इतर विषय विशेष करून भाषा,
परिसर विज्ञान शिकताना त्याला पुस्तकातील धडे वाचणे, व त्याखाली विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे देणे कंटाळवाणे वाटत होते. हे असे का होत असावे, याचा विचार
करताना सहजच आमचे लक्ष तो वापरत असलेल्या NCERT च्या पुस्तकात शिक्षकांसाठी दिलेल्या
सूचनांकडे गेले.
त्या सूचना वाचताना व या
क्षेत्रातील काही तज्ञ व्यक्तींशी चर्चा करताना, आम्हाला एक गोष्ट समजली, ती
म्हणजे, अभ्यासक्रमाची पुस्तके ही खरी म्हणजे मुलांसाठी नसून, कोणत्या क्षमता
विकसित होण्यासाठी काय तयारी करून घेतली पाहिजे, याची शिक्षकांसाठी असलेली माहिती
पुस्तिका आहे.
पुस्तकात जे लिहिले आहे, ते
"साक्ष" म्हणून न वापरता, त्या माहितेचे "साक्षांकन"
करण्यासाठी, ती माहिती तपासून घेण्यासाठी, मुलांना भरपूर मोकळा वेळ व वातावरण निर्माण करून
देणे, हे शिक्षकाचे खरे काम आहे. हे समजल्यामुळे आम्ही तो वापरत असलेल्या
पाठ्यपुस्तकात सांगितलेल्या संकल्पना सिद्ध करण्याची स्नेहला भरपूर संधी उपलब्ध
करून देऊ लागलो, त्यामुळे त्याच्या क्षमता तर विकसित झाल्याच शिवाय, ज्ञान व
माहिती याच्यातला फरक त्याला आपोआप समजू लागला. त्याचबरोबर पुस्तकातील संकल्पनांची
सिद्धता करताना, जर काही अडले, तर पुस्तका व्यतिरिक्त इतर साधनांची जसे की
युट्यूब, विकिपीडियाची मदत घ्यायची त्याला सवय लागली. कधी कधी तर त्याला त्याच्या
आधीच्या इयत्तामधील पुस्तकांचा देखील आधार घेण्याची गरज लागली. त्यातून आपण जे
शिकतो, ते परीक्षेबरोबर टाकून द्यायचे नसते, तर ते समजून उमजून साठवून ठेवायचे
असते, व त्याची गरज पडेल तेंव्हा उपयोग करायचा असतो, हे त्याला समजले.
हे झाले बौद्धिक
क्षमातांविषयी. भावनिक क्षमता विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके
वाचणे, नाटके बघणे, कलाकार होण्यासाठी म्हणून नाही तर अभिव्यक्त होण्यासाठी, कलेचा
आस्वाद घेऊन आनंद मिळवण्यासाठी तो तबला शिकला. टीव्ही, मोबाईल गेम याच्यापलीकडे
काही अभिजात पर्याय आहेत, हे त्याच्या लक्षात यावे म्हणून, अनोळखी मुलांशी मैत्री
करणे व त्यांचे विश्व समजून घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून तेथील जीवन व संस्कृती
समजून घेणे, असे अनेक उपक्रम आम्ही केले व करत आहोत. शारीरिक क्षमता विकसित
व्हाव्यात म्हणून आहाराचे महत्व समजून घेणे, त्यासाठी स्वत: स्वयंपाक करणे, संधी
मिळेल तेंव्हा शेतावर काम करणे, नियमित पोहणे, सायकल चालवणे, संध्याकाळी सोसायटीत
मित्रांशी भरपूर खेळणे, गड किल्ले फिरणे असे उपक्रम सुरु आहेतच.
स्नेह्चे असे सातत्यपूर्ण
मूल्यमापन सुरु असल्यामुळे, वार्षिक परीक्षा वगैरे देऊन, त्याचे वेगळे मूल्यमापन
करावे, असे सध्यातरी आम्हाला वाटत नाही. शिवाय सर्टिफिकेट हे जर फक्त नोकरी मिळावी
म्हणून हवे असेल तर, जर आजच गुगल, फेसबुक सारख्या अनेक ठिकाणी सर्टिफिकेट शिवाय,
केवळ "चौकटीबाहेर विचार करण्याची" क्षमता तपासून, नोकरी मिळत असेल तर,
स्नेह अजून दहा बारा वर्षानी जेंव्हा उपजीविकेचा मार्ग शोधत असेल, त्यावेळी
सध्याचा तंत्रज्ञानात व राहणीमानात होत असलेल्या अफाट बदलांचा वेग बघता, सर्टिफिकेट
न बघता नोकरीच्या संधी नक्कीच जास्त प्रमाणात उपलब्ध असतील.
मुळात तो पुढे जाऊन काय
करेल, याचा अति विचार करून, त्याला आत्तापासून स्पर्धेच्या युगाच्या नावाखाली, मन
मारून शिकायची जबरदस्ती करावी असे आम्हाला वाटत नाही.
प्रत्येक मुलामध्ये
निसर्गत: असते, तशी स्नेह मध्ये असलेली सर्जनशीलता, सतत काही तरी नवे करून
बघण्याची अनावर इच्छा, कुठे अडले तर अडचणींचा पाढा न वाचता अनवट वाट शोधण्याची
धडपड जिवंत राहावी, एवढा एकमेव उद्देश
ठेवून आम्ही स्वशिक्षण व गरज पडेल तसे त्याचे मूल्यमापन करत आहोत.
जर आम्हाला यात यश आले, तर
त्या स्नेह्मध्ये जिवंत असलेल्या सर्जनशीलतेच्या जोरावर, (सर्टिफिकेटच्या जोरावर
नव्हे), स्नेह नक्कीच त्याचा उपजीविकेचा मार्ग शोधेल, याची आम्हाला खात्री
आहे.
अर्थात हि झाली आमची
आदर्शवादी भूमिका व आशावाद. मात्र आमच्या आदर्शवादामुळे स्नेहचे भविष्यात नुकसान
होऊ नये किंवा त्याला जो पर्याय निवडायचा आहे, त्यात अडचण येऊ नये, म्हणून आम्ही
त्याला NIOS कडून OBE ची चौथी, सातवी व आठवीची परीक्षा देण्याचा पर्याय निवडायचा
विचार करत आहोत. तसेच तो NIOS कडून दहावी व बारावीची परीक्षा देणार आहेच. ही
परीक्षा दिल्यानंतर त्याला भारत व भारताबाहेर उच्चशिक्षण देण्याचे, अनेक मार्ग
उपलब्ध होतीलच. अर्थात या परीक्षा म्हणजेच त्याच्या शिक्षणाचे अंतिम ध्येय नाही,
याची आम्हाला पुरेपूर कल्पना आहे.
केवळ परीक्षा व सर्टिफिकेट
मिळणार नाही म्हणून इच्छा असूनही
मुलांसाठी होमस्कुलिंग करत नसलेल्या पालकांना या विषयी आमचे अनुभव कदाचित उपयोगी
पडतील म्हणून हा लेखनप्रपंच.
ज्यांची मुले शाळेत जातात,
पण ज्यांना होमस्कुलिंग व परीक्षा याविषयी कुतूहल आहे त्यांना मुले परीक्षेशिवाय
शिकू शकतात किंबहुना परीक्षेचा तणाव नसेल किंवा परीक्षा हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय
नसेल, तर मुले मुळापासून व आनंदाने शिकतात, ही बाजू समजावी, हाही या लेखनाचा हेतू
आहे.
पहिल्या भागाच्या
सुरुवातीला विचारलेल्या "मुलांची परीक्षा नक्की कशासाठी घेतली जाते?"
व "मुलांच्या परीक्षेचा निकाल बघून
शिक्षक, पालक व मुले यांनी कोणती कृती करणे अपेक्षित आहे?" या प्रश्नांची
उत्तरे तुम्हाला आता नक्कीच मिळाली असतील, अशी आम्हाला खात्री आहे!
©चेतन एरंडे
समाप्त.
लिखाणाचा संदर्भ म्हणून NIOS
ची लिंक सोबत दिली आहेच. तसेच इतर मूल्यमापनाच्या कसोटींची माहिती देणाऱ्या लिंक देखील
सोबत दिल्या आहेत. शिक्षण म्हणजे काय, व
शिक्षकाची नक्की भूमिका काय, हे NCERT च्या पुस्तकाच्या लिंक मधून सांगितले आहे,
तेही नक्की वाचा,
NIOS लिंक्स
बौद्धिक क्षमता मूल्यमापन
भावनिक व सामाजिक क्षमता
मूल्यमापन
शारीरिक क्षमता मूल्यमापन
२००५ सर्व शिक्षण
आराखड्यामध्ये मुल्यामापानाविषयी मांडलेले मत
शिक्षण, पुस्तके व
शिक्षकांची भूमिका NCERT पुस्तकाची प्रस्तावना
महत्वाचे: वरील सर्व लिंक
इंटरनेटवरून घेतल्या आहेत. त्यामुळे त्या व्यावसायिक उद्देशाने वापरू नयेत.
Comments
Post a Comment