सतत घरात असल्याने, ठराविक माणसांशीच संवाद होत असल्याने व रोजच्या जगण्यात तोचतोचपणा आल्याने मुलांना भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते.
त्यातच सोशल मीडिया असो, टीव्ही असो किंवा घरातील चर्चा असो, एकूण सगळीकडेच सातत्याने नकारात्मक गोष्टी ऐकल्याने, बघितल्यानंतर मुले चिडचिड करू लागतात, हायपर ऍक्टिव्ह होतात.
अशा वेळी मुलांच्या भावनांना लेबल न लावता, त्या जशाच्या तशा स्वीकारणे, त्यांचा आदर करणे हे आपले पाहिले काम आहे.
मुलांच्या मनात अशा भावना साठून राहू नयेत, त्या मोकळेपणाने व सकारात्मक पद्धतीने व्यक्त करता याव्यात या साठी मुलांना चित्र काढायला देणे, मातीकाम, लाकुडकाम करायला देणे, त्यांच्याशी वेगवेगळे खेळ खेळणे, काही नवीन खेळ शोधून काढणे(!) हे आपण करू शकतो.
घरामध्ये शारिरीक व शाब्दिक हिंसा होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. संकटात फक्त आपण सापडलेलो नाही, तर संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. संकटात सापडण्याची आपली काय किंवा जगाची काय ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे आपण स्वतः आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून आपल्या वागण्याने मुलांना घरात असुरक्षित वाटणार नाही याची आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठी काळजी घेतली पाहिजे.
कोरोनाविषयी सतत बोलण्याने व त्याविषयी बातम्या बघितल्याने आपण त्याच्याविरोधातील लढाई जिंकणार नाही, त्यामुळे हा विषय शक्यतो टाळावा.
त्याचबरोबर कोरोना झाला म्हणजे त्या व्यक्तीने किंवा कुटुंबाने काहीतरी मोठा गुन्हा केला आहे आणि आपण त्यांना वाळीत टाकले पाहिजे, असा मेसेज, सिग्नल मुलांना जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कारण यामुळे जर उद्या आपल्यावर ही वेळ आली तर आपल्याला पण लोकं गुन्हेगार समजून वाळीत टाकतील, अशी भीती वाटून मुले अस्वस्थ होऊ शकतात.
हा एक केवळ साथीचा आजार आहे. आपण योग्य काळजी घेतली, नियमित व्यायाम केला, योग्य आहार घेतला तर आपल्याला हा आजार होण्याची शक्यता कमी असते. जरी चुकून आपल्याला हा आजार झाला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण त्यावर मात करू शकतो. भारतात ७६ टक्क्यांपेक्षा जास्त लोकं या आजारातून बरी झाली आहेत, हे मुलांना मुद्दामून सांगितलं तर वातावरण सकारात्मक राहायला मदत होते.
अनेकदा माणसं औषधांना "योग्य व मायेच्या शब्दांची" जोड मिळाली तर लवकर बरी होतात, तंदुरुस्त राहतात. सुदैवाने असे शब्द फुकट मिळत असल्याने या काळात आपण त्याचा भरपूर वापर करून, मुलांना व आपल्याला स्वतःलाही भावनांवर नियंत्रण आणण्यासाठी करू शकतो..
©चेतन एरंडे
क्रमशः
This post is based on the literature published by Unicef.
छान लेख.
ReplyDeleteछान लिहिला आहे. सकारात्मक मानसिकता गरजेची आहे.
ReplyDeleteभावनिक साक्षरता ही काळाची गरज आहे हे या कोरोनाने दाखवून दिले आहे...लेख छान च
ReplyDelete