरून
पुढचे काही दिवस साधारण तीन भागात, ते तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करत आहे.
कदाचित ही माहिती तुम्हाला
तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांना जबाबदार "Digital Citizen" म्हणजे
काय हे सांगण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून तीन भागामध्ये मांडत आहे.
जरूर वाचा व तुमच्या
प्रतिक्रिया जरूर कळवा.
©चेतन एरंडे. - २३ जून २०१८
Very important topic Chetan sir. Eager to share your experience and learning.
ReplyDelete