वयानुसार मुल पुढच्या
इयत्तेत जात असताना त्याच्या केवळ बौद्धिक नाही तर शारीरिक व मानसिक क्षमता देखील
विकसित झाल्या आहेत किंवा नाही याचे तीन तासात "फ्लॅश मूल्यमापन" न करता जर
त्या मुलाचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन झाले, तर आणि तरच आपण त्या मुलाला व शिकण्याच्या एकूण प्रक्रियेला
न्याय देऊ शकतो.
२००५ साली सादर झालेल्या राष्ट्रीय
शिक्षण आराखड्यामध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ डॉक्टर यशपाल व त्यांच्या
टीमने सुद्धा हाच विचार मांडला. शाळांमधून परीक्षार्थी नव्हे तर विद्यार्थी तयार
व्हावेत म्हणून सर्व शिक्षण हक्क कायद्याने पहिली ते आठवी पर्यंतची परीक्षा ही
प्रचलित मूल्यमापनाची पद्धत बंद करून सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाचा आग्रह
धरत, पास व नापास अशी विभागणी न करता मुलांना तणावरहित शिक्षणाची संधी दिली. मात्र
असे "शास्त्रीय व नैसर्गिक मूल्यमापन" ग्लॅमरस नसल्यामुळे म्हणा किंवा
पालक व शिक्षक या दोघांनाही "सतत कामाला लावणारे" असल्यामुळे म्हणा,
किंवा माझा मुलगा तुमच्या मुलापेक्षा हुशार आहे हा टेंभा मिरवायचे शस्त्रच हातातून गेल्यामुळे म्हणा पालक व शिक्षक यांनी
सरकारवर दबाव आणून, २०१७ सालापासून पुन्हा एकदा परीक्षारुपी अनैसर्गिक
मूल्यमापनाची पद्धत सुरु करायला लावली.
असो. आम्ही होमस्कुलिंग करत
असताना स्नेहने परीक्षा द्यायची का नाही आणि द्यायची असेल तर कुठे जाऊन द्यायची,
याचा अनेक वेळा विचार केला. कधी एखादी सरकारी शाळा, तर कधी NIOS यांच्या
माध्यमातून त्याने परीक्षा द्यावी, जेणेकरून त्याला कधी परत शाळेत जावेसे वाटले
किंवा इतर उच्च शिक्षण घेताना परीक्षेचा पुरावा द्यावा लागला, तर कसलीही अडचण
येणार नाही. मात्र मागच्या तीन वर्षात स्नेह्चा स्वशिक्षणाचा प्रवास जसा जसा पुढे
सरकत गेला, तशी "त्याने परीक्षा
दिलीच पाहिजे", अशी आमची अधून मधून उफाळून येणारी उर्मी कमी कमी होत गेली, त्यामुळे
मागच्या तीन वर्षात स्नेहने एकही परीक्षा दिलेली नाही!
स्नेह्ने एकही परीक्षा दिली
नाही, याचा अर्थ त्याच्या शिकण्याचे मूल्यमापन आम्ही केलेच नाही असे नाही. कारण
आमच्यासाठी त्याच्या शिकण्याचे मूल्यमापन जितके महत्वाचे आहे, तितकेच त्याला स्वत:हून
शिकत असताना आम्ही त्याला जी मदत करतो त्याचे व स्वशिक्षण या शिक्षण पद्धतीचे सातत्यपूर्ण
व सर्वंकष मूल्यमापन होणे गरजेचे होते व आहे.
स्नेहच्या मूल्यमापनाची
कसोटी ही तीन तासाची परीक्षा नसेल, हे तर पक्के ठरले होते, त्यामुळे मूल्यमापन कसे
करावे, याचा विचार करत असताना, आम्हाला इंटरनेटवर "सातत्यपूर्ण सर्वंकष
मूल्यमापनाच्या" इयत्तेनुसार काय कसोट्या असतात, हे सांगणारी एक सरकारी
पुस्तिका मिळाली. त्याचबरोबर, त्याच्या
वयानुसार भावनिक व शारीरिक क्षमता काय असल्या पाहिजेत, याचा अंदाज देणारे काही
तक्ते आम्हाला इंटरनेटवर मिळाले. या सगळ्याचा उपयोग करत, आम्ही त्याच्या क्षमता
तपासून बघू लागलो व जिथे गरज पडेल, तिथे आमच्यात काही बदल करत, त्याला त्याच्या
गतीने व कलाने क्षमता विकसित करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करत गेलो.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये,
त्याला क्षमता आत्मसात करताना काही अडचण येत असेल, तर तो त्याचा दोष आहे असे न
मानता, आमच्याकडून काही चुकते आहे का, आम्हाला बदलण्याची गरज आहे का, हे तपासत
राहिलो, व जिथे गरज पडेल तिथे, "आम्ही सांगतोय तेच ब्रम्हवाक्य आहे" असे न समजता, स्वत:मध्ये आवश्यक तिथे
बदल करत गेलो. आपले आई बाबा बदलत आहेत, हे बघून, स्नेह सुद्धा त्याच्यामध्ये
सकारात्मक व आवश्यक बदल करत, मागे पडत असलेल्या क्षमता आत्मसात करण्यासाठी
जिद्दीने प्रयत्न करू लागला.
स्नेहचे मूल्यमापन करत
असताना आमच्या लक्षात आले की, इयत्तेनुसार आवश्यक असलेल्या काही विषयांच्या
बौद्धिक क्षमता तो अगदी दोन महिन्यांतच अवगत करत होता, तर काही विषयांमध्ये त्या
अवगत करायला त्याला बराच वेळ लागत होता किंवा काही अडचणी येत होत्या. असे का होते,
याचा थोडा विचार केल्यावर असे लक्षात आले की, गणितासारखा विषय शिकताना त्याला
पुस्तक वापरायला आवडत होते, मात्र इतर विषय विशेष करून भाषा, परिसर विज्ञान
शिकताना त्याला पुस्तकातील धडे वाचणे, व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
देणे कंटाळवाणे वाटत होते. हे असे का होत असावे, याचा विचार करताना सहजच आमचे लक्ष
तो वापरत असलेल्या NCERT च्या पुस्तकात शिक्षकांसाठी दिलेल्या सूचनांकडे गेले.
©चेतन एरंडे
क्रमश:
Comments
Post a Comment