नम्र विनंती: ही पोस्ट
वाचण्याआधी, प्रत्येकाने आधी स्वत:ला दोन प्रश्न विचारून, त्याची उत्तरे तयार ठेवावी.
पहिला प्रश्न "मुलांची परीक्षा नक्की कशासाठी घेतली जाते?" दुसरा प्रश्न
"मुलांच्या परीक्षेचा निकाल बघून शिक्षक, पालक व मुले यांनी कोणती कृती करणे
अपेक्षित आहे?"
होमस्कुलिंग म्हणजे ते
मुक्त वातावरणात, मुलांच्या गतीनुसार, कलानुसार शिक्षण वगैरे घेणे सगळे ठीक आहे,
पण या मुलांच्या परीक्षेचे आणि सर्टिफिकेटचे काय? जर सर्टिफिकेटच नसेल तर सगळे येत
असूनही यांना नोकरी कोण देणार आणि ही मुले
स्वत:च्या पायावर उभी तरी कशी राहणार? आई बापाच्या होमस्कुलिंगच्या हट्टापायी
पोराला कायमचे घरी बसायला लागू नये म्हणजे मिळवली..
होमस्कुलिंग करणाऱ्या
मुलांच्याविषयी अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच, कधी तो उघडपणे विचारला जातो, तर
कधी पाठीमागे तावातावाने फक्त चर्चा केली जाते.
जेंव्हा आम्ही स्नेहचे
होमस्कुलिंग करायचा विचार केला, तेंव्हा "परीक्षा व सर्टिफिकेट" या
विषयावर आम्हीही अशीच तावातावाने चर्चा केली. मात्र आम्ही तिथेच न थांबता किंवा
सगळे जग परीक्षा देतंय म्हणून आपण पण देउया, असे न म्हणता, परीक्षा व सर्टिफिकेट
या विषयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्यातून आम्हाला जे उमगले व आम्ही जी
कृती केली व करत आहोत, ते आम्ही तीन भागांच्या लेख मालिकेतून मधून मांडण्याचा
प्रयत्न करत आहोत.
मुळात परीक्षा ही
मूल्यमापनाच्या अनेक पद्धतींपैकी एक पद्धत आहे. इयत्तेनुसार प्रत्येक मुलाच्या
क्षमता काय असल्या पाहिजेत, याचा विचार करून अनेक शिक्षणतज्ञ एकत्र येऊन,
मुलांच्या क्षमता कशा विकसित होतील, याचा विचार करून अभ्यासक्रम किंवा
अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करतात. वर्षभरात त्या अभ्यासक्रमाच्या मदतीने मुल शिकत
असताना, त्याने इयत्तेनुसार अपेक्षित क्षमता आत्मसात केल्या का, त्याला त्या
प्रत्यक्षात व्यवहारात वापरता येऊ लागल्या का? हे तपासून बघणे म्हणजे मूल्यमापन
आहे, असे आम्हाला वाटते.
या मूल्यमापनासाठी तीन
तासाची परीक्षा ही सध्या एक प्रचलित पद्धत आहे.वर्षभरात आत्मसात केलेल्या
क्षमतांचे असे तीन तासात मूल्यमापन करता
येणे शक्य आहे का? किंवा ते नैसर्गिक आहे का? समजा मुलाला त्याच्या क्षमतेनुसार
सगळ्या गोष्टी समजल्या आहेत, त्याने त्या आत्मसात केल्याही आहेत, मात्र ऐन
परीक्षेच्या दिवशी, तणावामुळे म्हणा किंवा मानसिक तयारी झालेली नाही म्हणून, तो
मुलगा पेपरच लिहू शकला नाही, तर त्या पेपरमधून होणारे त्याचे मूल्यमापन त्याला
"न्याय" देणारे असेल का? याउलट एखाद्या मुलाला आत्मसात केलेल्या
क्षमतांचा व्यवहारात नक्की कसा उपयोग करायचा, हेच माहिती नाही, मात्र त्याने पाठांतर
करून किंवा कॉपी करून पेपर उत्तम प्रकारे सोडवला, तर त्याला मिळालेल्या मार्कातून
किंवा सर्टिफिकेट मधून होणारे त्याच्या क्षमतांचे मूल्यमापनच अयोग्य ठरत नाही का?
अश्या अयोग्य मूल्यमापनाच्या पद्धतीमुळे आज कित्येक मुलांचे
नुकसान होत आहे, परीक्षेच्या तणावामुळे त्यांच्यातील सर्जनशीलता मारली जाऊन, आपण
अनेक चांगले लेखक, कलाकार व चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता असलेले
शास्त्रज्ञ गमावत आहोत, व त्यातून आपले किती मोठे सामाजिक नुकसान होत असेल याचा
आपण कधी विचार केला आहे का?
मुलांच्या बौद्धिक
क्षमतांचे मूल्यमापन होणे जितके महत्वाचे आहे, तितकेच त्यांच्या भावनिक, शारीरिक व
सामाजिक बुद्धिमत्ता व क्षमता यांचे देखील मूल्यमापन होणे महत्वाचे आहे.
म्हणूनच वयानुसार मुल पुढच्या
इयत्तेत जात असताना त्याच्या केवळ बौद्धिक नाही तर शारीरिक व मानसिक क्षमता देखील विकसित
झाल्या आहेत किंवा नाही याचे तीन तासात "फ्लॅश मूल्यमापन" न करता जर त्या
मुलाचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन झाले, तर आणि तरच आपण त्या मुलाला व शिकण्याच्या एकूण प्रक्रियेला
न्याय देऊ शकतो.
©चेतन एरंडे
क्रमश:
Comments
Post a Comment