इमोशनल इंटेलिजन्स विषयी १० महत्वाच्या गोष्टी - माधवी गोखले यांच्या सेशनमधून मला समजलेल्या महत्वाच्या गोष्टी
सर्जनशील पालक समूहाने २३ मे २०२० रोजी भावनिक बुद्धिमत्ता याविषयातील तज्ञ माधवी गोखले यांच्याशी पालकांचा ऑनलाईन संवाद आयोजित केला होता.
या अतिशय माहितीपूर्ण संवादातून मला समजलेल्या गोष्टी, या ब्लॉग पोस्टमध्ये मांडायचा मी प्रयत्न करत आहे.
१. आपला रोल मॉडेल आपल्याला का आवडतो? तर तो त्याच्या नेतृत्वगुणांमुळे, झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे, टाईम मॅनेजमेंट मुळे. हे सगळे गुण "आय क्यू" शी नाही तर "इ क्यू" शी म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. म्हणजेच यशस्वी होण्यामागे, आपल्या आजूबाजूच्या जगावर प्रभाव पाडू शकेल असे व्यक्तिमत्व निर्माण होण्यामागे भावनिक बुद्धिमत्तेचा निर्विवाद वाटा आहे.
२. भावनिक बुद्धिमत्ता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर योग्य मार्गदर्शन घेतले तर वाढवता येऊ शकते.
३. भावना "दाबून" टाकण्याची, "नियंत्रित" करण्याची खटपट करणे चुकीचे आहे, त्यामुळे भावना अनावर होण्याची शक्यता जास्त असते म्हणून भावनांचे नियोजन करता आले पाहिजे.
४. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये एमपथी (Empathy) म्हणजेच अनुकंपा अतिशय महत्वाची असते. त्यामुळे भावनिक बुद्धीमत्ता वाढवण्यासाठी हे कौशल्य शिकणे आवश्यक आहे. एमपथी किंवा अनुकंपा हे कौशल्य शिकण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या चपला आपल्या पायात घालाव्या लागतात!
अनुकंपा शिकण्यासाठी दुसऱ्याच्या चपला आपल्या पायात घालायच्या असतील तर आधी स्वतःच्या चपला पायातून काढाव्या लागतात, हे समजले की अनुकंपा शिकणे सोपे जाईल!
५. कोणतीही व्यक्ती जेव्हा भावना व्यक्त करत असते तेव्हा तिच्या मनात जे समोर दिसते त्यापेक्षा बरेच काही त्या व्यक्तीच्या मनात चालू असते यालाच आईसबर्ग मॉडेल किंवा हिमनगाचे टोक असे म्हणतात त्यामुळे पुढच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्यासाठी आपण फक्त हिमनगाचे टोक बघत आहेत, हे लक्षात ठेवावे.
६. आपली मुले जेव्हा त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे येतात तेव्हा आपली प्राथमिकता आपल्या मुलांशी संवाद करण्याला असली पाहिजे, त्यांना आपल्याशी मोकळेपणाने व्यक्त होता आले पाहिजे.
७. आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ टॉक या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे भावनांचे नियोजन करणे सोपे जाते.
८. कोणतीही भावना चांगली किंवा वाईट नसते, ती भावना व्यक्त करताना तुम्ही गती व ऊर्जा यांचा योग्य वापर करणे शिकले पाहिजे.
९. राग ही भावना सुद्धा वाईट नाही कारण आपल्या पूर्वजांनी राग आणि उद्रेक व्यक्त केला म्हणून तर आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकले, तो राग दाबून टाकला गेला असता तर? फक्त तो व्यक्त कसा करायचा हे शिकता आला पाहिजे.
१०. भावनिक बुद्धिमत्ता ही "सरावातून" शिकता येते, विकसित करता येते, त्यासाठी सेल्फ टॉक व सेल्फ अवेअरनेस या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजेत.
या सेशनला पालकांनी अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला. सर्जनशील पालक समूहाच्या पराग हर्डीकर व पल्लवी कोटीभास्कर यांनी हे सेशन यशस्वी होण्यासाठी मनापासून मेहनत घेतली.
माधवीताई या सर्जनशील पालक समूहाच्या गेले चार वर्षे सदस्य आहेत. त्यामुळे पालकांचे प्रश्न त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहेत. हे सेशन यशस्वी व्हावे, पालकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देता यावे म्हणून त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे या सेशनमधून दिसून आले.
भावनिक बुद्धिमत्ता याविषयावर सर्जनशील पालक समूहाचे पालक एकत्र येऊन इथून पुढे सातत्यपूर्ण काम करणार आहेत. त्याविषयी अधिक माहिती लवकरच देण्यात येईल..
सर्जनशील पालक समूहात सहभागी होण्यासाठी community.parenting@gmail.com वर मेल पाठवावी.
Comments
Post a Comment