लाखो वर्षे माणूस निरनिराळ्या गोष्टी शिकत आला आहेच. काळानुसार शिकण्याची साधने जरी बदलत गेली असली , तरी "शिकणे" ही प्रक्रिया शाश्वत आहे , व ती "शाश्वत" प्रक्रिया जर आपण समजून घेऊ शकलो , तर कदाचित "मूल शिकते कसे ?" व त्यातून त्याचा उत्क्रांतीमध्ये नकळत हातभार कसा लागतो , या प्रश्नाचे कदाचित एक वेगळेच उत्तर आपल्याला मिळू शकेल! म्हणूनच ही प्रक्रिया शोधण्यासाठी मी पुन्हा एकदा उत्क्रांती समजून घेऊ लागलो. त्यातून मला माणूस उत्क्रांतीच्या कोणत्याही टप्प्यावर असला तरी एक समान प्रक्रिया घडताना दिसली, ती म्हणजे "आपल्या आजूबाजूच्या जगाचे सतत अत्यंत बारकाईने निरीक्षण करणे. त्यासाठी भरपूर वेळ देणे. निरीक्षणातून टिपले गेलेले बदल किंवा नवीन गोष्टी प्रत्यक्ष कृतीतून व स्वतःच्या हाताने तपासून पाहणे. त्यांचे आकलन करून घेणे, त्यासाठी इतर माणसांशी संवाद साधणे. सरतेशेवटी या नवीन गोष्टीमुळे रोजच्या जगण्यात काही चांगले बदल होतात का हे जगता जगता तपासून घेणे, जर चांगले बदल झालेले दिसले तर जुन्या व्यवस्थेला किंवा परंपरांना कवटाळून न बसता नवे बदल स्वीकारून, प्रगत...
होमस्कुलिंग हा नुसता शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा प्रवास नसून पालकत्वाचा परिपूर्ण प्रवास आहे, असे आम्हाला जाणवले. म्हणूनच या ब्लॉग वर स्नेह चा शिकण्याचा प्रवास जसा आम्ही मांडणार आहोत, तसेच पालक म्हणून आम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, हे सुद्धा मांडणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग चा फायदा केवळ होमस्कुलिंग करण्याची इच्छा असलेल्या किंवा सध्या करत असलेल्या पालकांच्या पुरता मर्यादित न राहता, तो कदाचित इतर पालकांनाही होईल असे आम्हाला वाटते.