प्रत्येकाला आपण आणि आपल्या मुलाने "क्रिएटिव्ह" असावे असे मनापासून वाटत असते. हि क्रिएटिव्हिटी आणायची कुठून?
या विषयातील तज्ञ् सर केन रॉबिन्सन यांनी क्रिएटिव्हिटीची केलेली ही व्याख्या आपल्याला क्रिएटिव्ह होण्याच्या तीन सोप्या पायऱ्या सांगते.
"Creativity is putting your imagination to work" - Ken
Robinson .
या तीन पायऱ्या कोणत्या?
पहिली पायरी - इमॅजिनेशन - कल्पनारंजन
कोणत्याही गोष्टीकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघणे व ती प्रत्यक्षात आणणे म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता.
आता जर वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचे असेल तर नवनवीन "आयडिया" लढवता आल्या पाहिजेत! आयडिया लढवण्यासाठी कल्पनारंजन करावे लागेल आणि कल्पनारंजन करण्यासाठी द्यावा लागेल तो भरपूर मोकळा वेळ!
मोकळा वेळ आणायचा कुठून?
त्यासाठी आपण दिवसभरात जी कामे करतो त्यातील "जंक कामे" जसं की सोशल मीडियावर जाणारा वेळ, टीव्ही बघण्यात जाणारा वेळ, कमी करून आपण हा मोकळं वेळ काढू शकतो.
दुसरी पायरी - आयडिया टू रिऍलिटी
बऱ्याचदा आपल्या मनातील अनेक गोष्टी अगदी सहज सोपंय असूनही त्या करायच्या राहून जातात. त्या गोष्टी नेटाने करण्याची सवय लावून घेतली तर आपण क्रिएटिव्हिटीची पुढची पायरी सर करू शकतो.
अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर सहज गप्पा मारता मारता घरातील फर्निचरची मांडणी वेगळ्या पद्धतीने करायची "आयडिया" समोर येते किंवा नेहमी करत असलेली रेसिपी वेगळ्या पद्धतीने करायचा विचार डोक्यात येतो, अशा वेळी बऱ्याचदा, आळस मध्ये येतो आणि तो विचार किंवा आयडिया हवेत विरून जाते!
हा आळस बाजूला ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर या कल्पना प्रत्यक्षात आणायला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा त्यांचा व्यावहारिक जगाशी संबंध कसा लावायचा हे आपल्याला समजायला लागते त्यातून आपल्या कल्पना अधिक धारदार होतात.
तिसरी पायरी - चुका होऊ देणे
कोणतीही नवी कल्पना प्रत्यक्षात आणताना "चुका होणे" हे नैसर्गिक आहे. अशा वेळी जर "चूक होणारच" ही वस्तुस्थिती न स्वीकारता, त्या चुकीसाठी शिक्षा आणि ओरडा दिला तर साहजिकच खच्चीकरण होते, नव्या गोष्टी, नवा विचार करण्याची इच्छा मारून जाते.
मग सोपा उपाय म्हणून "कॉपी पेस्ट" हा पर्याय स्वीकारला जातो. एकदा कॉपी पेस्ट करायची सवय लागली की मग क्रिएटिव्हिटी हा शब्दच शब्दकोषातून गायब होतो!!
थोडक्यात काय तर भरपूर मोकळा वेळ, कल्पना प्रत्यक्षात आणण्याची धडपड व चूक स्वीकारण्याची तयारी केली की क्रिएटिव्हिटीचा कोणताही क्लास न लावता मुले आणि आपण क्रिएटिव्ह होऊ शकू असे मला वाटते...
चेतन एरंडे,
.
Comments
Post a Comment