शिक्षण ही कुणाची जबाबदारी आहे? असं विचारल्या विचारल्या पहिलं उत्तर जे येईल ते म्हणजे शिक्षण ही पालकांची, शाळेची आणि समाजाची जबाबदारी आहे.
माझंही सुरुवातीला असंच मत होतं. ही जबाबदारी फारच गंभीरपणे घेऊन काय करू आणि काय नको असं व्हायचं. एक दोन वर्षांपूर्वी युट्युबवर एक व्हिडीयो बघताना मला एक चक्रावून टाकणारं उत्तर मिळालं, ते म्हणजे "शिक्षण ही मुलांची किंवा शिकणाऱ्याची" जबाबदारी आहे आणि निसर्गाने मुलांना त्यासाठी सक्षम केले आहे.
इतके वर्ष मुलाच्या शिक्षणासाठी जीव तोडून मेहनत घेणाऱ्या माझ्यासारख्या पालकाला मी ज्या गोष्टीसाठी मेहनत घेतोय, ती माझी जबाबदारीच नाही, हे पचवणं अर्थातच कठीण होतं. त्यामुळे मी हे फार गंभीरपणे घेतलं नाही.
मात्र काही दिवसांनी सहज विचार करताना, मला स्नेहचे बालपण आठवले.
त्याची चालायला शिकण्यासाठीची धडपड, बोलायला शिकण्याची धडपड, बोलायला यायला लागल्यानंतर सतत, हे काय? ते काय? हे कसं होतं? ते कसं होतं? असे प्रश्न विचारून भंडावून सोडणं, हे सगळं आठवू लागलं.
चालायला, बोलायला शिकतांना त्याने कधीच माझी किंवा प्रीतीची मदत मागितली नाही किंबहुना तट वयातील कोणतेही मूल चालणे, बोलणे, भावना व्यक्त करणे या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी शिकताना, मोठ्या माणसांची थेट मदत न घेता, शिकण्याची जी धडपड करते, ती सगळी धडपड ही शिकणे ही "माझी" जबाबदारी आहे या जाणिवेने आणि शिकण्याच्या नैसर्गिक प्रेरणेने सुरू असते.
एकदा बोलायला शिकल्यावर सातत्याने प्रश्न विचारून, आजूबाजूचे जग समजून घेण्याचा प्रयत्न जा सुद्धा शिकणे ही माझी जबाबदारी आहे या जाणिवेतून येतात.
मात्र ठराविक काळानंतर जेव्हा मुलाला ठराविक अभ्यासक्रम आणि ठराविक सूचना ऐकायची सवय लागते, स्वतःला व्यक्त करण्यात, प्रश्न विचारण्यात बंधने येऊ लागतात, तेव्हा शिक्षण ही "माझी" नसून मोठ्या माणसांची जबाबदारी आहे, असे मुलांना वाटायला लागते.
मग हळूहळू मुलं, शिकण्याच्या प्रक्रियेत पॅसिव्ह होतात, प्रश्न विचारणे कमी करतात, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला कचरतात. मग मोठं झाल्यावर व्यवहारात जेव्हा कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेऊन काम करायची वेळ येते किंवा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा ही मुले कुणाच्या आधाराची किंवा सोप्या भाषेत "कॉपी, पेस्ट" कंटेंटची वाट बघत बसू शकतात.
मात्र हे टाळणे, अत्यंत सोपे आहे. निसर्गतः मुलांना शिकणे ही त्यांची जबाबदारी आहे, हे जे भान असते, ते भान जिवंत ठेवणे, त्यासाठी त्यांना वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर झेपतील अशा आणि एवढ्या जबाबदाऱ्या देणे, त्यातून त्यांचे जबाबदारीचे भान जिवंत ठेवणे, हे आपण करू शकतो.
छोट्या छोट्या गोष्टींतून आलेले हे भान मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत मग ते शाळेत जाणारे मूल असो किंवा होमस्कुलिंग करणारे मूल असो, सकारात्मक परिणाम करायला, शिकण्याची प्रेरणा वेगवान करायला मदत करते.
याविषयीचे माझे काही अनुभव मी या व्हिडियोमध्ये मांडायचा प्रयत्न केला आहे.
पुढच्या भागात खेळ आणि शिक्षण यांचे एकमेकांशी नातं काय आहे आणि आपली भूमिका काय असली पाहिजे, हे सांगायचा मी प्रयत्न करणार आहे..
चेतन एरंडे.
Comments
Post a Comment