ऑनलाईन लर्निंग करताना पुढील ११ गोष्टी लक्षात ठेवल्या तर हे शिकणे अधिक परिणामकारक होते असे जवळपास २० ऑनलाईन कोर्स पूर्ण केल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे सध्या शाळेपासून ते कॉलेजपर्यंत सगळीकडेच ऑनलाईन लर्निंग हा पर्याय वापरला जात असल्याने, माझ्या अनुभवाचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल या हेतूने ही ब्लॉगपोस्ट लिहीत आहे.
१. ऑनलाईन लर्निंग करताना घरात शांत, भरपूर सूर्यप्रकाश असलेली व शक्यतो कमीत कमी डिस्टर्ब् असेल अशी जागा निवडावी.
२. ऑनलाईन लर्निंग क्लास सुरु होण्याआधी, शिकताना वापरली जाणारी साधने जसे की स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कम्प्युटर सुस्थितीत आहे याची पूर्ण खात्री करून घ्या. त्याचबरोबर जी सॉफ्टवेअर आवश्यक आहेत, ती इन्स्टॉल केली आहेत याची खात्री करून घ्या.
३. इंटरनेटचे स्पीड व्यवस्थित आहे ना, याची खात्री करून घ्या. वाय - फाय इंटरनेटऐवजी शक्यतो वायर्ड इंटरनेटचा वापर करा. काही कारणानं तुम्हाला जॉईन होता येणार नसेल, तर तसे तुमच्या इन्स्ट्रक्टरला न चुकता कळवा.
४. वेळापत्रक बनवा. क्लास सुरु होण्याआधी तुम्ही नोट्स घेण्यासाठी जी साधने वापरणार आहात, ती सोबत ठेवा, त्याचबरोबर क्लासशी संबंधित जे काही संदर्भ जसे की अभ्यासक्रमाची पुस्तके, आधीच्या क्लासमध्ये घेतलेल्या नोट्स सोबत ठेवा. त्या शक्यतो आधी वाचून घ्या म्हणजे शिकताना लिंक लागायला मदत होईल.
५. तुम्ही घरात जरी शिकणारे एकटेच असाल तरी ऑनलाईन क्लासमध्ये शिकणारे मात्र एकटे नसता, त्यामुळे तुमच्या बरोबर कोण कोण शिकत आहे, याची माहिती करून घ्या, त्यांच्याशी वैयक्तिक चर्च करा. तुम्हाला पडणारे प्रश्न सगळ्यांपुढे विचारणे अवघड वाटत असेल तर सोबत शिकणाऱ्या व्यक्तीला विचार किंवा तुमच्या इन्स्ट्रक्टरला थेट मेल करून विचारा
६. तुमची शाळाच जर सध्या ऑनलाईन लर्निंग क्लासेस घेत असेल तर तुमच्या वर्गमित्रांबरोबर छोटे गट करून तुम्ही जे काही शिकत आहात त्याचा एकत्र ऑनलाईन सराव करा, त्यासाठी ऑनलाईन टूल्स वापर त्यामुळे शिकताना एकमेकांची मदत होऊन शिकणे अधिक आनंददायी व परिणामकारक होईल,
७. जर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडियो ऐकत असाल तर एका दमात पूर्ण व्हिडियो बघण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट समजून घेत मग पुढे जावा. तुम्ही हे व्हिडियो पाहिजे तितक्या वेळा पॉज करू शकता, पुन्हा पुन्हा बघू शकता हा ऑनलाईन लर्निंगचा सगळ्यात मोठा फायदा आहे, हे पक्के लक्षात ठेवा व तो फायदा करून घ्या.
८. तुम्ही जर लाईव्ह ऑनलाईन क्लासमध्ये शिकत असाल तर व्हिडियो बघताना नोट्स न काढता तो व्हिडियो पूर्ण लक्ष देऊन बघा, जेणेकरून महत्वाच्या गोष्टी सुटणार नाहीत. शक्यतो हे ऑनलाईन व्हिडियो रेकॉर्ड करा, त्यासाठी OBS सारखे टूल्स उपलब्ध आहेत, त्याचा वापर करा. तुम्हाला जर ऑनलाईन क्लास बघताना काही प्रश्न असेल, तर चॅटमध्ये तो प्रश्न लगेच टाका, जेणेकरून इन्स्ट्रक्टर त्यांच्या सोयीने या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील
९. गरज नसेल तेव्हा तुमचा व्हिडियो व ऑडियो म्यूट ठेवा जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही, त्याचबरोबर व्हिडियो व ऑडियो सुरु असताना, जबाबदारीने वागा जेणेकरून तुमचे वैयक्तीक स्वातंत्र्य जपले जाईल.
१०. ऑनलाईन लर्निंग करत असताना तुम्हाला एखादी गोष्ट समजली आहे का नाही हे पुढच्याला समजणे अवघड असते, त्यामुळे जुन्या सवयी विसरून जिथे गरज असेल तिथे वेळ वाया न दवडता ताबडतोब प्रश्न विचाराने आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.
११. ऑनलाईन लर्निंग ही आपल्या सगळ्यांसाठी नवीन गोष्ट आहे, त्यामुळे चुका होणारच आहे. अशा वेळी अवास्तव अपेक्षा न ठेवता प्रॅक्टिकल विचार करा, विनाकारण फार मोठे गोल्स ठेवू नका जेणेकरून शिकताना ताण येणार नाही, निराशा येणार नाही!!
फारच उपयुक्त टिप्स दिल्या आहेत. अगदी प्रॅक्टिकल. जरूर अमलात आणणे.
ReplyDelete