सर्जनशील पालक समूहातील गेले दोन महिने स्वतःहून प्रोग्रामिंग शिकत असलेल्या मुलांनी ३० मे २०२० रोजी अमेरिकेतील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेसमोर त्यांची शिकण्याची प्रक्रिया सादर केली. या वेळी या मुलांनी नक्की काय सांगितले हे समजून घेण्यासाठी ही ब्लॉग पोस्ट नक्की वाचा.
मुलांना जबाबदारी द्यावी का? या प्रश्नाविषयी पालकांच्या मनात अनेक शंका असतात आणि ते अत्यंत साहजिकही आहे. मात्र मुलांना जबाबदारी न देताच, त्यांच्या जबाबदारी घेण्याच्या क्षमतेविषयी शंका निर्माण करणे हे मात्र चुकीचे आहे,
पुण्यातील सर्जनशील पालक समूहातील पालकांनी मात्र ही चूक करायची नाही असा सर्जनशील निर्णय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये घेतला. कोरोनामुळे मुलांना सक्तीने घरात बसण्याची वेळ आली होती. अशा वेळी मुलांनी काय करायचे हे पालकांनी न ठरवता मुलानांच ठरवू देण्याचा सर्जनशील निर्णय समूहातील पालकांनी घेतला.
मुलांना हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुलांनी काय केले असेल?
सगळ्यात आधी ही सगळी मुलं ऑनलाईन एकत्र आली. काय करायचे याचा निर्णय सगळयांनी मिळून घ्यावा असे ठरले आणि मग वेगवेगळ्या आयडिया समोर आल्या, प्रत्येक आयडियेवर सखोल चर्चा झाली आणि शेवटी सध्याच्या काळात मुलांना प्रचंड आकर्षण असलेली गोष्ट म्हणजे प्रोग्रामिंग शिकायचे ठरले.
शिकण्याचे स्वातंत्र्य तर मिळाले पण शिकण्यासाठी लागणारी सॉफ्टवेअर, ऑनलाईन मिटिंग करण्यासाठी लागणारे ऍप्लिकेशन, एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी लागणारे ऍप्लिकेशन या सगळ्या गोष्टी पण गोळ्या कराव्या तर लागणार होत्याच. आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त स्वातंत्र्य घेऊन मुलं शांत बसली नाहीत तर या सगळ्या गोष्टी गोळा करण्याची "जबाबदारी" सुद्धा त्यांनी घेतली.
मग कधी भेटायचे, काय शिकायचे, शिकलेले आपल्याला समजले आहे आणि आपण आता पुढचे शिकू शकतो, हे कसे ओळखायचे, शिकताना असचं आली तर एकमेकांना कशी मदत करायची, या सगळ्या गोष्टी मुलांनी मोठ्यांची मदत न घेता अत्यंत जबाबदारीने केल्या.
बाहेर जे शिकण्यासाठी साधारण दहा हजार फी द्यावी लागते, ती गोष्ट मुलं स्वतःहून फुकटात शिकली! हा शिकण्याचा प्रवास त्यांनी एप्रिलमध्ये पालकांसमोर मांडला. हे शिकून झालं म्हणून मुलं इथंच थांबली नाहीत. तर मुलांनी आता पुढची झेप घेण्याचे ठरवले,
त्यांनी पायथॉन या सध्या प्रचंड मागणी असलेल्या भाषेला गवसणी घालण्याचे ठरवले. ही भाषा शिकण्यासाठी लागणारी साधने सुद्धा परत मुलांनी स्वतःच निवडली. सुरुवातीला कोड कॉम्बॅट हे ऍप्लिकेशन वापरून मुलं शिकू लागली हे ऍप्लिकेशन वापरायला जमतंय याचे मूल्यमापन स्वतःच करून मुलांनी एक पाऊल पुढे जायचे ठरवले.
सध्या ही मुले पायथॉन ही भाषा थेट मायक्रोसॉफ्ट कडून शिकत आहेत!
स्वतःहून शिकण्याचा हा प्रवास सर्जनशील पालक समूहातील निधी, राही, अनिश, आयुष, कैवल्य व स्नेह यांनी ३० मे २०२० रोजी मुलांच्या स्वतःहून शिकण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करणाऱ्या "अलायन्स फॉर सेल्फ डिरेक्टड एज्युकेशन" या संस्थेच्या अनुभवी सदस्यांसमोर मांडला.
यावेळी मुलांनी अत्यंत आत्मविश्वासाने या प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा सादर केला. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील समर्पक उत्तरे दिली.
हे सगळं ऐकताना मला ज्या गोष्टी ठळकपणे जाणवल्या त्या म्हणजे,
१. मुलांच्या स्वतःहून जबाबदारी घेण्याच्या क्षमता नक्की काय आहेत हे मुलांना स्वातंत्र्य दिल्याशिवाय समजू शिकत नाहीत, त्यामुळे मुलांना स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे.
२. या मुलांनी एप्रिलमध्ये पालकांसमोर दिलेले प्रेझेंटेशन असो किंवा काल या अमेरिकन्सना दिलेले प्रेझेंटेशन असो, दोन्ही वेळेस मुलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास जाणवला. हा आत्मविश्वास कमवण्यासाठी मुलांनी कुणीही न सांगता अत्यंत मन लावून मेहनत केली होती. ही मेहनत इतक्या सूक्ष्म पातळीवर होती की कुणाचे प्रझेंटेशन कितव्या मिनिटाला सुरु होईल आणि कितव्या मिनित्तला संपेल याची संपूर्ण माहिती मुलांकडे होती.
३. या संपूर्ण दोन महिन्याच्या प्रवासात मला जाणवलेली महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांमध्ये कुठेच स्पर्धा नव्हती! उलट एकमेकांना सांभाळून सगळ्यांनी मिळून पुढे जाण्याची धडपड ही मुलं करत होती. ३० मे २०२० रोजी मुलांनी दिलेलं प्रेझेंटेशन ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना हे नक्की जाणवलं असेल.
४. आपल्याला कोणताही गोष्ट आता जमायला लागली आहे आणि कोणत्या क्षणी आपण आता पुढं जायचं हे मुलांना तिसऱ्या माणसाने सांगायची गरज नसते. मुलांना ते बरोब्बर कळतं. नैसर्गिकरित्या मुलं स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी सक्षम असतात किंबहुना या जगात टिकून राहण्यासाठी त्यांना याशिवाय पर्याय देखील नसतो!! मुलं समजून न घेता तयार केलेल्या बेंचमार्क नुसार तिसऱ्या माणसाने केलेले मूल्यमापन हे मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करण्याऐवजी खच्ची करण्याचीच शक्यता जास्त असते!
हे प्रेझेंटेशन झाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंद हा परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण मिळवल्यावर दिसणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता करत अनिश म्हणल्याप्रमाणे "जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतःहून शिकतो तेव्हा ती "बाय हार्ट" शिकतो आणि त्यामुळे मिळणारे समाधान व आनंद सुद्धा "बाय हार्ट असतात."
मुलांना गेले दोन महिने स्वतःहून शिकण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल पालकांचे मनापासून आभार. इथून पुढे सुद्धा ही मुलं अशाच प्रकारे एकत्र येऊन शिकत राहावीत व त्यांना आनंद व समाधान मिळत राहावे म्हणून सर्जनशील पालक समूहाकडून खूप खूप शुभेच्छा!!
Comments
Post a Comment