स्व अध्ययन म्हणजे मुलांनी स्वतः हून शिकणे!
कसं शक्य आहे?
इथं शाळा, ट्यूशन आणि जोडीला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायला लावून, मुलं शिकण्याचा कंटाळा करतात. अशा परिस्थितीत मुलांना स्वतः हून शिकण्याची मुभा दिली तर अभ्यास करायला मुलांना काय वेड लागलंय? त्यापेक्षा ती मस्तपैकी गेम्स खेळत बसणार नाहीत का?
अशी शंका वाटणं अगदीच रास्त आहे. कदाचित म्हणूनच मुलांना स्वतः हून शिकण्याची मुभा द्यायला आपण घाबरतो, टाळतो. पण मुभाच दिली नाही तर त्याचे परिणाम दिसणार कसे? आणि परिणाम दिसलेच नाही तर मुलांना स्वतः हून शिकण्याची संधी देण्याची फायदे तोटे कळणार कसे?
हे आठवायचे कारण म्हणजे नुकताच घरात घडलेला किस्सा. तीन वर्षांपूर्वी आम्ही डेल चा लॅपटॉप घेतला. मागच्या वर्षी लॅपटॉप च्या कीबोर्ड व माऊस पॅडचे आयुष्य वाढावे म्हणून आम्ही वायरलेस माऊस आणि कीबोर्ड घेतला.
डेल च्या वायरलेस माऊसला ऑन ऑफ स्विच आहे पण गंमत म्हणजे कीबोर्डला तो नाहीये. त्यामुळे होतं काय ना, तर कीबोर्डच्या बॅटरी पटापट संपतात.
तर माझ्यापुढे आणि गेले पाच वर्षे स्व अध्ययन करणाऱ्या स्नेहपुढे प्रश्न असा होता की बॅटरीज लवकर संपू नयेत म्हणून काय करावे? मी रिचार्जेबल बॅटरीज घेणे इथपासून ते कीबोर्ड वापरत नसताना दोन पैकी एक बॅटरी काढून ठेवणे, असे वेगवेगवेळे पर्याय सुचवले.
स्नेहने मात्र कीबोर्डलाच स्विच बसवण्याचा पर्याय सुचवला!
डेल सारख्या कंपनीच्या कीबोर्ड मध्ये बदल करायचा आणि तोही आपण? हे किमान माझ्या तरी विचार शक्तीच्या पलीकडे होते. आयुष्यात काही गोष्टी अशा असतात, ज्या तुम्हाला निमूटपणे स्वीकाराव्याच लागतात, यासाठी माझे मन तयार झाले होते!!
मात्र स्नेहची विचार प्रक्रिया अगदी उलट असल्याचे जाणवले. कीबोर्ड ची बॅटरी लवकर संपते ही माझ्यापुढे समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी कोणताही पूर्वग्रह न ठेवता मला मुळापर्यंत जायची तयारी दाखवली पाहिजे, हे मला त्याच्या विचारातून व कृतीतून जाणवले.
कीबोर्डला स्विच बसवता येईल का? यासाठी "शिकणे" सुरू झाले. समस्या नक्की काय आहे, हे युजर स्टेटमेंट किंवा स्टोरीच्या रुपात मांडण्यापासून ते बिल ऑफ मटेरिअल बनवणे, सर्किट तयार करणे, डिझाईन तपासून घेणे या सगळ्या प्रक्रिया पार पाडून त्याने यशस्वीपणे कीबोर्ड ला स्विच बसवला!
विशेष म्हणजे मागचे चार दिवस झाले, हा स्विच टिकून तर आहे पण व्यवस्थित काम देखील करतोय! तसं हे डिझाईन काही फार परफेक्ट वगैरे नाहीये. पण पहिली कार डिझाईन झाली तेव्हा ती तरी कुठं आजच्या कार इतकी परफेक्ट होती. कार जशी वापरात आली आणि डिझाईन मधल्या कमतरता दिसून आल्या किंवा नवीन कल्पना सुचल्या, तशी डिझाईन सुधारत गेली.
कीबोर्ड स्विचच्या डिझाईन मध्ये सुद्धा अशीच सुधारणा होतेय का? बघूया..
तात्पर्य हे की स्व अध्ययन आणि मुक्त विचार करण्याची संधी मुलांना मिळाली, तर त्यांच्यापुढे आलेल्या समस्यांचा वेगळा विचार करून, त्यासाठी मुळापर्यंत जाऊन उत्तरे शोधण्याची मानसिक तयारी होते. ही मानसिकताच मुलांना स्वतः हून शिकण्यासाठी प्रेरित करते, असे माझे निरीक्षण आहे.
कीबोर्ड स्विच हा फक्त एक टप्पा आहे. पुढे जाऊन जेव्हा समस्या अजून गुंतागुंतीच्या होत जातील तेव्हा तेवढ्या प्रमाणात शिकण्याची व्याप्ती सुद्धा आपोआपच वाढत जाईल, याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नसल्याने अशा गुंतागुंतीच्या समस्या स्नेह पुढे कशा ठेवता येतील, याच्या तयारीला सुरुवात केली आहे!!
चेतन एरंडे.
Comments
Post a Comment