संपूर्ण लेखात कुठेही ठोस संशोधनाचा उल्लेख नाही. लेखिकेला या विषयावर काय वाटते यापेक्षा या विषयवार काय संशोधन झाले आहे हे पालकांसाठी जास्त महत्वाचे व उपयुक्त नाही का? "मुले इंटरनेट वापरण्यासाठी परिपकव नसतात", "मुलांना इंटरनेटवर जाऊन गुप्त गोष्टी करायला आवडतात", "एकटं राहायला आवडणं" अशी वाक्य मांडताना किती मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे?
२००६ साली डीबेल आणि चॅपमन यांनी एका ऑस्ट्रेलियन विद्यापीठासाठी केलेल्या संशोधनात इंटरनेट मुलांच्या वाढीत कशी महत्वाची भूमिका बजावत आहे, हे संशोधनातून मांडले आहे.
हा रिसर्च पेपर इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे.
त्याचबरोबर डॉक्टर पीटर ग्रे या बोस्टन विद्यापीठातील मानसशात्रज्ञाने "फ्री टू लर्न" या पुस्तकात व्हिडियो गेम्सचा मुलांच्या वाढीवर होणार सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर लिहिले आहे.
लेखिकेच्या म्हणण्यानुसार जे अपरिपक्व वय आहे त्या वयात मुलं चालायला शिकणे, पोहायला शिकणे, रस्ता ओलांडायला शिकणे, अनोळखी व्यक्तीशी ओळख करून मैत्री करणे अशा इंटरनेटपेक्षाही धोकादायक गोष्टी शिकतात, जबाबदारीने करतातच ना! त्याचप्रमाणे जर आजूबाजूला इंटरनेट जबाबदारीने वापरणारी माणसे असतील तर मुले सुद्धा ते जबाबदारीने वापरायला शिकतीलच.
त्यासाठी पालकांना असे वातावरण निर्माण करावे लागेल इतकेच. त्याची सुरुवात मुलांना या लिंकवर या लिंकवर दिलेली गेम खेळायला देऊन करता येईल.
त्याचबरोबर मुलांवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. हे माध्यम पालक आजूबाजूची मोठी माणसे कोणत्या कोणत्या कामासाठी वापरतात, त्यातून ते चांगल्या गोष्टी शिकून स्वतः:चा फायदा कसा करून घेतात, हे मुलांना दाखवून दिले पाहिजे.
राहता राहिला प्रश्न तो म्हणजे मुले इंटरनेटमुळे एकटी राहतात, समाजात मिसळत नाहीत हा. मात्र असे म्हणणे सुद्धा चुकीचे आहे. उलट मुले इंटरनेटचा वापर करून जगभर पसरलेले समविचारी मित्र शोधतात. पालक म्हणून आपण मुलांना असे मित्र शोधणे, या सगळ्या मुलांनी एकत्र येऊन त्यांच्या आवडत्या विषयावर चर्चा करणे, माहितीची देवाणघेवाण करणे, हे कसे करता येईल? हे बघितले पाहिजे. हेच खरे जबादार पालकत्व नाही का?
आजकाल कृतीपेक्षा भीती जास्त विकली जाते त्यामुळे नकळत कृती कशी करावी हे सांगण्यापेक्षा लोकांचा कल भीती मांडण्याकडे वाढू लागला आहे की काय असे जाणवते.
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, इंटरनेट हि मुलांसाठी जगाकडे बघण्याची एक खिडकी आहे. ती खिडकी कशी वापरायची याविषयी अनेक सोपे उपाय इंटरनेटवर उपलब्ध आहे. मुलांची सुरुवातीला त्या पर्यायांशी ओळख करून देऊन मग त्यांना खिडकीपाशी सोडले तर मुले जबाबदारीने वागतात. खिडकीतून वाऱ्याबरोबर धूळ तर येणारच. म्हणून ती खिडकीच बंद करून किंवा तिची उघडझाप आपल्या हातात ठेवून मुलांना गुदमरून टाकणे, हे जबाबदार पालकत्व नाही.
तर ती धूळ कशी झटकावी? हे मुलांना शिकवणे हे खरे जबाबदार पालकत्त्व आहे, असे मला वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.
तर ती धूळ कशी झटकावी? हे मुलांना शिकवणे हे खरे जबाबदार पालकत्त्व आहे, असे मला वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.
Comments
Post a Comment